Ayurvedic Remedies for Mucus, Cough Relief Tips: सर्दी, खोकला किंवा बदलत्या हवामानामुळे अनेकांना घशात कफ साचण्याची समस्या जाणवते. काही दिवसांत हा त्रास कमी होतो; मात्र काही जणांमध्ये कफ दीर्घकाळ टिकून राहतो. त्यामुळे सतत खोकला येणे, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, झोपताना त्रास होणे किंवा श्वास घेताना आवाज येणे अशा समस्या जाणवू शकतात. अशावेळी अनेक जण घरगुती किंवा आयुर्वेदिक उपायांकडे वळतात. योगगुरू बाबा रामदेव यांनीही कफाशी संबंधित त्रासात आहार आणि दिनचर्येत काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, काही पदार्थ टाळणे आणि काही पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते.

कफचा त्रास असेल तर ‘या’ पदार्थांपासून राहा दूर

कफाचा त्रास होत असताना आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे आयुर्वेद सांगते. आयुर्वेदानुसार, कफ वाढत असल्याचे जाणवत असेल तर तूप किंवा जड पदार्थांचे सेवन टाळणे योग्य ठरू शकते. तसंच, थंड पदार्थ आणि ज्यामुळे घशाचा त्रास किंवा कफ वाढतो असे पदार्थ काही काळ टाळण्याचा सल्लाही दिला जातो. कफाचा त्रास वाढत असेल तर आपल्या शरीराला कोणते पदार्थ मानवतात आणि कोणते पदार्थ त्रास वाढवतात, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

पपई, डाळिंब आणि उकडलेला पेरू ठरू शकतो पर्याय

आयुर्वेदानुसार, कफाच्या त्रासात पपई आणि डाळिंब खाण्याचा उल्लेख केला आहे. याशिवाय १० ते २० ग्रॅम चणे खाण्याचाही सल्ला दिला आहे. त्यांनी पेरू उकडून खाण्याचा पर्यायही सांगितला आहे. पेरू थंड प्रकृतीचा असल्याने काही लोकांना तो खाल्ल्यानंतर घशात कफ किंवा खवखव जाणवू शकते. अशावेळी तो उकडून खाण्याचा पर्याय सांगितला जातो. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि कफ होण्याचे कारण वेगळे असू शकते. त्यामुळे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास वाढत असेल तर तो जबरदस्तीने खाण्याची गरज नाही.

कफ असताना थंड पदार्थ टाळणे योग्य?

कफाचा त्रास जाणवत असताना अतिथंड पदार्थ आणि पेये टाळण्याचा सल्ला अनेक घरगुती पद्धतींमध्ये दिला जातो. मात्र कफ निर्माण होण्यामागे केवळ थंड पदार्थ कारणीभूत असतात असे सरसकट म्हणता येत नाही. सर्दी, अॅलर्जी, सायनसचा त्रास, संसर्ग, अॅसिड रिफ्लक्स किंवा श्वसनमार्गाशी संबंधित इतर कारणांमुळेही घशात कफ जाणवू शकतो. त्यामुळे त्रास वारंवार होत असेल तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्यामागचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

कफ वारंवार होत असेल तर दुर्लक्ष करू नका

कफ काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, वारंवार खोकला येत असेल किंवा त्यासोबत श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, ताप, रक्तमिश्रित कफ किंवा अचानक प्रकृती खालावणे अशी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.