HFMD Virus Symptoms Treatment : हवामानातील बदल आणि शाळा किंवा डे-केयर सेंटरमध्ये मुले एकत्र आल्यामुळे हा आजार वेगाने पसरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे. बहुतांश मुले पुरेशी विश्रांती आणि लक्षणांनुसार केलेल्या उपचारांनी बरी होतात. मात्र, काही गंभीर प्रकरणांमध्ये किंवा अशक्त मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते.
याविषयी एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत नवरंगे यांनी सांगितले की, गेल्या पाच आठवड्यांत शहरातील मुलांमध्ये एचएफएमडीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हा आजार घरे, सोसायट्या आणि शाळांमध्ये पसरत आहे. दर आठवड्याला ४ ते ५ नवीन रुग्ण समोर येत असून एका महिन्यात सुमारे ३० मुले उपचारासाठी आली आहेत. काही मुलांना हा संसर्ग दोन ते तीन वेळा झाला आहे.
५ वर्षांपेक्षा लहान मुलांना जास्त धोका
हा आजार प्रामुख्याने ५ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळतो, परंतु मोठी मुले आणि प्रौढांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. बहुतांश प्रकरणांमध्ये हा आजार गंभीर नसला तरी तो अत्यंत वेगाने पसरतो. आजार रोखण्यासाठी मुलांनी वारंवार हात धुणे आवश्यक आहे. घरातील वस्तू, खेळणी आणि वापरण्याच्या जागा स्वच्छ व निर्जंतुक ठेवाव्यात तसेच आजारी मुलांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
काय आहेत लक्षणे?
डॉक्टरांच्या मते- ताप येणे, तोंडात लालसर फोड किंवा खाज येणे, थकवा, त्वचेवर लाल पुरळ आणि बारीक डाग ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. हे डाग पुढे जाऊन जीभ, हिरड्या आणि गालाच्या आतील भागात फोडांचे रूप घेतात. डॉ. नवरंगे यांनी स्पष्ट केले की, या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. जवळच्या संपर्कामुळे तो वेगाने पसरत असल्याने प्रतिबंध करणे कठीण जाते.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे अॅकाडेमिक हेड आणि वरिष्ठ एनआयसीयू सल्लागार डॉ. अनिल खामकर यांनी सांगितले की, पुण्यात हा आजार जून ते ऑक्टोबर आणि डिसेंबर ते जानेवारी दरम्यान जास्त प्रमाणात आढळतो. सुरुवातीला मुलाला ताप येतो आणि सुस्ती येते; त्यानंतर फोड व पुरळ उठतात. ही पुरळ सामान्यतः हात, पाय आणि तोंडाच्या आत येते, परंतु कोपर, मांड्या आणि गुडघ्यांवरही असू शकते. यामुळे जळजळ, खाज आणि वेदना होतात. तोंडात आणि घशात फोड आल्यामुळे मुलांना अन्न किंवा पाणी गिळताना खूप त्रास होतो.
७ ते १० दिवसांत मुले होतात बरी
पुणे विभागाच्या आरोग्य सेवांचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सांगितले की, ३ ते ७ वर्षे वयोगटातील मुले यामुळे सर्वाधिक बाधित होत आहेत. शाळा प्रशासनाने त्वरित खबरदारीचे उपाय योजले पाहिजेत. ज्या मुलांमध्ये एचएफएमडीची लक्षणे दिसतील, त्यांना तात्काळ इतर मुलांपासून वेगळे करून डॉक्टरांना दाखवावे. हा संसर्ग दूषित वस्तू, खेळणी किंवा थेट संपर्काद्वारे पसरतो. योग्य काळजी घेतल्यास बहुतांश मुले ७ ते १० दिवसांत पूर्णपणे बरी होतात.
