मूळव्याध हा एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे गुदद्वाराला सूज येते आणि तीव्र वेदना होतात. मूळव्याधीचे आंतरिक मूळव्याध आणि बाह्य मूळव्याध, असे दोन प्रकार आहेत. आंतरिक मूळव्याधीमुळे रक्तस्राव होतो, तर बाह्य मूळव्याधीमुळे गुदद्वाराभोवती सूज आल्याने तीव्र वेदना आणि खाज सुटते. दीर्घकाळचा अतिसार किंवा बद्धकोष्ठता, धूम्रपान किंवा मद्यपान, शौचालयात जास्त वेळ बसून राहणे, शौचास जाताना जोर लावणे, वजन वाढणे व जड वस्तू उचलणे या सर्व गोष्टींमुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. आपल्या आहाराची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
मूळव्याध असल्यास काय खावे?
मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास, त्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करता येतात. मूळव्याध असल्यास, आपल्या आहारात फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
भरपूर पाणी प्या
जर तुम्हाला पोटाचा त्रास असेल, तर त्यावर उपचार करण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल, तर दिवसभर भरपूर पाणी प्या. कारण- ते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. दिवसातून किमान तीन-चार लिटर पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि बद्धकोष्ठता टाळता येते. तसेच, त्यामुळे शौचास जाणे सोपे होते. पाण्यासोबतच तुम्ही सफरचंद, केळी, संत्री, काकडी, गाजर इत्यादींचा रसदेखील पिऊ शकता. हे खूप फायदेशीर आहे.
संपूर्ण धान्य खा
संपूर्ण धान्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे मूळव्याधीसाठी खूप फायदेशीर आहे. डॉक्टर मूळव्याधीच्या रुग्णांना त्यांच्या आहारात ओट्स, ब्राऊन राईस व गहू यांसारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. संपूर्ण धान्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
फळांचे सेवन
मूळव्याधीची लक्षणे कमी करण्यासाठी फळे खाणे फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या आहारात केळी, सफरचंद, द्राक्षे व संत्र्यांचा समावेश करू शकता. या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात, जे मूळव्याध बरा करण्यास मदत करतात. तसेच, रात्रीच्या जेवणात पपई खाण्याची खात्री करा. त्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येईल आणि शौचाच्या वेळी होणारी वेदना कमी होईल.
हिरव्या भाज्यांचे सेवन करा
आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, हिरव्या पालेभाज्यांमध्ये विविध अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे मूळव्याधीची लक्षणे कमी करू शकतात. तुम्ही पालक, गाजर, काकडी, कोबी व ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू शकता.
ताक पिण्याने मिळणारा आराम
आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि तणावग्रस्त नसा शांत होतात. ताक शरीरातील सूज आणि जंतुसंसर्ग कमी करण्यास मदत करते. ताकाच्या नियमित सेवनाने मूळव्याधीची लक्षणे प्रभावीपणे कमी होऊ शकतात.
हर्बल चहा फायदेशीर
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल, तर हर्बल चहा पिणे खूप फायदेशीर ठरते. हर्बल चहाच्या सेवनाने शौचाच्या वेळी होणारा सूज आणि रक्तस्रावाचा त्रास कमी होऊ शकतो. बाजारात अनेक प्रकारचे हर्बल चहा उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्हाला हवा तो हर्बल चहा निवडू शकता.
