आयफोन १३, १३ प्रो : एक पाऊल पुढे

अ‍ॅपलने महिन्याभरापूर्वी जगभरात दाखल केलेल्या ‘आयफोन १३’ आणि ‘१३ प्रो’कडे पाहताक्षणी त्याची नेमकी प्रचीती येते.

आसिफ बागवान

गेल्या वर्षी आयफोन १२ बाजारात आला तेव्हा त्यातील वैशिष्टय़ांनी स्मार्टफोनच्या उर्वरित उत्पादनांसमोर खडतर आव्हाने उभी केली. त्याला टक्कर देण्यासाठी मोठमोठय़ा कंपन्यांचे ‘फ्लॅगशिप’ फोन सज्ज होताहेत न तोच ‘आयफोन १३’ आणि ‘१३ प्रो’ यांनी आयफोनला नवीन उंची मिळवून दिली आहे.

अ‍ॅपलच्या गेल्या काही वर्षांत आलेल्या आयफोनचे सर्वात प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे तो पाहताक्षणी नजरेत भरतो. कोणताही नवा स्मार्टफोन जेव्हा ‘अनबॉक्स’ होतो, तेव्हा त्यावर नजर किती वेळ खिळून राहते, हेच त्या स्मार्टफोनच्या सौंदर्याचं परिमाण असतं. गेल्या चार-पाच आवृत्त्यांमधील आयफोनच्या बाबतीत हे प्रथमदर्शनी प्रेम अंमळ जास्तच असतं आणि प्रत्येक आवृत्तीगणिक सौंदर्याचं परिमाण ठरणारी पहिली नजर अधिकाधिक खिळून राहते. ताज्या ताज्या घडवलेल्या एखाद्या संगमरवरी शिल्पाकडे पाहताना जाणवणारी चमक, सुबक सौंदर्य आणि कमनीय भक्कमपणा जसं लक्ष वेधून घेतो, तसं आयफोनच्या बाबत घडतं. अ‍ॅपलने महिन्याभरापूर्वी जगभरात दाखल केलेल्या ‘आयफोन १३’ आणि ‘१३ प्रो’कडे पाहताक्षणी त्याची नेमकी प्रचीती येते.

गेल्या महिन्यात कॅलिफोर्नियात झालेल्या वार्षिक परिषदेत अ‍ॅपलने आयफोन १३, १३ मिनी, १३ प्रो आणि १३ प्रो मॅक्स ही उत्पादने अधिकृतपणे बाजारात आणल्याचे जाहीर केले. चारही आयफोनची आगाऊ नोंदणी १७ सप्टेंबरला सुरू झाली आणि २४ सप्टेंबरपासून त्याची अधिकृत विक्रीदेखील सुरू झाली. आम्हाला यापैकी ‘१३’ आणि ‘१३ प्रो’ हे दोन आयफोन हाताळण्याची संधी मिळाली. काही अपवाद वगळता दोन्ही उत्पादनांमध्ये फारसे फरक नसल्याने दोन्हींबाबतचा आमचा अनुभव येथे एकाच लेखाद्वारे मांडत आहोत.

बांधणी, बाह्य़रूप :  वर म्हटल्याप्रमाणे आधीच्या आयफोनपेक्षा अधिक आकर्षक अशी बांधणी असलेला आयफोन १३ नजरेत पाहताक्षणी भरतो. हा फोन फिकट गुलाबी, निळा, काळा, पांढरा आणि लाल अशा रंगांत उपलब्ध आहे. आमच्याकडे हाताळणीसाठी आलेल्या आयफोनचा रंग फिकट गुलाबी होता. हा रंग फिकट असला तरी, त्याची झळाळी दडून राहात नाही. पुढच्या बाजूला ‘सिरॅमिक शिल्ड’ची बांधणी असल्याने फोनचा भक्कमपणा हातात धरताक्षणी जाणवतो. फोनला अ‍ॅल्युमिनियमची फ्रेम पुरवण्यात आली असून त्यामुळे त्याचे बाह्य़रूप अधिक खुलते. ‘आयफोन १३ प्रो’ची बांधणीदेखील याच धर्तीवर करण्यात आली आहे. मात्र, त्याला उच्च दर्जाची स्टीलची फ्रेम पुरवण्यात आली आहे. त्यामुळे ‘१३ प्रो’ अधिक उठावदार दिसतो. दोन्ही फोनना ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. मात्र, ‘१३ प्रो’मध्ये ‘प्रो मोशन’ तंत्रज्ञानाची डिस्प्लेला जोड देण्यात आली आहे. त्यामुळे या फोनमध्ये टच स्क्रीनचा अनुभव अधिक संपन्न आहे. फोनच्या डिस्प्लेद्वारे स्क्रोल करताना किंवा इंटरफेस हाताळताना त्याचा वाढलेला वेग सहज जाणवतो. दोन्ही फोनना पाण्यापासून संरक्षणही पुरवण्यात आले असून सहा मीटर खोलीपर्यंत ३० मिनिटे हा फोन पाण्याखालीही काम करू शकतो.

