Weak Bone Reason: वाढत्या वयाबरोबर हाडं थोडी कमकुवत होणं हे सामान्य आहे, पण आजकाल कमी वयातच अनेकांना सांधेदुखी, पाय सुन्न पडणे आणि झिणझिण्या येणे अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. आपण हे त्रास साधा थकवा समजून दुर्लक्ष करतो, पण हे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडं पोकळ होण्याची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. आपल्या रोजच्या काही सवयी- जसं अयोग्य आहार आणि व्यायामाची कमतरता – हळूहळू हाडांची ताकद (बोन डेन्सिटी) कमी करत असतात.
रायपूर येथील होरायझन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील हाडांचे तज्ज्ञ डॉ. पंकज द्विवेदी यांनी सांगितले की, हाडांमध्ये होणारी ही समस्या ऑस्टिओपोरोसिसमुळे होते. वेळेवर काळजी घेतली नाही तर कंबरदुखी वाढू शकते आणि पाठ वाकडी होण्याची शक्यता असते, त्यामुळे चालणे-फिरणे अधिक कठीण होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) म्हणजे काय आणि या आजारासाठी कोणत्या सवयी कारणीभूत ठरू शकतात.
ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय?
ऑस्टिओपोरोसिस ही अशी अवस्था आहे, ज्यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात. त्यामुळे हाडं सहज तुटण्याचा (फ्रॅक्चरचा) धोका वाढतो. हे तेव्हा घडते जेव्हा हाडांची घनता कमी होते. शरीर जुनी हाडं ज्या वेगाने कमी करतं, त्या वेगाने नवीन हाडं तयार करू शकत नाही, त्यामुळे हाडं आतून पोकळ आणि कमकुवत होऊ लागतात.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार जास्त आढळतो. वाढते वय, मासिक पाळी बंद होणे (रजोनिवृत्ती) आणि आहारात कॅल्शियम व व्हिटॅमिन डीची कमतरता ही त्याची मुख्य कारणे आहेत.
या चुकांमुळे हाडं कमकुवत होतात
जास्त वेळ सतत बसून राहणे
तासन्तास खुर्चीत किंवा टीव्हीसमोर बसून राहिल्याने पायांमधील रक्तप्रवाह कमी होतो. तज्ज्ञांच्या मते ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सतत बसल्यास स्नायूंना मिळणारा ऑक्सिजन कमी होऊ लागतो; त्यामुळे पाय सुन्न पडणे, जड वाटणे आणि हळूहळू कमजोरी जाणवू शकते. म्हणून दर अर्ध्या तासाने उठून २–३ मिनिटे चालावे. घोटे फिरवावेत आणि पायाची बोटे वर-खाली हलवावीत. अशा छोट्या हालचालींमुळेही पायांमधील रक्तप्रवाह सुधारतो.
जास्त साखर आणि रिफाइंड पदार्थ खाणे
पांढरी साखर, मैदा आणि प्रोसेस्ड (तयार) पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तवाहिन्या आणि नसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. संशोधनानुसार जास्त साखर खाल्ल्याने शरीरात असे बदल होतात की रक्तवाहिन्या हळूहळू कडक होऊ लागतात.
याचा परिणाम पायांच्या नसांवर होतो आणि झिणझिण्या येणे, जळजळ होणे किंवा संवेदना कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात, म्हणून गोड पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ कमी खावेत. त्याऐवजी संतुलित आणि फायबरयुक्त आहार घेणे हा चांगला पर्याय आहे.
पुरेसे पाणी न पिणे
वय वाढत गेल्यावर शरीरातील रक्ताचे प्रमाण थोडे कमी होत जाते. जर आपण कमी पाणी प्यायलो तर रक्त घट्ट होऊ शकते, त्यामुळे पाय सुजणे, गोळे येणे आणि थकवा वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. नसा आणि स्नायू नीट काम करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करा आणि दिवसभर ठराविक वेळाने पाणी पित राहा. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तप्रवाह आणि संचार व्यवस्था चांगली राहण्यास मदत होते.
प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सची कमतरता
वय वाढल्यावर स्नायू नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतात. पण, शरीरात प्रोटीन कमी असेल तर ही प्रक्रिया आणखी वेगाने होते. डाळी, हरभरा, पनीर, अंडी, सोयाबीन आणि मासे हे पदार्थ स्नायूंना बळकटी देतात. तसेच व्हिटॅमिन D आणि B12 यांची कमतरता असेल तर पायात कमजोरी आणि झिणझिण्या जाणवू शकतात, म्हणून संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. आवश्यकता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधे (सप्लिमेंट्स) घेणे फायदेशीर ठरू शकते.
उशिरापर्यंत जागरण आणि कमी झोप
शरीराची दुरुस्ती आणि ताकद टिकवण्यासाठी झोप खूप महत्त्वाची असते. झोपेत असताना शरीरात वाढीस मदत करणारे हार्मोन्स तयार होतात, जे स्नायू आणि ऊतींना बरे होण्यास मदत करतात.
६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि थकवा वाढू शकतो, त्यामुळे रोज ७–८ तासांची झोप घेण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी हलका स्ट्रेचिंग व्यायाम करणे किंवा कोमट पाण्याने पायांना शेक देणे, यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते.
