How to get rid of cockroaches in kitchen permanently: घरात झुरळं असणं ही एक सामान्य समस्या आहे. जर स्वच्छतेबाबत काळजी घेतली नाही, तर ही समस्या थोडी अधिक प्रमाणात वाढते आणि झुरळं घराच्या कोपऱ्यात पुन्हा पुन्हा दिसू लागतात. स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये झुरळांचा धोका इतका वाढतो की, घरात राहणं कठीण होऊन जातं. जरी बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक स्प्रे आणि पेस्ट यांचा त्वरित परिणाम दिसून येत असला त्यांच्या वासामुळे डोकेदुखीचा त्रास होतो.

घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की, त्यांची पैदास वेगाने वाढते. त्याशिवाय ती अनेक आजारांना कारणीभूत होतात. झुरळ घर अस्वच्छ करण्यासह ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. झुरळांना मारण्यासाठी बाजारात अनेक प्रकारने स्प्रे आणि औषधे उपलब्ध असली तरी काही घरगुती उपायांचा अवलंब करूनही तुम्ही त्यांना घरातून हकलवून लावू शकता. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करू शकता, ज्यामुळे झुरळे तुमचे घर सोडून कायमची पळून जातील.

झुरळांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय

बेकिंग सोडा आणि साखर

तुम्ही बेकिंग सोडा आणि साखर वापरून झुरळांसाठी स्प्रे बनवू शकता. दोन्ही घटक समान प्रमाणात मिसळा आणि झुरळांची पैदास होत असलेल्या ठिकाणी ते स्प्रे करा.

कडुलिंबाचे तेल

तुम्ही कडुलिंबाच्या तेलाने किंवा पावडरनेही झुरळांना पळवून लावू शकता. कडुलिंबाचे तेल वापर करण्यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये थोडेसे कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळा आणि ज्या ठिकाणी हे कीटक दिसले आहेत, त्या ठिकाणी फवारणी करा.

लसूण, कांदा व मिरचीचा स्प्रे

लहान आणि मोठ्या झुरळांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही लसूण, कांदा व लाल मिरचीचा स्प्रे वापरू
शकता. हे घटक पाण्यात उकळून, एक तीव्र वासाचा स्प्रे तयार करा. झुरळांना या घटकांचा तीक्ष्ण वास आवडत नाही.

बोरिक अॅसिड

बोरिक अॅसिड हे झुरळांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रभावी घरगुती उपायांपैकी एक मानले जाते. सर्वोत्तम परिणामांसाठी ही पावडर घराच्या कोपऱ्यात आणि जमिनीवर शिंपडा. नंतर झुरळे त्या पावडरच्या संपर्कात येईपर्यंत ती पावडर तशीच त्या ठिकाणी राहू द्या.

फॅब्रिक सॉफ्टनर स्प्रे

फॅब्रिक सॉफ्टनरमध्ये अशी रसायने असतात, जी झुरळांची श्वासोच्छ्वासाची छिद्रे बंद करू शकतात, ज्यामुळे ती गुदमरण्याचा धोका असतो. फॅब्रिक सॉफ्टनर पाण्यात मिसळून, ते सरळ झुरळांवर फवारा. झुरळे त्या स्प्रेच्या संपर्कात आल्यावर मरतात.

तमालपत्र

झुरळांना तमालपत्रांचा तीव्र वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे तमालपत्राची पाने कुस्करून घ्या आणि झुरळे असलेल्या ठिकाणी ती कुस्करलेल्या त्या पानांचे तुकडे पसरवून ठेवा. या उपायाद्वारे झुुरळांना प्रभावीपणे रोखता येईल.

साबण आणि पाण्याचा फवारा

हा साबण आणि पाण्याचा एक सोपा उपाय आहे. या दोन घटकांपासून बनविलेल्या स्प्रेच्या संपर्कात झुरळे आली, तर तो त्यांना मारण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. जेव्हा झुरळांवर थेट फवारणी केली जाते तेव्हा साबणामुळे त्यांच्या शरीरावर थर जमा होतो आणि त्यामुळे त्यांच्या श्वासोच्छ्वासाचा मार्ग बंद होतो, ज्यामुळे ते मरतात.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे झुरळांना आवडत नाही. लिंबाचा रस आणि पाण्याच्या द्रावणाने पृष्ठभाग पुसून तुम्ही केवळ तो भागच स्वच्छ करीत नाही, तर झुरळांना एक नैसर्गिक अडथळादेखील निर्माण करता.

पेट्रोलियम जेली ट्रॅप

एका बरणीत पेट्रोलियम जेली लावा आणि त्यात झुरळांसाठी ब्रेड किंवा फळासारखे आमिष ठेवा. आमिषाला बळी पडून झुरळे आत जातात; पण आतील चिकटपणामुळे ती पुन्हा बाहेर पडू शकत नाहीत.