7 Health Benefits Of Asafoetida: हिंगाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. कधी डाळीला फोडणी देण्यासाठी, तर कधी आमटीची चव वाढवण्यासाठी. पण स्वयंपाकघरातल्या या छोट्याशा डबीतल्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का? हिंग पोटासाठी चांगला वगैरे तर तुम्हाला माहीत असेलच पण आणखी आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. तर मग जाणून घ्या हिंगाचे काही फायदे…

हिंग हा स्वयंपाकघरातला असा मसाला आहे जो दररोज जेवणाची चव तर वाढवतोच, पण अनेक आरोग्य समस्यांवर रामबाण उपायदेखील आहे. डाळीला फोडणी देण्यापासून ते भाज्यांना सुगंध देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत याचा वापर केला जातो. हजारो वर्षांपासून हिंगाचे सेवन केले जात आहे आणि पूर्वी ते पावडरच्या नाही तर खड्यांच्या स्वरूपात उपलब्ध होते. हिंग खाणं फायदेशीर तर आहेच, पण तो नक्कीच भेसळयुक्त नसावा. तसंच कोणत्या आजारासाठी तो केव्हा आणि कसा खावा शिवाय भेसळयुक्त हिंग कसा ओळखावा याबाबत जाणून घेऊ…

हिंगामध्ये कोणते घटक आढळतात?

हिंगामध्ये राळ, डिंक, सुगंधी तेल, फेरूलिक आम्ल, गंधक संयुगे, कुमारिन्स, फ्लेव्होनॉइड्स, अँटि-ऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस यासारख्या खनिजांचे अल्प प्रमाण असते. हे घटक त्याच्या तीव्र सुगंधासाठी वापरले जातात.

हिंगाचे ७ फायदे कोणते?

तज्ज्ञ सांगतात की, आपण दररोज हिंग खातो, पण आजकाल स्वस्त आणि महाग असे दोन्ही प्रकारचे हिंग उपलब्ध आहेत. जर तुम्ही महाग हिंग घेतले तर ते भेसळ विरहित असेल. तो चिमूटभर हिंगदेखील पदार्थाची चव वाढवतो. स्वस्त हिंग जास्त प्रमाणात लागते किंवा त्याचा तेवढा परिणाम दिसत नाही.

पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम

डॉक्टर सांगतात की, सर्व आजारांचे मूळ पोट आहे. अनेकदा पोटात दुखणे, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत हिंग खूप फायदेशीर ठरते. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स हळूहळू पोटाशी संबंधित समस्या दूर करतात. जर लहान मुलाच्या पोटात गॅस होत असेल, तर पाण्यात किंवा तूपात हिंग विरघळवून तो बेंबीत लावल्याने आराम मिळतो. जर तुम्ही उडीद डाळीसारखा जड पदार्थ खाऊन त्यात हिंगाचा वापर केला, तर गॅस होणार नाही.

मलेरियावर घरगुती उपाय ठरतो हिंग

तज्ज्ञ सांगतात की, मलेरियासारखा ताप कधीकधी खूप थंड तर कधीकधी खूप गरम वाटू शकतो. तापही वारंवार येतो आणि जातो. २ ग्रॅम हिंग आणि २ ग्रॅम गूळ कोमट पाण्यात विरळवून प्यायल्यास मलेरियाच्या तापापासून आराम मिळू शकतो.

मासिक पाळीच्या दिवसात आराम

हिंगामुळे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या तीव्र पोटदुखी आणि क्रॅम्पपासून आराम मिळू शकतो. आयुर्वेदानुसार, हिंग वेदना कमी करते, रक्ताभिसरण सुधारते आणि हार्मेन्स संतुलित ठेवते. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो आणि रक्तस्त्राव नियमित राहतो.

दातदुखीसाठी फायदेशीर

हिंग केवळ शरीरासाठीच नाही तर दातांसाठीही रामबाण उपाय मानला जातो. आयुर्वेदात दातदुखी आणि दातांच्या किडीवर उपचार करण्यासाठी अनेक वर्षांपासून याचा वापर केला जात आहे. कोमट लवंगाच्या पाण्यात हिंग घालून गुळण्या करा. यामुळे दातदुखीपासून आराम मिळेल.

स्ट्रेसमुळे होणाऱ्या छातीतील वेदनेपासून आराम

तज्ज्ञांच्या मते, हिंगामध्ये असे घटक असतात जे सततच्या स्ट्रेसमुळे होणाऱ्या छातीतील वेदना आणि जडपणापासून आराम देऊ शकतात. २ चिमूटभर हिंग १ चमचा माव्यामध्ये किंवा दुधात मिसळा, चावून खा. जर तुम्हाला स्ट्रेसमुळए त्रास होत असेल, तर तुम्ही हिंगाचे अशाप्रकारे सेवन करू शकता.

ब्लड प्रेशरसाठी प्रभावी

हिंग ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ते रक्ताभिसरण सुधारते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते. यामुळे ब्लड प्रेशरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. हिंग तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यातही मदत करते.

संसर्ग दूर करतो

पावसाळ्यात काही कीटक चावल्यास किंवा जंतुसंसर्ग झाल्यास हिंग ते बरे करण्यात मदत करू शकतो. हिंग आल्याच्या रसात मिसळून संसर्ग झालेल्या जागेवर लावा. यामुळे जंतुसंसर्ग नियंत्रणात येईल आणि खाज किंवा जळजळ होणार नाही.

भेसळयुक्त आणि शुद्ध हिंग कसे ओळखावे?

पाणी किंवा आग चाचणी करून हे ओळखता येते. एक ग्लास पाण्यात हिंग विरघळवा. जर पाणी दुधाळ झाले, तर तो शुद्ध हिंग आहे. जर हिंग धुळीसारखा तळाशी बसला असेल, तर तो बनावट असण्याची शक्यता आहे. दुसरा पर्याय म्हणजे एक चमचा हिंग घेऊन तो मेणबत्ती किंवा गॅसच्या फ्लेमवर धरा. शुद्ध हिंग जळतो, तर भेसळयुक्त हिंग पेटायला जास्त वेळ लागतो.