Asthma Care Tips in Monsoon: पावसाळा सुरू झाला की उकाड्यापासून दिलासा मिळतो, वातावरण आल्हाददायक होते. मात्र, हाच ऋतू अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. हवेत वाढलेली आर्द्रता, थंड वारे, बुरशी, परागकण (Pollen) आणि व्हायरल संसर्ग यामुळे श्वसनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अस्थमाचा झटका येण्याचा धोका अधिक वाढतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात सुमारे २६ कोटी लोक अस्थमाने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते, मॉन्सूनमध्ये योग्य काळजी घेतली नाही तर दम लागणे, घरघर, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्या गंभीर होऊ शकतात.

पावसाळ्यात अस्थमाचा त्रास वाढण्यामागील कारणे

१. हवेत वाढलेली आर्द्रता

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे श्वसनमार्गांमध्ये सूज येऊ शकते आणि श्वास घेणे कठीण होऊ शकते.

२. बुरशी आणि परागकणांचा प्रभाव

सततच्या पावसामुळे भिंती, कपाटे आणि घरातील ओलसर भागांमध्ये बुरशी वाढते. तसेच परागकण आणि फंगल स्पोर्स हवेत मिसळल्याने अॅलर्जीचा त्रास वाढतो आणि अस्थमा ट्रिगर होऊ शकतो.

३. घरातील धूळ आणि पाळीव प्राण्यांचे केस

पावसामुळे लोकांचा जास्त वेळ घरात जातो. घरातील धुळीचे कण, डस्ट माइट्स, पाळीव प्राण्यांचे केस किंवा त्वचेचे कण यामुळे अस्थमाची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.

४. तापमानातील सतत बदल

कधी थंड तर कधी उष्ण असे बदलणारे वातावरण आणि वाढणारा हवेचा दाब यामुळे फुफ्फुसांवर अतिरिक्त ताण येतो.

५. व्हायरल संसर्गाचा धोका

पावसाळ्यात सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर श्वसन संसर्ग वाढतात. हे संसर्ग अस्थमा रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात.

वादळीवाऱ्यामुळेही वाढू शकतो अस्थमाचा झटका

संशोधनानुसार, थंडरस्टॉर्म अस्थमा ही गंभीर समस्या मानली जाते. वादळी पावसादरम्यान परागकणांचे सूक्ष्म तुकडे हवेत मोठ्या प्रमाणात पसरतात. हे कण श्वसनमार्गात जाऊन अचानक अस्थमाचा तीव्र झटका आणू शकतात.

२०१६ मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे आलेल्या थंडरस्टॉर्मनंतर हजारो लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला होता आणि अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे वादळी पावसाच्या काळात अस्थमा रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात अस्थमा रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

  • पावसात भिजणे शक्यतो टाळा.
  • डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा आणि इनहेलरचा नियमित वापर करा.
  • इनहेलर नेहमी सोबत ठेवा.
  • घरातील ओलसरपणा, बुरशी आणि धूळ नियमित स्वच्छ करा.
  • बाहेर जाताना मास्क वापरा.
  • थंड पेये आणि अतिथंड पदार्थांचे सेवन टाळा.
  • संतुलित आहार घ्या आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
  • नियमित श्वसनाचे (Breathing) व्यायाम करा.
  • तीव्र सुगंध असलेले परफ्यूम, डिओ किंवा अगरबत्तीचा अतिवापर टाळा.
  • पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे अॅलर्जी होत असल्यास त्यांच्यापासून अंतर ठेवा.
  • ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत घरघर किंवा जडपणा जाणवणे
  • सतत खोकला येणे
  • थोड्या श्रमाने दम लागणे
  • रात्री श्वास कोंडल्यासारखे वाटणे

अशी लक्षणे वाढत असल्यास किंवा इनहेलर वापरल्यानंतरही आराम मिळत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.