Curd With Jeera: उन्हाळ्यात भूक न लागणे, अपचन, पोट फुगणे आणि अशक्तपणा जाणवणे या सर्व सामान्य समस्या आहेत. अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात; तर काही जण बाजारातील पदार्थांचे सेवन करतात. पण, आयुर्वेदात या सर्व समस्यांवर रामबाण उपाय दिलेला आहे. भाजलेले जिरे दह्यात मिसळून खाणे हा एक घरगुती उपाय आहे. आयुर्वेदात हे मिश्रण पचनासाठी रामबाण उपाय मानले जाते. खरे तर, दही नैसर्गिकरीत्या थंड आणि प्रो-बायोटिक्सने समृद्ध असते, तर भाजलेले जिरे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि गॅसपासून आराम मिळविण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. या दोन्ही घटकांचे एकत्र सेवन केल्याने उन्हाळ्यात उदभवणाऱ्या पोटाच्या बहुतेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

दही आणि जिऱ्याचे सेवन प्रभावी

उन्हाळ्यात महागड्या आणि रासायनिक पेयांऐवजी दही आणि जिऱ्याची ही नैसर्गिक व स्वस्त पाककृती दिवसभर पोट चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत करते. दही आणि भाजलेले जिरे खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम यामुळे अपचन आणि गॅसपासून आराम मिळतो. भाजलेले जिरे पोटातील गॅस, पोट फुगणे आणि अपचन कमी करतात. दह्याबरोबर त्याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि पचनक्रिया सुलभ होते. या मिश्रणामुळे भूक वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात आपल्याला अनेकदा भूक लागते. भाजलेले जिरे भूक वाढविण्यासाठी उपयुक्त आहे आणि दह्यासोबत त्याचे सेवन केल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम होतो.

जिऱ्यामुळे चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे उष्मांक लवकर जळतात. त्यमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही मदत होते. दही आणि जिरे या दोन्हींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे उन्हाळ्यात कमकुवत होणारी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. ते सर्दी आणि छातीतील कफ टाळण्यास मदत करतात. दही शरीराला थंडावा देते: तर जिरे घामातून कमी झालेली खनिजे पुन्हा भरून काढते, ज्यामुळे निर्जलीकरण कमी होते.

Award Banner

दही व जिऱ्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत

हा प्रभावी उपाय करण्यासाठी एक चमचा भाजलेले जिरे चांगले वाटून घ्या. ते एक कप दह्यामध्ये मिसळा आणि चवीनुसार त्यात काळे मीठ घाला. तुम्ही हे नाश्त्याबरोबर किंवा दुपारच्या जेवणानंतर घेऊ शकता. उन्हाळ्यात दिवसातून एकदा याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

तज्ज्ञांच्या मते, हे मिश्रण केवळ पचनक्रियाच सुधारत नाही, तर उष्णतेमुळे होणारा थकवा आणि अशक्तपणादेखील दूर करते. मात्र, ज्यांना जिऱ्याची अॅलर्जी आहे किंवा गंभीर आजार आहे. त्यांनी त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दम्याच्या रुग्णांनीही दह्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दह्याचे सेवन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

  • जर दह्याचे योग्य प्रकारे सेवन केले नाही, तर ते आरोग्यासाठी हानिकारकदेखील ठरू शकते. खरे तर काही पदार्थ असे आहेत, जे दह्याबरोबर खाल्ल्यास पोटापासून त्वचेपर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
  • दही तळलेल्या आणि तेलकट पदार्थांबरोबर खाऊ नये. आयुर्वेदिक तत्त्वांनुसार, दही जड असते, तळलेल्या अन्नासोबत खाल्ल्यास ते आणखी जड होते आणि मग नीट पचन होत नाही.
  • जर दही शुद्ध मीठ किंवा शुद्ध साखरेसोबत खाल्ले, तर ते दह्यामध्ये असलेल्या चांगल्या जीवाणूंना नुकसान पोहोचते.
  • आयुर्वेदानुसार दही आणि काकडी एकत्र खाऊ नये. त्याचे कारण असे की, जर हे दोन्हींचे एकत्र सेवन केले, तर लाळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे सायनसची समस्यादेखील उदभवू शकते.
  • जर मांस किंवा सीफूडसोबत दही खाल्ले, तर पचनसंस्थेला ते पचवणे कठीण जाते. म्हणून असे खाणे टाळा.
  • फळांबरोबर दही खाण्यास मनाई आहे. कारण- फळे हलकी आणि गोड असतात आणि दह्याला तिखट चव असते. आयुर्वेदानुसार, या दोन्हींचे एकत्र सेवन केले, तर पचनसंस्थेला हानी पोहोचवते. त्यामुळे शरीरात विषारी घटक वाढू शकतात.