Ayurvedic Weight Loss Remedy: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढतं वजन आणि पोटावरील चरबी ही अनेकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम, अनियमित आहार, जंक फूड आणि कमी झालेला व्यायाम; यामुळे शरीरावर चरबी साचू लागते. विशेषतः पोटाची वाढलेली चरबी अनेकांना त्रास देत असते. ही चरबी कमी करण्यासाठी लोक जिम, डाएट, सप्लिमेंट्स आणि विविध औषधांचा आधार घेतात. मात्र, अनेक वेळा या गोष्टींचे शरीरावर दुष्परिणामही होतात.

पण, आता वजन कमी करण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय चर्चेत आला आहे. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी वजन कमी करण्यासाठी एक खास उपाय सांगितला असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

‘या’ मुळाचं पाणी ठरू शकतं गेमचेंजर!

आचार्य बालकृष्ण यांनी ज्या मुळाबद्दल माहिती दिली आहे, त्याचं नाव आहे अश्वगंधा. आयुर्वेदात अश्वगंधाला अत्यंत महत्त्वाचं औषधी वनस्पती मानलं जातं. शरीराची ताकद वाढवण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत अनेक फायदे या वनस्पतीमुळे मिळतात.

मात्र, आता वजन कमी करण्यासाठीही अश्वगंधा प्रभावी ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधाच्या मुळाचं पाणी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

वजन कमी करण्यात अश्वगंधा नेमकं कसं मदत करतं?

तज्ज्ञांच्या मते, तणाव वाढल्यावर शरीरात ‘कॉर्टिसोल’ नावाचं हार्मोन वाढतं. हे हार्मोन वाढलं की भूक जास्त लागते आणि शरीरात चरबी साचू लागते. अनेक जण तणावामुळे वारंवार काही ना काही खात राहतात, यालाच ‘स्ट्रेस ईटिंग’ म्हटलं जातं.

अश्वगंधा शरीरातील कॉर्टिसोल नियंत्रित करण्यात मदत करतं, त्यामुळे अनावश्यक भूक कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय अश्वगंधामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराचा मेटाबॉलिझम वेगवान करण्यास मदत करतात.

मेटाबॉलिझम वेगवान झाल्यास शरीर अधिक कॅलरी बर्न करू लागतं. परिणामी वजन कमी होण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. एवढंच नाही तर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही अश्वगंधा मदत करतं.

अश्वगंधाचं पाणी बनवण्याची योग्य पद्धत

हा उपाय करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा अश्वगंधा पावडर मिसळा. त्यामध्ये थोडंसं मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्या.

दुसरी पद्धत म्हणजे अश्वगंधाची सुकी मुळे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर त्याचं सेवन करा.

पण ‘ही’ काळजी घ्या!

कोणताही आयुर्वेदिक उपाय सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती महिला, मधुमेह किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा गोष्टींचं सेवन करावं.

वजन कमी करण्यासाठी फक्त उपाय पुरेसा नाही!

फक्त अश्वगंधाचं पाणी पिऊन वजन कमी होणार नाही. त्यासोबत नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे. मात्र, योग्य पद्धतीने वापर केल्यास हा आयुर्वेदिक उपाय वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.