How to Get Rid of Ants in Flower Pot: घराच्या बाल्कनीत, गच्चीत किंवा अंगणात लावलेली हिरवीगार रोपं पाहून मन प्रसन्न होतं. मात्र, अनेकदा झाडांची नीट काळजी घेत असूनही त्यांची वाढ अचानक मंदावते. पाने पिवळी पडू लागतात, रोपं कमकुवत दिसू लागतात आणि मातीमध्ये छोट्या छोट्या भोकांचे जाळं तयार झाल्याचं दिसतं. अशा वेळी अनेक जण खत, पाणी किंवा उन्हाला दोष देतात; पण प्रत्यक्षात त्यामागे एक वेगळंच कारण दडलेलं असू शकतं.
कुंडीतील मातीमध्ये लाल किंवा काळ्या मुंग्यांनी आपलं घर बनवलं असेल, तर त्याचा परिणाम रोपांच्या वाढीवर होऊ शकतो. विशेष म्हणजे सुरुवातीला ही समस्या फारशी गंभीर वाटत नाही; मात्र वेळेत उपाय न केल्यास झाडांना त्रास होऊ शकतो.
मुंग्या कुंडीकडे का आकर्षित होतात?
बागकाम करणाऱ्या अनेकांना हा प्रश्न पडतो. तज्ज्ञांच्या मते, रोपांवर आढळणारे अॅफिड्स, मिलीबग्स यांसारखे कीटक मुंग्यांना आकर्षित करतात. त्याशिवाय कोरडी माती, गोड पदार्थांचे अंश किंवा मातीतील योग्य आर्द्रतेचा अभाव यांमुळेही मुंग्या कुंडीत घर करू शकतात.
एकदा का त्यांनी बिळं तयार केली की, मातीचा पोत बदलू लागतो. परिणामी मुळांपर्यंत पाणी आणि पोषक द्रव्ये व्यवस्थित पोहोचण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
सर्वांत आधी काय कराल?
मुंग्या दिसताच घाबरण्याची गरज नाही. सर्वप्रथम कुंडी हलक्या हाताने हलवा. त्यानंतर एखाद्या लाकडी काठीच्या मदतीने माती हलकीशी उकरून भुसभुशीत करा. त्यामुळे मातीच्या आत लपलेल्या अनेक मुंग्या बाहेर पडू शकतात.
त्यासोबतच माती नियमित सैल ठेवणे आणि वेळेवर पाणी देणेही महत्त्वाचे आहे. कठीण आणि कोरड्या मातीत मुंग्या अधिक सहजपणे बिळं तयार करतात.
घरगुती उपायही ठरू शकतात फायदेशीर
अनेक बागकामप्रेमी दालचिनी पावडर वापरण्याचा सल्ला देतात. दालचिनीचा तीव्र सुगंध मुंग्यांना आवडत नसल्याने तो त्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो. कुंडीच्या कडांवर आणि मातीवर थोडी दालचिनी पावडर शिंपडली जाऊ शकते.
त्याशिवाय कडुनिंबाचे तेलही उपयुक्त मानले जाते. एक लिटर पाण्यात १० ते १५ थेंब कडुनिंबाचे तेल मिसळून, रोप आणि मातीवर फवारणी केली जाऊ शकते.
काही जण पांढरा व्हिनेगर वापरण्याचाही सल्ला देतात. अर्धा कप पाणी आणि अर्धा कप व्हिनेगर एकत्र करून, तयार केलेले मिश्रण कुंडीभोवती फवारल्यास मुंग्यांच्या हालचाली कमी होण्यास मदत होऊ शकते.
उरलेल्या कॉफी पावडरचाही वापर अनेक जण करतात. यामुळे मुंग्या दूर राहण्यास मदत होऊ शकते आणि मातीला काही प्रमाणात पोषक घटकही मिळू शकतात.
बाजारात कीटकनाशक खडू सहजगत्या मिळतो. साधारण १० ते १५ रुपयांत मिळणारी हा पांढरा खडू अनेक घरांमध्ये झुरळे आणि मुंग्या दूर ठेवण्यासाठी वापरला जातो.
कुंडीच्या कडा किंवा तिच्या आसपास या खडूने जाड रेषा काढल्यास मुंग्यांची वर्दळ कमी होऊ शकते, असा अनेकांचा अनुभव आहे. काही जण तिची पावडर करून, कुंडीभोवती टाकण्याचाही सल्ला देतात.
मात्र कोणताही उपाय वापरण्यापूर्वी रोपांची स्थिती, मातीचा प्रकार आणि सुरक्षितता लक्षात घेणे आवश्यक आहे. नियमित निगा, योग्य पाणी आणि स्वच्छता राखल्यास तुमची रोपं अधिक योग्य आणि बहरलेली राहू शकतात.
