Fatty Liver Ayurvedic Remedies: लिव्हर हा आपल्या शरीराचा एक सायलेंट फायटर आहे. लिव्हर ५००हून अधिक महत्त्वाची कार्ये करते. मात्र आधुनिक जीवनशैली आणि मद्यपानाचे व्यसन त्याला आतून पोखरत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मद्याचा प्रत्येक घोट लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे लिव्हर फॅटी बनते. मग काही काळाने लिव्हर सिरोयसिससारखी जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. यावर उपचार करण्यासाठी वैद्यक शास्त्र औषधोपचार, आहार नियंत्रण आणि वाढीव शारीरिक हालचालींवर भर देते. मात्र आयुर्वेदाचा हा प्राचीन खजिना यावर काही उपाय देतो.
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. दीपक कुमार यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, जे लोक मद्यपान करतात त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी जमा होणे. तज्ज्ञ सांगतात की, ६० टक्के लोकांना फॅटी ल्विहरचा त्रास असतो, जो लिव्हरच्या आजाराचा पहिला टप्पा आहे.फॅटी लिव्हरचा दुसरा टप्पा म्हणजे लिव्हर फायब्रोसिस. फायब्रोसिसमुळे आपल्या पेशींपर्यंत रक्त पोहोचू शकत नाही. त्यामुळे लिव्हरमध्ये सूज आणि व्रण येण्याचा धोका वाढतो. तिसरा टप्पा म्हणजे लिव्हर सिरोयसिस. ही एक खूप गंभीर परिस्थिती आहे. यानंतरची स्थिती म्हणजे अॅसाइटिस. यामध्ये पोटात पाणी जमा होऊ लागते, यावर उपचार करणे खूप कठीण असते. तर मग जाणून घेऊ मद्यपानामुळे खराब झालेले लिव्हर पुन्हा निरोगी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींचा आण वापर करू शकतो…
फॅटी लिव्हरची मुख्य कारणे
- खाण्याच्या वाईट सवयी आणि अनियमित आहार
- बराच वेळ उपाशी राहणे किंवा वेळेवर न खाणे
- जंक फूड, तळलेले पदार्थ आणि अतिरिक्त तेल व मसाल्यांचे सेवन
- अति मद्यपान
- शारीरिक हालचालींचा अभाव
- वेदनाशामक किंवा औषधांचा अतिवापर
- अति गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे
- वारंवार चहा किंवा कॅफीनचे सेवन
फॅटी लिव्हरची लक्षणे
- भूक न लागणे
- कमकुवत पचन संस्था
- पोटात जडपणा
- वायू आणि आम्लता
- बद्धकोष्ठता किंवा जुलाब
- थकवा आणि चिडचिड
- पोट फुगणे आणि अस्वस्थता
फॅटी लिव्हरवरील उपचार
फॅटीलिव्हर नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये सुधारणा केल्यास त्यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
आहारात या गोष्टींचा समावेश करा
फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी आपल्या आहारात सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. दुधी भोपळा, दोडका, तोंडली आणि पडवळ यासारख्या हलक्या भाज्या लिव्हरसाठी फायदेशीर मानल्या जातात.
कोमट पाणी प्या
कोमट पाणी पिणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्यामुळे शरीरातील चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त दुधी भोपळ्याचा रस किंवा सूप पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.
हे पदार्थ टाळा
गोड, तळलेले आणि जंक फूड पूर्णपणे बंद किंवा कमी प्रमाणात घेतले पाहिजेत. तसंच जास्त भूक टाळणे आणि थोड्या प्रमाणात खाणे चांगले.
आयुर्वेदिक उपाय
कोमट पाण्यासोबत जिरे घेणे, त्रिफळा खाणे आणि आवळा-कारल्यासारख्या नैसर्गिक घटकांचे सेवन करणे यासारखे आयुर्वेदिक उपाय देखील लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.
शारीरिक व्यायाम महत्त्वाचा
तुमच्या दैनंदिन दिनचर्येत हलका व्यायाम आणि चालण्याचा समावेश करा. बैठी जीवनशैली असेल तर वेळ काढून थोडा व्यायाम किंवा चालणे नक्की करा.
फॅटी लिव्हर बरे व्हायला किती वेळ लागतो?
तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब केल्यास ३ ते ४ महिन्यांत फॅटी लिव्हरमध्ये सुधारणा दिसून येऊ शकते. तसंच हे व्यक्तीची स्थिती आणि आजाराच्या टप्प्यावर अवलंबून असते.
