Apple vs Banana Benefits: सफरचंद आणि केळी ही अशी दोन फळे आहेत, जी जवळपास वर्षभर सहज उपलब्ध असतात. देशात आणि जगभरात या दोन्ही फळांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यातील पोषक तत्त्वे. मात्र, सफरचंद आणि केळी यापैकी कोणते फळ जास्त फायदेशीर आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर अगदी सोपे आहे.
दोन्ही फळे आरोग्यासाठी चांगली आहेत, पण दोन्ही वेगवेगळे पोषक घटक देतात. सफरचंदामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते, तर केळ्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि कार्बोहायड्रेट भरपूर असतात. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही फळांची स्वतःची वेगळी खासियत आहे आणि दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
आहारतज्ज्ञ दिव्या प्रकाश यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले की, जसे आपल्या हाताच्या प्रत्येक बोटाचे वेगळे महत्त्व असते, तसेच सफरचंद आणि केळी या दोन्ही फळांचेही आरोग्यासाठी खास महत्त्व आहे. सफरचंदामध्ये भरपूर फायबर असते. विशेषतः त्याच्या सालीत जास्त फायबर असल्यामुळे सफरचंद सालीसह खावे. फायबरमुळे पचन सुधारते आणि पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जेवणाच्या मध्ये वारंवार काही खाण्याची इच्छा होत नाही. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे विद्रव्य फायबरही असते, जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
केळे आणि सफरचंदातील पोषक तत्त्वे
पोषणाच्या दृष्टीने केळेही खूप चांगले फळ आहे. त्यात पोटॅशियम भरपूर असते. पोटॅशियम हे स्नायू आणि मज्जातंतू योग्य प्रकारे काम करण्यासाठी तसेच शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असते. मध्यम आकाराच्या एका केळ्यात सुमारे ४२० मिग्रॅ पोटॅशियम असते, तर मध्यम आकाराच्या एका सफरचंदामध्ये सुमारे १९५ मिग्रॅ पोटॅशियम असते. त्यामुळे व्यायाम करणारे अनेक जण केळे खाणे पसंत करतात. मात्र, फक्त पोटॅशियमसाठीच केळे खाणे गरजेचे नाही. पोटॅशियमसाठी बटाटे, बीन्स, डाळी आणि पालक यांचाही आहारात समावेश करू शकता.
पचनासाठी सफरचंद चांगले की केळे?
md lines हेल्थ इनसाइटनुसार, संतुलित आहारात सफरचंद आणि केळी दोन्हींचा समावेश करता येतो. सफरचंदामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे शौचाची प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. केळेही अनेकांना सहज पचते. हलके काही खायचे असल्यास केळे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सफरचंदामध्ये काही प्रकारचे कार्बोहायड्रेट असतात, जे काही लोकांच्या पोटात आंबू शकतात. त्यामुळे काहींना सफरचंद खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा जड वाटू शकते. तर काहींना सफरचंद खाल्ल्यानंतर कोणतीही अडचण होत नाही. तसेच काही लोकांना कच्च्या केळ्यापेक्षा पिकलेले केळे अधिक सहज पचते. त्यामुळे पचनासाठी कोणते फळ सर्वात चांगले आहे, याचे एकच ठाम उत्तर देता येत नाही.
वजन कमी करण्यासाठी कोणते फळ चांगले?
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सफरचंद किंवा केळे खाण्याचा विचार करत असाल, तर सफरचंद अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण त्यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. मात्र, वजन कमी करण्याच्या आहारात केळ्याचाही समावेश करता येतो. वजन कमी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फळ कशा प्रकारे खाता.
साधे सफरचंद किंवा केळे खाणे आणि त्याच फळाचा साखर, आईस्क्रीम किंवा इतर जास्त कॅलरीच्या पदार्थांसोबत बनवलेला बनाना शेक पिणे यात मोठा फरक असतो. संपूर्ण फळ खाल्ल्याने फायबर मिळते आणि ते चावून खावे लागते. त्यामुळे फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.
हृदयाच्या आरोग्यासाठी कोणते फळ चांगले?
सफरचंद आणि केळी दोन्हीही हृदयासाठी चांगल्या आहाराचा भाग ठरू शकतात. सफरचंदामध्ये फायबर आणि पॉलीफेनॉल्स असतात, तर केळ्यात पोटॅशियम असते. या दोन्ही फळांमुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. मात्र, फक्त फळे खाल्ल्यानेच हृदय निरोगी राहत नाही. त्यासोबत हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, बिया आणि सुका मेवा यांचाही आहारात समावेश असणे आवश्यक आहे.
मधुमेहात कोणते फळ चांगले?
सफरचंद आणि केळी या दोन्ही फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट असतात. तसेच दोन्ही फळांमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाणही चांगले असते. केळ्यातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण आणि त्याचा पोत हे ते किती पिकले आहे, यावर अवलंबून असते. पूर्णपणे पिकलेले केळे अधिक मऊ आणि गोड असते. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर कोणते फळ चांगले यापेक्षा ते किती प्रमाणात खाता आणि तुमचा संपूर्ण आहार कसा आहे, याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. फळांसोबत प्रथिने किंवा आरोग्यदायी चरबी असलेले पदार्थही खाऊ शकता. उदाहरणार्थ, साधे दही, बदाम आणि बिया यांचा समावेश करता येईल.
रोज खाण्यासाठी कोणते फळ चांगले?
जर सफरचंद आणि केळी हे दोन्ही तुमच्या रोजच्या आहारात बसत असतील, तर तुम्ही रोज यापैकी कोणतेही फळ खाऊ शकता. रोज फक्त सफरचंदच खाल्ले पाहिजे किंवा केळे टाळलेच पाहिजे, असे नाही. खरं तर वेगवेगळी फळे खाणे अधिक फायदेशीर असते, कारण प्रत्येक फळातून वेगवेगळे पोषक घटक मिळतात. जेव्हा तुम्हाला कुरकुरीत आणि फायबरयुक्त स्नॅक खायचा असेल, तेव्हा सफरचंद खा. जेव्हा शरीराला पटकन पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेटची गरज असेल, तेव्हा केळे खा. आणि जर तुम्हाला दोन्ही फळे आवडत असतील, तर आहारात विविधता ठेवण्यासाठी दोन्हींचेही सेवन करू शकता.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
