Stomach gas Home remedies: पोटात गॅस होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी कोणालाही आणि कधीही होऊ शकते. अति खाल्ल्यामुळे, खराब झालेले अन्न सेवन केल्यामुळे किंवा जेवणानंतर लगेच पडून राहिल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. जेव्हा हा गॅस शरीरात अडकून पडतो, तेव्हा त्रास अधिक वाढतो आणि शरीराच्या विविध भागांत वेदना होऊ लागतात. त्यामुळे खूप अस्वस्थता जाणवते, ज्यामुळे इतर कोणतीही कामे करणे कठीण होऊन बसते. इतकेच नाही, तर, सण-उत्सवांच्या काळात जर अशी पोटाची समस्या किंवा गॅसचा त्रास झाला, तर नियोजित असलेले सर्व कार्यक्रम पूर्णपणे ठप्प होऊ शकतात. त्यामुळेच पोटातील गॅसवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही पोटात गॅस तयार झाल्यामुळे त्रास झाला किंवा वारंवार तशा स्वरूपाचा त्रास होत असेल, तर योगगुरू बाबा रामदेव यांनी सुचवलेला उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

पोटातील गॅसपासून कसा मिळवाल आराम?

बाबा रामदेव यांच्या मते, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्याने पोटातील गॅसपासून आराम मिळू शकतो. रात्री एका भांड्यात थोडे मेथीचे दाणे भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. त्याव्यतिरिक्त तुम्ही मेथीचे दाणे रात्रभर भिजवून, त्यांना मोड आणू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करू शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्ही मेथीच्या दाण्यांचे पाणी पिऊ शकता आणि नाश्त्यामध्ये काही मोड आलेले मेथीचे दाणे खाऊ शकता. बाबा रामदेव यांच्या मते, हे फायदेशीर आहे. मेथीचे दाण्यांना कसे मोड आणायचे? मेथीच्या दाण्यांना मोड आणण्यासाठी तुम्ही त्यांना थोडा वेळ पाण्यात भिजवून, नंतर एका ओल्या कपड्यात बांधून दोन दिवस ठेवू शकता. बाबा रामदेव यांच्या मते, मेथीचे दाणे ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवल्यास त्यांना लवकर मोड येतात.

अन्न नीट चावून खा

पोटात गॅस तयार होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे लोक अन्न नीट चावून खात नाहीत. त्याऐवजी ते घाईघाईत अर्धवट चावलेले अन्न गिळून टाकतात. बाबा रामदेव असे न करण्याचा सल्ला देतात. ते सुचवतात की, नेहमी सावकाश जेवावे आणि अन्न नीट चावून खावे. त्यामुळे लाळेची निर्मिती अधिक प्रमाणात होते आणि पोटात गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

सॅलड आणि फळांचे सेवन करा

जेवणापूर्वी तुम्ही एखादे फळ किंवा सॅलड खाऊ शकता. बाबा रामदेव यांच्या सल्ल्यानुसार, मुख्य जेवणाआधी कच्च्या पदार्थांचे जसे की सॅलड किंवा फळांचे सेवन करावे. प्रत्येक घास नीट चावून खाण्याची काळजी घ्या.

रात्री त्रिफळा घेऊ शकता

जर तुम्हाला वारंवार गॅसचा त्रास होत असेल, तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही थोड्या प्रमाणात त्रिफळा चूर्ण घेऊ शकता. त्रिफळा चूर्णाचे सेवन पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो.