नवी दिल्ली : व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरातून घाम निथळतो. उन्हाळय़ात एरवीही उकाडय़ाने आपल्या शरीरातून घाम येत असतो. त्यामुळे आपल्या त्वचेवर पुरळ उठतात, घामोळय़ा येतात, ती लाल होते. तसेच त्वचेवर चट्टे पडतात. विशेषत: घामाने चेहऱ्याची त्वचा खराब होण्याची शक्यता असते.

शारीरिक व्यायामाने त्वचेला फायदाच होत असतो. त्यामुळे त्वचा निरोगी राहून तिच्यावर नैसर्गिक तजेला येतो; परंतु व्यायाम करताना नैसर्गिकरीत्या घाम येतो. मात्र, या घामामुळे चेहऱ्याची त्वचा लालबुंद होते. त्यावर चट्टे उमटून खाज येते. हे टाळण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ थोडी दक्षता घ्यायला सांगतात. त्या पुढीलप्रमाणे : व्यायामाआधी आपला चेहरा चांगला धुऊन घ्यावा. व्यायामाआधी चेहऱ्यावर मेकअप केला असेल तर तो योग्य पद्धतीने पूर्ण काढावा. व्यायामादरम्यान ओला टॉवेल जवळ बाळगा. आपला चेहरा वारंवार त्याने पुसून घ्यावा, जेणेकरून येणारा घाम तर पुसला जाईलच, त्याबरोबर चेहऱ्यावर चिकटणारी धूळ, इतर प्रदूषणयुक्त घटकही पुसले जाऊन चेहरा स्वच्छ राहील. कोरडा टॉवेल किंवा तुमच्या कपडय़ावर चेहरा घासून पुसू नका, कारण त्यामुळे चट्टे उमटतील व चेहऱ्यावर खाज सुटण्याचा धोका असतो.

व्यायाम करण्याआधी चेहऱ्याला टोनर, फेशियल मिस्ट किंवा इतर उपयुक्त क्रीम लावावे. व्यायामानंतर आपला चेहरा पुन्हा व्यवस्थित धुऊन घ्यावा. त्यामुळे त्वचेच्या रंध्रांत घाम-धूळ जाणार नाहीत. व्यायामादरम्यान ठरावीक वेळाने नियमित पाणी प्यावे, जेणेकरून घाम आला तरी पुरेसे पाणी शरीरात राहील. चेहरा धुतल्यानंतरही सिलिक्लिक अ‍ॅसिड किंवा बेन्झॉईल पेरॉक्साईड लावावे. मात्र, घामामुळे चेहऱ्याला फारच त्रास होत असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला व उपचार जरूर घ्यावा.