Nighttime Hand Numbness Causes and Warning Signs: रात्री शांत झोपलेले असताना अचानक हात सुन्न होतो, बोटांमध्ये मुंग्या येतात किंवा हातामध्ये झिणझिण्या जाणवू लागतात? अनेकदा हात हलवल्यानंतर किंवा झोपण्याची स्थिती बदलल्यानंतर हा त्रास कमी होतो. त्यामुळे बरेच जण याकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, हा त्रास वारंवार होत असेल किंवा बराच वेळ टिकून राहत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण- हात सुन्न होण्यामागे झोपण्याची चुकीची पद्धत हे एक कारण असू शकते; परंतु काही वेळा नसांवरील दाब किंवा आरोग्याशी संबंधित इतर समस्याही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. मग नेमकी कोणती कारणे हात सुन्न होण्यास कारणीभूत ठरतात? जाणून घेऊया.
१. झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हात होतो सुन्न
रात्री झोपताना हात डोक्याखाली घेणे, हातावर शरीराचे वजन पडेल अशा स्थितीत झोपणे किंवा बराच वेळ एकाच स्थितीत राहणे यांमुळे हातातील नसांवर दाब येऊ शकतो. परिणामी, हात सुन्न पडणे, बोटांमध्ये मुंग्या येणे किंवा झिणझिण्या जाणवणे, असा त्रास होऊ शकतो.
गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयातील डॉ. एस. के. अग्रवाल यांच्या माहितीनुसार, चुकीच्या पद्धतीने झोपणे हे हात सुन्न होण्यामागील सर्वसामान्य कारणांपैकी एक आहे. अशा वेळी झोपण्याची स्थिती बदलणे आणि हाताला विश्रांती देणे यांमुळे त्रास कमी होऊ शकतो. मात्र, योग्य स्थितीत झोपूनही हा त्रास वारंवार होत असेल, तर त्यामागील कारण तपासून घेणे आवश्यक आहे.
२. मनगटाच्या नसांवर दाब आल्याने बोटांत जाणवतात मुंग्या
रात्री झोपताना हात सुन्न होण्यामागे कार्पल टनेल सिंड्रोम ही समस्याही असू शकते. मनगटातून जाणाऱ्या मध्यवर्ती नसेवर दाब आल्यामुळे हा त्रास होतो. त्यामध्ये विशेषतः अंगठा, तर्जनी आणि मधले बोट यांमध्ये मुंग्या येणे, बधिरपणा किंवा वेदना जाणवू शकतात.
काही व्यक्तींना रात्री हा त्रास अधिक जाणवतो. त्यामुळे झोपेतून जाग येण्याचीही शक्यता असते. हात वारंवार सुन्न होणे, बोटांमध्ये सतत मुंग्या येणे किंवा हाताने वस्तू पकडताना अडचण जाणवणे अशी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य तपासणी केल्यानंतरच या समस्येचे निदान करता येते.
३. मानेच्या समस्येमुळेही हात सुन्न होची शक्यता
हात सुन्न होण्याचे कारण केवळ हात किंवा मनगटापुरते मर्यादित नसते. मणक्यांमधील हाडे किंवा चकतीशी संबंधित समस्यांमुळे मानेतून हाताकडे जाणाऱ्या नसांवर दाब येऊ शकतो. अशा वेळी हातामध्ये मुंग्या येणे, वेदना जाणवणे किंवा हाताची ताकद कमी झाल्यासारखे वाटणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
हात सुन्न होण्यासोबत मानेत दुखणे किंवा वेदना खांद्यापासून हातापर्यंत जाणवणे, असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करून घेणे महत्त्वाचे आहे.
त्याशिवाय झोपताना कोपर बराच वेळ वाकवून ठेवल्यास किंवा त्यावर शरीराचे वजन पडल्यास त्या भागातील नसांवर दाब येऊ शकतो. त्यामुळे करंगळी आणि तिच्या शेजारील बोटामध्ये मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. म्हणून झोपताना हात आणि कोपर दीर्घकाळ अडचणीच्या स्थितीत राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
४. व्हिटॅमिन बी१२ची कमतरता किंवा मधुमेहही असू शकतो कारणीभूत
शरीरात बी१२ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास नसांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे मधुमेहामुळेही नसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हात किंवा पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, जळजळ जाणवणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
जर हात वारंवार सुन्न होत असेल, बधिरपणा बराच वेळ टिकत असेल किंवा हातामध्ये अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार रक्तातील साखरेची आणि बी१२ जीवनसत्त्वाची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. मात्र, प्रत्येक वेळी हात सुन्न होण्यामागे या जीवनसत्त्वाची कमतरता किंवा मधुमेहच असतो, असे नाही.
५. हात सुन्न होण्यासह ‘ही’ लक्षणे दिसल्यास घ्या तातडीची मदत
हात सुन्न होण्याचा प्रत्येक प्रसंग गंभीर असतोच, असे नाही. मात्र, अचानक हात सुन्न होण्यासोबत चेहऱ्याचा एक भाग अशक्त होणे, बोलताना अडचण येणे किंवा शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणे, अशी लक्षणे दिसल्यास तो पक्षाघाताचा संकेत असू शकतो. अशा वेळी वेळ न घालवता, तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
हात सुन्न होण्याचा त्रास वारंवार होत असेल, वाढत असेल किंवा त्यासोबत वेदना आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. लक्षणांचे नेमके कारण समजल्यास योग्य ते उपचार करणे शक्य होते.
(महत्त्वाची सूचना : हात सुन्न होण्यामागील कारण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळे असू शकते. वरील माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. ती वैद्यकीय तपासणी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याचा पर्याय नाही.)
