जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन अर्थात आयफोन बनवणाऱ्या अ‍ॅपल कंपनीचा सप्टेंबरमध्ये होणारा वार्षिक कार्यक्रम ही तंत्र जगताचे आकर्षण केंद्र असते. खरंतर हा अ‍ॅपलच्या वर्षभरात येऊ घातलेल्या नवनवीन गॅझेटच्या सादरीकरणाचा सोहळा. पण अ‍ॅपलचे सहसंस्थापक सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी या सोहळ्याला एक ‘ग्लोबल इव्हेंट’ बनवले. सुरुवातीच्या काळात  जॉब्स यांचे भाषण आणि नवीन आयफोनचे त्यांच्याकडून होणारे सादरीकरण हा साऱ्यांच्याच कुतूहलाचा विषय असायचा. आयफोन, आयपॅड किंवा आयओएसमध्ये केल्या जाणाऱ्या नव्या तांत्रिक वैशिष्टय़ांचे सादरीकरण होत असताना तो सोहळा ऑनलाइन पाहणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असायची. २०११ मध्ये जॉब्स यांच्या मृत्यूनंतर टिम कूक यांच्याकडे ती जबाबदारी आली. त्यानंतर अ‍ॅपलच्या या वार्षिक सोहळ्याभोवती असणारे वलय काहीसे कमी झाले आहे. मात्र तरीही अ‍ॅपलच्या नवीन उत्पादनांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते. विशेष म्हणजे, तंत्रजगतात आगामी आयफोन, आयपॅड, आयओएस किंवा अन्य अ‍ॅपल गॅझेटबाबत वर्षभर चर्चा सुरू असते. या चर्चेला सप्टेंबरमधील सोहळ्यातून पूर्णविराम मिळतो.

यंदाचा वार्षिक कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी ऑनलाइन माध्यमातून पार पडला. या सोहळ्यात अपेक्षेप्रमाणे अ‍ॅपलने आयफोन १३ आणि अन्य गॅझेटची घोषणा केली. यातील बहुतांश उत्पादनांच्या खरेदीसाठी १७ सप्टेंबरच्या पहाटेपासून आगाऊ नोंदणी सुरू होणार आहे. तसेच २४ सप्टेंबरपासून या उत्पादनांची विक्री सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच अ‍ॅपलने भारतातील स्टोअरवरही १७ सप्टेंबरपासूनच नोंदणी सुरू होणार आहे. आतापर्यंत अमेरिका आणि युरोपमधील

देशांतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये ही उत्पादने आधी उपलब्ध होत आणि मग काही काळाने ती भारतासह आशियाई बाजारांत उपलब्ध करून दिली जात. मात्र यंदा अ‍ॅपलने भारतीय बाजारालाही तेवढेच महत्त्व देत नोंदणी व विक्री एकाच वेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅपलच्या या वर्षीच्या कार्यक्रमात सादर झालेले गॅझेट आणि त्यांची किंमत थोडक्यात जाणून घेऊयात.

आयफोन १३

अपेक्षेप्रमाणे अ‍ॅपलने आयफोनची नवी आवृत्ती जाहीर केली असून ‘आयफोन १३’ या नावाने ती ओळखली जाणार आहे. या फोनमधील डय़ुअल कॅमेरा आतापर्यंतच्या आयफोनमधील सर्वात शक्तिशाली असेल, असा कंपनीचा दावा आहे. अ‍ॅल्युमिनियमची बांधणी असलेल्या या फोनच्या बॉडीमध्ये सिरॅमिक आणि काच यांचा मेळ साधण्यात आला आहे. ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, १७३ ग्रॅम वजन, ए१५ बायोनिक चिप अशी वैशिष्टय़े आहेत. या फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला असून यात वाइड आणि अल्ट्रा वाइड कॅमेऱ्याने फोटो काढण्याची सुविधा असेल. हा फोन ५ जी तंत्रज्ञानासाठी सज्ज असणार आहे. यातील बॅटरीच्या क्षमतेची माहिती अ‍ॅपलने दिलेली नसली तरी, व्हिडीओ प्लेबॅकसह ती १७ तास चालू शकते, असा कंपनीचा दावा आहे. ही बॅटरी ३० मिनिटांत ५० टक्के चार्ज होते, असेही कंपनीने म्हटले आहे. आयफोन १३वर आयओएस १५ ऑपरेटिंग सिस्टीम असणार असून यात वापरकर्त्यांची गोपनीयता जपण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यासोबतच अ‍ॅपलने आयफोन मिनी १३ ही सादर केला असून त्यामध्ये स्क्रीनचा आकार काहीसा कमी असणार आहे. दोन्ही फोनमध्ये १२८, २५६ आणि ५१२ जीबी स्टोअरेजची सुविधा आहे. या दोन्ही आयफोनसाठी आगाऊ नोंदणी १७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २४ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष विक्री सुरू होईल. आयफोन १३ मिनी हा ६९९०० रुपयांना तर आयफोन १३ ७९९०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. तसेच स्मार्टफोन एक्स्चेंजच्या योजनेंतर्गत या दोन्ही फोनवर २० हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.

