Aloevera: अनेक वनस्पती अशा आहेत, ज्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये तुळस, कोरफड, अडुळसा अशा अनेक वनस्पतींचा समावेश होतो. त्यातच कोरफडविषयी पाहायला गेलं, तर कोरफड अनेक त्वचाविकार किंवा अन्य शारीरिक समस्यांवर गुणकारी आहे. विशेष म्हणजे कोरफड आपण आपल्या बागेत किंवा घरातील कुंडीतही सहजरीत्या लावू शकतो. पण, कोरफडीचा वापर सर्वांसाठी फायदेशीर असतो का?

खरे तर, आजकाल प्रत्येक जण आपल्या त्वचेबद्दल गंभीर आहे. कारण- जास्त धूळ, प्रदूषण, घाण, घाम इत्यादींमुळे चेहऱ्याची चमक नाहीशी होते आणि त्वचा कोरडी दिसू लागते. अशा परिस्थितीत बरेच लोक महागड्या रासायनिक उत्पादनांकडे वळतात; तर काही जण कोरफडीची मदत घेतात. कोरफड नेहमीच त्वचा, आरोग्य इत्यादींसाठी खूप फायदेशीर मानली गेली आहे. परंतु, हे आवश्यक नाही की, या वनस्पतीचा प्रत्येकाला फायदा होईल. या लेखात आम्ही तुम्हाला कोरफडीबद्दल आणि कोणत्या लोकांनी त्वचेच्या काळजीसाठी चुकूनही तिचा वापर करू नये याबद्दल सांगणार आहोत.

‘या’ लोकांसाठी कोरफड घातक

कोरफडीचा चुकीच्या पद्धतीने किंवा योग्य माहितीशिवाय वापर केल्यास फायद्यांऐवजी त्वचेच्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे कोणत्याही समस्या टाळण्यासाठी आणि त्याचे फायदे मिळवण्यासाठी, त्याचा वापर करण्यापूर्वी आपल्या त्वचेचा प्रकार आणि स्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, ज्यांना आपल्या त्वचेसाठी कोरफड वापरायची आहे, त्यांनी तिचा वापर करण्यापूर्वी आपला चेहरा पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुऊन घ्यावा.

कोरफड त्वचेसाठी फायदेशीर असू शकते; परंतु तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी कोरफडीचा गर जास्त काळ लावू नये. कारण- तो जास्त काळ त्वचेवर ठेवल्याने त्वचेवर लहान पुरळ येण्याची शक्यता असते, ज्यामुळे नंतर मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

‘या’ लोकांनीही काळजी घ्यावी

त्याव्यतिरिक्त ज्यांनी कॉस्मेटिक सर्जरी केली आहे, तसेच गर्भवती महिला आणि लहान मुलांनीदेखील त्यांच्या त्वचेवर कोरफड जेल लावणे टाळावे. कारण- त्यामुळे अॅलर्जीचा धोका वाढतो. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या त्वचेला कोरफड जेलची गरज आहे, तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या निर्देशानुसार त्याचा वापर करा.

कोरफडीचे फायदे

  • कोरफडीचा रस हा अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे कोरफडीचा ताजा गर किंवा सुकलेला गर या दोहोंचा वापर अनेक रोगांवर केला जातो.
  • अपचन होत असल्यास कोरफडीचा गर, हळद व सैंधव मीठ एकत्र करून घेतल्यास त्रास कमी होतो.
  • त्वचेवर भाजल्याचे किंवा चटका लागल्याचे व्रण, डाग असतील, तर त्यावर कोरफडीचा गर लावावा.
  • हाता-पायांची आग होत असल्यास कोरफडीचा गर लावावा. शरीराला थंडावा मिळतो.
  • शौचास साफ होत नसल्यास कोरफडीच्या पाच मिलिलिटर रसात अर्धा चमचा मध घालून, ते मिश्रण रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावे. त्यामुळे पोट साफ होते. सोबतच भूकदेखील वाढते.
  • डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.

(वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ व डॉक्टर यांच्याशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)