कॅमेरा आणि छायाचित्रण

अ‍ॅपलने गेल्या काही वर्षांत आणलेल्या सर्वच आयफोनमध्ये कॅमेऱ्याला अधिक महत्त्व दिले आहे. वापरकर्त्यांमध्ये मोबाइल छायाचित्रणाबद्दल वाढलेली ओढ आणि त्यातून निर्माण झालेली अधिक कलात्मक तंत्रज्ञानाची गरज यांचा पुरेपूर विचार दोन्ही फोनच्या कॅमेऱ्यांमध्ये करण्यात आला आहे. अर्थात, दोन्ही फोनमध्ये कॅमेऱ्यांची वैशिष्टय़े वेगवेगळी आहे. ‘आयफोन १३’मध्ये मागील बाजूस दोन कॅमेरे पुरवण्यात आले असून त्याद्वारे वाइड, अल्ट्रावाइड छायाचित्रणाची सुविधा आहे. अ‍ॅपलने ‘आयफोन १२ प्रो मॅक्स’मध्ये ‘सेन्सर शिफ्ट ओआयएस’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला होता. तेच तंत्रज्ञान या फोनमध्येही असून त्यामुळे एखादे दृश्य टिपताना सेन्सरमुळे छायाचित्र अधिक सुस्पष्ट आणि स्थिर टिपले जाते. शिवाय छायाचित्रातील कमी प्राकशित भागही मूळ प्रकाशाचा पोत न बदलता अंधाऱ्या भागातील वस्तू अधिक स्पष्टपणे छायाचित्रात उमटतात. ‘आयफोन १३ प्रो’ याहून एक पाऊल पुढे आहे. यामध्ये ‘आयफोन १३’पेक्षाही अधिक मोठा सेन्सर असलेले तीन कॅमेरे आणि टेलिफोटो लेन्सही आहे. त्यामुळे दृश्यातील सूक्ष्म गोष्टीही सुस्पष्टपणे छायाचित्रातून उमटतात. आम्ही आजवर हाताळलेल्या कोणत्याही स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या तुलनेत ‘आयफोन १३’ श्रेणीतील कॅमेरे अधिक दर्जेदार आहेत. कमी प्रकाशित भागात पोट्रेट काढल्यानंतर छायाचित्रात धूसर काळोख जाणवत नाही. उलट त्यातील ‘डार्कनेस’ उर्वरित भागातील प्रकाशाला पूरक ठरतो.

दोन्ही फोनमध्ये अ‍ॅपलने सिनेमॅटिक व्हिडीओची सुविधा दिली असून याद्वारे तुम्ही चित्रीकरण केल्यानंतर त्यात ‘एडिटिंग’ करून अपेक्षित परिणाम साध्य करू शकता. या कॅमेऱ्यांतील चित्रीकरणाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे चित्रीकरण होत असताना त्यातील फोकस कोणत्या भागावर असावा, हे कॅमेरे अगदी अचूकपणे हेरतात. त्यामुळे तुम्हाला चित्रीकरण करताना वेगळे श्रम घ्यावे लागत नाहीत. आम्ही एका बगिच्यात हिंडणाऱ्या फुलपाखराचे चित्रीकरण करून पाहिले असताना फुलपाखरावर फोकस ठेवून चित्रण होत असताना त्याच्या पुढे आलेल्या फुलावर आपसूक फोकस सरकला. त्यामुळे चित्रण अधिक प्रभावी होते.

इंजिनच्या किमयेला बॅटरीची शक्ती

‘आयफोन १३’च्या सर्व आवृत्त्यांमध्ये अ‍ॅपलने अद्ययावत ए १५ बायोनिक इंजिन पुरवले आहे. त्यामध्ये सहा कोअर प्रोसेसर असून त्यातील दोन उच्च क्षमतेचे कोअर असून उर्वरित चार वेग वाढवण्याचे काम करतात. या प्रोसेसरचा प्रभाव आपल्याला आयफोन हाताळणीच्या प्रत्येक टप्प्यावर दिसतो. सर्व अ‍ॅप किंवा अगदी नियमित प्रक्रियाही अतिशय वेगाने आणि सुलभतेने होतात. बायोनिकच्या क्षमतेची चाचणी करण्यासाठी आम्ही काही उच्च दर्जाचे गेम ‘आयफोन १३’वर चालवून पाहिले. त्यात एकदाही इंटरफेस संथ झाल्याचे वा अडकल्याचे जाणवले नाही. आयफोनचे कॅमेरे अधिक दर्जेदार होण्यास हे इंजिनही तितकेच कारणीभूत आहे.