आयफोन १३ प्रो

आयफोन १३ सादर करतानाच अ‍ॅपलने आयफोन १३ प्रो हा अधिक प्रगत आणि सुविधांनी सज्ज फोनही सादर केला आहे. आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स अशा दोन श्रेणींत हा फोन उपलब्ध होणार आहे. यापैकी १३ प्रोमध्ये ६.१ इंची तर प्रो मॅक्समध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. आकारातील फरक वगळता दोन्ही आयफोनमधील अन्य वैशिष्टय़े जवळपास सारखीच आहेत. यात १२ मेगापिक्सेलचा प्रो कॅमेरा पुरवण्यात आला असून त्याद्वारे टेलिफोटो, वाइड आणि अल्ट्रा वाइड अँगलचे फोटो टिपता येतात. यात ४ के व्हिडीओ रेकॉर्डिगचीही सुविधा आहे. यामध्ये ऑडिओ झूमचीही सुविधा पुरवण्यात आली आहे. या फोनमध्ये २२ तासांच्या व्हिडीओ प्लेबॅकची सुविधा देणारी बॅटरी पुरवण्यात आली आहे. आयफोन १३ प्रो १ लाख १९ हजार ९०० रुपये किमतीचा असून त्यात दहा हजार रुपयांची भर टाकून प्रो मॅक्स खरेदी करता येईल. दोन्ही फोनवर एक्स्चेंजच्या माध्यमातून जवळपास ४० हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

आयपॅड

अ‍ॅपलने आयपॅडचीही नवी आवृत्ती आणली असून त्यात १०.२ इंच आकाराचा डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. ऑनलाइन अभ्यास करण्यापासून वाचन करण्यापर्यंत आणि गेम खेळण्यापासून नकाशे बनवण्यापर्यंत विविध कामांसाठी आयपॅड उपयुक्त असल्याचा अ‍ॅपलचा दावा आहे. यामध्ये ए१३ बायोनिक चिप पुरवण्यात आली असून त्याद्वारे आयपॅडवर अधिक क्षमतेचे अ‍ॅपही सहज चालवता येतील, असे कंपनीने म्हटले आहे. यातील जीपीयू यंत्रणा २० टक्के जलद काम करत असल्याने उच्च क्षमतेचे ग्राफिक्सही अतिशय चांगल्या तऱ्हेने दिसतात, असे अ‍ॅपलने म्हटले आहे. त्याला आयओएस १५ या नव्या ऑपरेटिंग सिस्टीमची जोड पुरवण्यात आली आहे. यातील बॅटरी एक दिवस पूर्णपणे व्यवस्थित चालते, असेही कंपनीने म्हटले आहे. आयपॅड ६४ जीबी आणि २५६ जीबी स्टोअरेज क्षमतेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातील ६४ जीबी स्टोअरेज असलेल्या आयपॅडची किंमत ३०९०० रुपये इतकी असून २५६ जीबी क्षमतेच्या आयपॅडसाठी ४४९०० रुपये मोजावे लागतील.