Ayurvedic Herbs for Immunity :भारताची खाद्यसंस्कृती आणि आयुर्वेद यांचे नाते हजारो वर्षे जुने आहे. भारतीय स्वयंपाकघर हे केवळ चवीपुरते मर्यादित नसून ते आरोग्याचे केंद्र मानले जाते. मसाले, औषधी वनस्पती आणि जरीबुटीमधून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. याच परंपरेतील एक महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणजे अश्वगंधा.

अश्वगंधा ही अशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी शरीरासाठी टॉनिकसारखी कार्य करते. ती केवळ शारीरिक ताकद वाढवत नाही, तर मानसिक संतुलन, तणाव नियंत्रण आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

पंतप्रधान मोदींनीही मान्य केले अश्वगंधाचे महत्त्व

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WHO च्या दुसर्‍या ग्लोबल समिट ऑन ट्रेडिशनल मेडिसिन मध्ये अश्वगंधाचा विशेष उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले की, भारतात शतकानुशतके वापरात असलेली ही औषधी वनस्पती कोविड-19 काळात जागतिक पातळीवर चर्चेत आली.

कोरोना महामारीदरम्यान रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधी वनस्पतींना मोठी मागणी वाढली आणि अश्वगंधा त्यातील एक महत्त्वाचा घटक ठरला. या समिटमध्ये अश्वगंधाच्या सुरक्षा, गुणवत्ता आणि वैद्यकीय उपयोगांवर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये सखोल चर्चा झाली.

आयुर्वेद काय सांगतो?

अश्वगंधाला Withania somnifera, इंडियन जिनसेंग किंवा इंडियन विंटर चेरी असेही म्हणतात. ‘अश्व’ म्हणजे घोडा आणि ‘गंधा’ म्हणजे सुगंध — आयुर्वेदानुसार अश्वगंधाचे सेवन केल्याने शरीरात घोड्यासारखी ताकद निर्माण होते.

आयुर्वेदात अश्वगंधाला रसायन औषध मानले जाते, जे शरीरातील नर्व्हस सिस्टीम मजबूत करते आणि शरीर-मन यांचा समतोल साधते. प्राचीन काळापासून स्मरणशक्ती, झोप, ताकद आणि दीर्घायुष्य यासाठी याचा वापर केला जातो.

आयुर्वेद व संशोधनानुसार अश्वगंधाचे फायदे

थायरॉईड फंक्शनला सपोर्ट

पुरुष व महिलांमधील इनफर्टिलिटीमध्ये सहाय्य

कोलेस्ट्रॉल नियंत्रण व हृदयाचे संरक्षण

तणाव कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारते

शरीरातील सूज (Inflammation) कमी करते

मधुमेह कंट्रोल करण्यास मदत

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते (WBC वाढ)

PMC (PubMed Central) मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अश्वगंधामध्ये न्यूरोप्रोटेक्टिव, सेडेटिव आणि अडॅप्टोजेनिक गुणधर्म आढळतात. हे गुण कोर्टिसोल (तणाव हार्मोन) सुमारे ३०% पर्यंत कमी करण्यास मदत करतात.

संशोधनातून हेही स्पष्ट झाले आहे की अश्वगंधा मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतो, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवतो, तसेच मांसपेशींची ताकद आणि रिकव्हरी सुधारतो.

अश्वगंधा सेवन करण्याचे योग्य मार्ग

दूधासह

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात १/४ चमचा अश्वगंधा पावडर मिसळून प्या. इच्छेनुसार दालचिनी किंवा जायफळ घालू शकता.

स्मूदीसह

फळांची स्मूदी, केळ्याचा शेक किंवा खजूर शेकमध्ये चिमूटभर अश्वगंधा पावडर मिसळून घेऊ शकता.

हर्बल काढा

२ कप पाण्यात अश्वगंधा पावडर, आले, तुळस आणि काळी मिरी घालून उकळा. गाळून सकाळी कोमट प्या.

अश्वगंधा ही केवळ पारंपरिक औषधी वनस्पती नसून आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम आहे. तणाव, थकवा, झोपेच्या समस्या, हार्मोनल असंतुलन आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरत असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. भारताची आयुर्वेदिक परंपरा आज जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहे, आणि अश्वगंधा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.