हेडफोनच्या सेगमेंटमध्ये सोनी, बोस आणि Sennheiser यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांना आता जोरदार टक्कर मिळणार आहे. कारण, दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलने Over-Ear हेडफोन AirPods Max लाँच केले आहेत. अ‍ॅपलच्या या नव्या वायरलेस हेडफोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर देण्यात आलं आहे. लाँच झाल्यापासून या हेडफोनच्या किंमतीबाबत आणि डिझाइनबाबत सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. हे हेडफोन आतापर्यंतच्या सर्वात महागड्या हेडफोन्सपैकी एक असल्याचं बोललं जात आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स :-
अ‍ॅपलच्या AirPods Max मध्ये अनेक वेगळे फिचर्स देण्यात आलेत. यामध्ये एडेप्टिव EQ, अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन सारखे फिचर्स आहेत. तसंच, प्रीमियम वायरलेस ब्लूटूथ 5.0 ऑडिओच्या अनुभवासाठी अ‍ॅपलच्याच H1 चिपचा सपोर्टही आहे. याशिवाय, स्पॅटियल ऑडिओ, ट्रांसपरन्सी मोड यांसारखे अ‍ॅडव्हान्स फिचर्सही आहेत. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 20 तासांपर्यंतचा कॉलिंग किंवा म्यूझिक बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. AirPods Max च्या बॉडीबाबत बोलायचं झाल्यास, कंपनीने फिजिकल कंट्रोल आणि अ‍ॅडव्हान्स सेन्सरची योग्य सांगड घातलीये. यात अ‍ॅपल वॉचशी प्रेरीत एक डिजिटल क्राउन आहे, व्हॉल्यूम कंट्रोलसोबतच, ऑडिओ प्ले किंवा पॉज आणि ट्रॅकचाही पर्याय आहे. म्हणजे युजर्स कॉलिंगला कंट्रोल करु शकतात. तसेच या हेडफोनला स्टेनलेस स्टील हेडबँड दिलं आहे. म्हणजे डोक्याच्या आकाराप्रमाणे स्टील हेडबँड अ‍ॅडजस्ट करता येईल. हे हेडफोन्स सध्या स्पेस ग्रे, सिल्वर, स्काय ब्लू, ग्रीन आणि पिंक अशा पाच कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

किंमत आणि उपलब्धता :-
अमेरिकेत या हेडफोन्ससाठी प्री ऑर्डर 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. पण, भारतात 15 डिसेंबरपासून ऑनलाइन किंवा अ‍ॅपल स्टोअरमध्ये हे हेडफोन उपलब्ध असतील. भारतात ‘एअरपॉड्स मॅक्स’ची किंमत 59 हजार 900 रुपये इतकी आहे. या हेडफोन्सच्या किंमतीचा खुलासा झाल्यापासून सोशल मीडियामध्ये युजर्स हे हेडफोन iPhone 11 पेक्षाही महाग असल्याची चर्चा करत आहेत.