अलीकडच्या काळात भारतात भ्रमणध्वनीतील अ‍ॅपचा वापर ८० टक्क्यांनी वाढला असून भारतातील स्मार्टभ्रमणध्वनीधारक दिवसातील सरासरी अडीच तास या अ‍ॅपवर घालवतो, अशी नोंद समोर आली आहे. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचा शोध, आवडीचा अन्नपदार्थ घरपोच मागविण्यासारख्या किरकोळ गोष्टींसाठीही अ‍ॅपचा आधार घेतला जात आहे.

भ्रमणध्वनीद्वारे सहज उपलब्ध होणारी विविध अ‍ॅप अनेक कारणांसाठी उपयुक्त ठरत आहेत. अगदी दैनंदिन कामांपासून व्यावसायिक कामेही या अ‍ॅपचा आधार घेऊन केली जात आहेत. बदलत्या गरजा लक्षात घेऊन आजघडीला तब्बल साडेसहा कोटी अ‍ॅप उपलब्ध असून यात आरोग्य, खाद्यपदार्थ, पर्यटन, संवाद साधण्यासोबत क्रीडा, मनोरंजन, ताज्या बातम्यांसह वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवणाऱ्या अ‍ॅप्सचा यात समावेश आहे.

सध्या व्यावसायिक अ‍ॅप्सची संख्या आणि वापर वाढतो आहे. संवाद साधण्यासाठी निमित्त ठरणारी आणि मनोरंजविश्वातील ताज्या घडामोडी एका क्लिक्वर उपलब्ध करून देणारी अ‍ॅप भारतात सर्वात लोकप्रिय आहेत. अ‍ॅड्रॉइड प्रणालीवरील प्रत्येक स्मार्टफोनधारक सरासरी अडीच तास अ‍ॅप्समध्ये गुंतून पडत असल्याची माहिती डिजिटल माध्यम व्यवस्थापक आदित्य पाटील यांनी दिली.

समाजमाध्यम व्यवस्थापक प्रवीण सामंत यांनी सांगितले, सध्या भ्रमणध्वनी ब्राउझर (वेब), संगणकापेक्षा भ्रमणध्वनी अ‍ॅप्सचा वापर वाढताना दिसत आहे. संगणक आणि लॅपटॉपच्या तुलनेत ५४ टक्के भ्रमणध्वनीधारक अ‍ॅप्सचा वापर करत आहेत. कार्यालयात किंवा इतर वेळी संगणकाचा वापर करता येत नाही. भ्रमणध्वनी नेहमीच जवळ असल्याने वेगवेगळी अ‍ॅप्स वापरण्याचे प्रमाण वाढत आहे.