डॉ. संजय इंगळे

अल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारा ऋतू म्हणजे पावसाळा. हा पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच आजारांना आमंत्रण देणाराही आहे. मान्सूनमध्ये इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत व्हायरस, जीवाणू आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यात अनेकदा डास,पाणी, हवा आणि अन्न यांच्या मार्फत संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या ऋतूमध्ये शारीरिक काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच या काळात नेमके कोणते आजार होतात आणि ते आजार कसे दूर ठेवायचे हे जाणून घेऊ.

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

पावसाळ्यात होणारे आजार
१.मलेरिया –

हा आजार अ‍ॅनोफेलस जातीच्या डासांच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्यात, डबक्यात या डासांची पैदास होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि घामही येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.

२.डेंग्यू –

पहाटे तसेच सकाळच्या वेळी डास चावल्याने होणा-या या आजारात सततची डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे व स्नायूंमध्ये वेदना उद्भवतात.पहिल्या लक्षणांमध्ये ताप आणि थकवा यांचा समावेश आहे. डेंग्यू तापासाठी विविध प्लेटलेट मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे.

३.चिकुनगुनिया-

हा विषाणू एडीस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो. यात दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ,पोट,कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात-पाय दुखणे सुरूच राहते.

पाण्यामुळे होणारे आजार-

१. टायफाइड –

हा दुषित पाण्यामुळे पसरणारा आजार आहे. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे आहेत. टायफॉइड तापाची चाचणी करण्यासाठी टायफाइड टायफी आयजीएम आणि विडल एग्लूटिनेशन या चाचण्या करणे आवश्यक आहे.

२.लेप्टोस्पायरोसिस –

त्वचेवर कुठे कापले असेल किंवा डोळे, तोंड आणि नाक यांचा प्राण्यांचे मूत्र किंवा प्राण्यांचे मूत्र असलेले पाणी यांच्याशी संपर्क झाला तर हा भयानक आजार उद्भवू शकतो. काहीही लक्षणं दिसून न येणे इथंपासून डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि पार फुफ्फुसात रक्‍तस्त्राव किंवा मेंदूदाह ही या आजाराची लक्षणे आहेत.

३. हिपेटायटीस –

विषाणूमुळे होणारा हा खूपच संसर्गजन्य आजार आहे. पाण्यातून पसरणारा हा विषाणू असून बाधित विष्टेमुळे दूषित झालेल्या अन्‍न वा पाण्यामुळे हा आजार बळावतो. त्यामुळे कावीळ होते (पिवळे डोळे आणि त्वचा, गडद रंगाचे मूत्र) तसेच पोटदुखी, भूक मंदावणे, अन्‍नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्‍तपणा जाणवतो.

४.व्हायरल फिव्हर –

यामध्ये सुरुवातीस तीव्र स्वरूपाचा ताप, अशक्तपणा जाणवणं, अंगदुखी हाता-पायांमध्ये वेदना होणं ही प्राथमिक लक्षणं दिसून येतात.

हवेमुळे होणारे आजार-

बदलत्या वातावरणामुळे सामान्य फ्लू, विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे बहुतेक सौम्य किंवा तीव्र प्रमाणाता आढळून येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता असते.

संक्रमणापासून दूर राहण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा-

१. खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक झाकून ठेवा.

२. उकळून थंड केलेले पाणी प्या.

३. घरातील लहान मुलांना संक्रमित व्यक्तींपासून दूर ठेवा. स्वच्छता राखा.

४. घरात हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करा.

५. स्वतःला नेहमीच हायड्रेटेड ठेवा

६. बुरशीजन्य संक्रमण टाळण्यासाठी नेहमीच वैयक्तिक स्वच्छतेच्या पद्धतीचा अवलंब करा.

७. संतुलित आहार घ्या आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा

( लेखक डॉ. संजय इंगळे हे अपोलो डायग्नोस्टीक्समध्ये झोनल टेक्निकल हेड आहेत.)