अ‍ॅपल कोणत्याही आयफोनच्या बॅटरीच्या क्षमतेची माहिती देत नाही. त्यामुळे ‘आयफोन १३’मधील बॅटरीची तांत्रिक माहिती उलगडून सांगणे कठीण आहे, परंतु आयफोन १२ प्रोच्या तुलनेत या दोन्ही फोनच्या बॅटऱ्या अधिक शक्तिशाली असल्याचे अ‍ॅपलचे म्हणणे आहे. वापर करताना बॅटरीची उत्पादकता जाणवते. दिवसभर नियमित कारणासाठी वापर केल्यानंतरही बॅटरी टिकून राहत असल्याचे आमच्या तपासणीत आढळून आले.

‘आयफोन १३’ आणि ‘१३  प्रो’ या दोन्हींमध्ये ठळक आणि इतरांपेक्षा सरस ठरतील अशी प्रमुख वैशिष्टय़े अनेक आहेत. त्यातील तीन प्रमुख वैशिष्टय़े या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला. आता राहिला मुद्दा किमतीचा. ‘आयफोन १३’ हा ७९९०० रुपयांपासून उपलब्ध आहे तर ‘आयफोन १३ प्रो’ हा १ लाख १९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होतो. दोन्ही आयफोनच्या खरेदीवर अ‍ॅपलने दिवाळीच्या तोंडावर काही सवलती जाहीर केल्या आहेत. शिवाय जुन्या आयफोनला बदली मूल्यही घसघशीत देऊ केले आहे. भारतीय सामान्य वापरकर्त्यांचा विचार करता ‘आयफोन १३ प्रो’ हा आवाक्याच्या बाहेर आहे, तर ‘आयफोन १३’ खरेदी करण्यापूर्वी ग्राहक थबकतील, हे नक्की. मात्र, आयफोनचे अस्सल चाहते त्याचे मूल्य नक्कीच जाणतात. स्मार्टफोनमधील वापरकर्त्यांची गोपनीयता, माहितीचा गैरवापर, सुरक्षितता या गोष्टी कळीचा मुद्दा ठरू पाहात असताना ‘आयफोन’ या ब्रॅण्डने नेहमीच त्याभोवती भक्कम तटबंदी तयार करणारी कार्यप्रणाली वापरकर्त्यांना पुरवली आहे. ‘आयफोन १३’ श्रेणीतील उत्पादनेही त्याला अपवाद नाहीत. किंमत जास्त असली तरी, आपल्याला त्यातून मिळणारा स्मार्टफोन वापराचा संपन्न अनुभव आयफोन नेहमीच देतो. त्याबाबतीत ‘आयफोन १३’ एक पाऊल पुढे आहे.

कॅमेरा सांभाळण्याची कसरत

दोन्ही आयफोनचे कॅमेरे दर्जेदार आणि विविध वैशिष्टय़ांनी समृद्ध असले तरी त्यातील एक खटकणारी गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी. ती म्हणजे, मागील बाजूस असलेल्या कॅमेऱ्यांचा बाहेर आलेला भाग. ‘आयफोन १३’मध्ये सपाट पृष्ठभागाशी समतल असलेला कॅमेऱ्यांचा भाग न देता अ‍ॅपलने कॅमेऱ्यांचा भाग थोडासा बाहेर घेतला आहे. त्यामुळे मागील बाजूच्या तुलनेत कॅमेऱ्यांचा भाग पृष्ठभागावर सर्वप्रथम टेकतो. अशा वेळी खडबडीत पृष्ठभागावर घासले जाऊन लेन्स खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अ‍ॅपलने दोन्ही फोनसाठी वैशिष्टय़पूर्ण केस (कव्हर) उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्या केससाठीही वापरकर्त्यांना काही हजार रुपये मोजावे लागू शकतात. अर्थात, फोनचा सांभाळून आणि काळजीपूर्वक वापर करणाऱ्यांसाठी ही खबरदारी घेताना फारशी अडचण येणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apple introducing iphone 13 and 13 pro zws

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या