आपले शरीर आजारी पडण्यापूर्वी अनेकदा आपल्याला छुपे संकेत देत असते. अचानक येणारा थकवा, भूक मंदावणे किंवा पोटाच्या समस्या यांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, पण हे शरीराने दिलेले इशारे असतात. लघवीच्या सवयींमध्ये किंवा स्वरूपात होणारा कोणताही लहान बदल हा असाच एक महत्त्वाचा संकेत असू शकतो.
काय आहे युटीआय (UTI)?
जर तुम्हाला लघवी करताना तीव्र जळजळ किंवा टोचल्यासारखे वाटत असेल, वारंवार शौचाला/लघवीला जावे लागत असेल किंवा लघवी पूर्ण साफ न झाल्यासारखे वाटत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अनेकदा कमी पाणी प्यायल्यामुळे असा त्रास होतो, पण प्रत्येक वेळी कारण इतके साधे नसते. हा युटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (Urinary Tract Infection) असू शकतो.
हा लघवीच्या मार्गातील आणि त्यासंबंधी अवयवांचा संसर्ग आहे. जेव्हा शरीराबाहेरील हानिकारक बॅक्टेरिया लघवीच्या मार्गातून आत शिरतात आणि आपली संख्या वाढवू लागतात, तेव्हा ही समस्या निर्माण होते. हा संसर्ग मूत्राशय (Bladder) किंवा थेट मूत्रपिंडांपर्यंत (Kidney) पोहोचू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात यावर उपचार करणे सोपे असते, मात्र दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.
युटीआयची लक्षणे कशी ओळखाल? (How do you recognize the symptoms of a UTI?)
जळजळ आणि टोचणे: लघवी करताना तीव्र जळजळ किंवा टोचल्यासारख्या वेदना होणे हे याचे सर्वात मुख्य लक्षण आहे.
- वारंवार लघवीचा त्रास: थोड्या-थोड्या वेळाने लघवीला होणे, पण ती मोकळेपणाने न होणे.
- दुखणे आणि जडपणा: पोटाच्या खालच्या भागात (पेडूमध्ये) सतत दुखणे किंवा जडपणा जाणवणे.
- लघवीतील बदल: लघवीला तीव्र दुर्गंधी येणे किंवा तिचा रंग धुरकट/गाढ होणे.
- गंभीर धोका: जर लघवीतून रक्त येत असेल, तर विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर या लक्षणांसोबतच तीव्र ताप, थंडी वाजून येणे, पाठीच्या खालच्या भागात (कमरदुखी) वेदना होणे किंवा उलटीसारखे वाटणे असा त्रास होत असेल, तर संसर्ग केवळ मूत्राशयापुरता मर्यादित नसून मूत्रपिंडांपर्यंत (किडनी) पोहोचल्याचा तो संकेत आहे.
युटीआयचा सर्वाधिक धोका कोणाला? (Who is most at risk for UTI?)
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना युटीआयचा त्रास जास्त होतो. शरीराच्या नैसर्गिक रचनेमुळे महिलांमध्ये लघवीची नळी (Urethra) लहान असते, ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे मूत्राशयापर्यंत पोहोचतात. याशिवाय, मधुमेह (Diabetes) असलेले रुग्ण किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी आहे, त्यांना या संसर्गाचा धोका जास्त असतो. जास्त वेळ लघवी रोखून ठेवण्याच्या सवयीमुळेही बॅक्टेरियांना वाढण्यास वाव मिळतो.
घरगुती काळजी आणि बचाव (Home care and rescue/
युटीआयपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे:
- भरपूर पाणी प्या: दिवसभरात पुरेसे पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील आणि संसर्ग पसरवणारे घटक लघवीद्वारे बाहेर पडतील.
- लघवी रोखू नका: लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे टाळा आणि वैयक्तिक स्वच्छतेची (Hygiene) विशेष काळजी घ्या.
- क्रेनेबेरी ज्यूस किंवा लिंबू पाणी: द्रव पदार्थांचे सेवन वाढवल्याने लघवीचा मार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते.
लहान-लहान सावधगिरी बाळगून तुम्ही युटीआयसारख्या मोठ्या आणि त्रासदायक समस्येपासून स्वतःचा बचाव करू शकता. लक्षणे जास्त आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
