अॅपलचे कोणतेही नवे मॉडेल बाजारात येण्यापूर्वीच त्याबाबत बरीच चर्चा होते. अॅपलच्या उपकरणांकडे स्टेटस सिंबॉल म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळे अनेकांमध्ये याविषयीच्या चर्चा पाहायला मिळतात. सध्याही अॅपलच्या आयफोन एक्सची बरीच चर्चा सुरु असून, या फोनच्या डेमोपासून ते त्यात क्लिक केलेल्या पहिल्यावहिल्या सेल्फीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा गवगवा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ‘फेस आयडी’ असणाऱ्या नव्या बायोमेट्रीक फेस आयडी या तंत्रज्ञानामुळे आयफोन एक्स कुतूहलाचा विषय ठरत आहे. येत्या काही दिवसांत अॅपल कंपनीतर्फे आयपॅडमध्येही हे फिचर आणण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘आयफोन एक्स’मधील फक्त ‘फेस आयडी’ हे एकच फिचर आयपॅडच्या नव्या मॉडेलमध्ये घेण्याचा विचार करण्यात आला आहे असे नाही. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, २०१८ मध्ये अनावरण करण्यात येणाऱ्या या आयपॅडमध्ये आयफोन एक्सप्रमाणेच काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या आयपॅडची स्क्रीन १०.५ इंचांची व्हॅरिएंट स्क्रीन असून, त्यात बायोमेट्रीक फेस ऑथेन्टीकेशन, थ्री-डी इमोजी (अॅनिमोजी) हे सर्व फिचर नव्याने देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

‘फेस आयडी’चे फिचर देण्यात येणार असल्यामुळे आयपॅडमधून टच आयडीचे फिचर हटवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. २०१४ पासून आलेल्या सर्व आयपॅडमध्ये टच आयडीचे फिचर देण्यात आले होते. आयपॅडची स्क्रीन आणखी मोठी करण्यासाठी त्यातून टच आयडीचे फिचर हटवण्यात येणार असल्याचे कळत आहे. आयफोन एक्सप्रमाणेच आयपॅडचे डिझाईन असेल. त्यामुळे आता अॅपलप्रेमींमध्ये या आयपॅडविषयीसुद्धआ कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. आयपॅडच्या या नव्या मॉडेलची पहिली झलक येण्यापूर्वीच त्यात असणारे फिचरही अनेकांचे लक्ष वेधत आहेत.