Ankur Warikoo Money Tips for Couples: पैशांचा विषय निघाला की अनेक जोडप्यांमध्ये वातावरण अचानक गंभीर होऊ लागतं. एकाला जास्त बचत करायची असते, तर दुसऱ्याला अधूनमधून मनसोक्त खर्च करायला आवडतो. घरखर्च, बिलं, कर्ज, बचत आणि भविष्यासाठीची आर्थिक उद्दिष्टं यावरून मतभेद होणं अगदी स्वाभाविक आहे. पण पैशांबाबतचे संवाद म्हणजे एकमेकांच्या खर्चाचा हिशोब मागणे नव्हे. उलट, दोघांनी मिळून आर्थिक निर्णय घेतले तर पैशांचा ताण कमी होण्यासोबतच नात्यातील विश्वासही वाढू शकतो. उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर अंकुर वारिकू यांनी जोडप्यांनी आर्थिक व्यवहार अधिक सहज आणि मजेशीर पद्धतीने हाताळण्यासाठी काही कल्पना सांगितल्या आहेत. त्यापैकी ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…
१. महिन्यातून एकदा दोघांनी मिळून बँक स्टेटमेंट पाहा
महिन्यातून एकदा शांतपणे बसून दोघांच्या बँक खात्यातून झालेला खर्च एकत्र पाहा. मात्र, यावेळी “हे कशासाठी खर्च केलेस?” असा जाब विचारण्याऐवजी त्या महिन्यात पैसे नेमके कुठे खर्च झाले, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखादं विसरलेलं सबस्क्रिप्शन, अनावश्यक खर्च किंवा नकळत वाढलेला एखादा खर्चही या निमित्ताने लक्षात येऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे चहा-कॉफी घेत निवांत संध्याकाळी हा आढावा घ्या. त्याला ‘फायनान्शियल डेट’ सारखं समजा.
२. दोघांनाही अनावश्यक वाटणारा एक खर्च बंद करा
प्रत्येक जोडप्याच्या खर्चामध्ये अशी एखादी गोष्ट असते, ज्यासाठी पैसे जात असतात; पण तिचा फारसा उपयोग होत नसतो. उदाहरणार्थ, वापरात नसलेली जिम मेंबरशिप, न पाहिलं जाणारं OTT सबस्क्रिप्शन किंवा आपोआप रिन्यू होणारी एखादी सेवा. दोघांनी मिळून असा एक अनावश्यक खर्च शोधून बंद केला, तर बचतीची सुरुवातही होईल आणि ‘तूच जास्त खर्च करतोस’ अशा आरोपांपासूनही चर्चा दूर राहील.
एकमेकांना फक्त एवढंच विचारा की, “आपण सध्या अशा कोणत्या गोष्टीसाठी पैसे देतोय, ज्याची आपल्याला खरंच गरज नाही?”
३. दर महिन्याला आर्थिक यश साजरं करा
बचत म्हणजे नेहमीच त्याग आणि कपात असं नाही. छोटं आर्थिक यश मिळालं तरी ते सेलिब्रेट करा. उदाहरणार्थ, कर्जाचा हप्ता वेळेवर भरला, किराणा बजेटमध्ये राहिला, काही रक्कम सेव्हिंगमध्ये जमा केली किंवा एखादा अनावश्यक खर्च टाळला तर त्याची दखल घ्या. यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही. उद्देश एकच ठेवा तो म्हणजे दोघांनी मिळून केलेली प्रगती जाणवणे.
४. दोघांचं एखादं स्वप्न ठरवा आणि त्यासाठी पैसे वाचवा
फक्त ‘पैसे वाचवायचे आहेत’ असं म्हटलं तर बचत कंटाळवाणी वाटू शकते. त्याऐवजी त्या बचतीमागे एखादं कॉमन गोल ठेवा. छोटीशी ट्रिप, घरासाठी एखादी वस्तू, नवीन फर्निचर, खास डिनर किंवा भविष्यातील मोठी खरेदी. जेव्हा बचत एखाद्या आवडत्या गोष्टीशी जोडली जाते, तेव्हा खर्च कमी करणं बंधनासारखं वाटत नाही. छोट्या ध्येयापासून सुरुवात करा आणि ते दोघांनी मिळून पूर्ण करा.
५. प्रत्येक वीकेंडला पैशांचा वेगळा अनुभव घ्या
पैशांबद्दलची चर्चा म्हणजे फक्त बिलं, बजेट आणि बचत याभोवती फिरण्याची गरज नाही. प्रत्येक वीकेंडला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. नवीन डेजर्ट ट्राय करा, एखाद्या नवीन रेस्टॉरंटमध्ये जा किंवा घरीच फिल्म नाईट करा. या कल्पनेमागचा मुद्दा म्हणजे पैशांकडे फक्त खर्च म्हणून न पाहता अनुभव आणि आनंदाशीही जोडणं.
पैशांवर चर्चा करताना ‘तू’पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचं!
नात्यात आर्थिक पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे. मात्र, त्यासाठी एकमेकांच्या खर्चावर सतत नजर ठेवण्यापेक्षा दोघांनी मिळून आर्थिक निर्णय घेणं अधिक महत्त्वाचं आहे. ‘तू एवढे पैसे का खर्च केलेस?’ याऐवजी ‘आपला खर्च कुठे कमी करता येईल?’ असा प्रश्न विचारला तर चर्चेचा सूरच बदलतो. शेवटी पैसा हा नात्यातील वादाचा विषय न राहता दोघांनी मिळून हाताळायची जबाबदारी बनला, तर आर्थिक ताण कमी करण्यासोबतच नात्यातील समजूतदारपणाही वाढू शकतो.
