Fennel Seeds Benefits : जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे ही अनेकांच्या घरांमध्ये एक सामान्य पद्धत आहे. अनेक जण केवळ तोंडाची दुर्गंध घालवण्यासाठी याचे सेवन करतात, परंतु बडीशेपचा वापर दीर्घकाळापासून पचनाशी संबंधित समस्यांवरही केला जात आहे. याच कारणामुळे स्वयंपाकघरात असलेला हा छोटासा मसाला अनेक लोकांच्या रोजच्या सवयीचा भाग बनला आहे.

बडीशेपमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पतींपासून मिळणारे अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये अ‍ॅनेथॉलसारखे घटक असतात, ज्यांच्या आरोग्यदायी प्रभावांवर अनेक संशोधने झाली आहेत. काही अभ्यासांमध्ये बडीशेपचे पचन, सूज आणि स्नायूंच्या पेटक्यांवर होणाऱ्या संभाव्य फायद्यांचा उल्लेख आढळतो.

पोटाच्या समस्यांवर बडीशेप अत्यंत गुणकारी

बडीशेपचा सर्वात जास्त वापर पचनाशी संबंधित समस्यांमध्ये केला जातो. यातील काही वनस्पती घटक पचनसंस्थेच्या स्नायूंवर सकारात्मक परिणाम करतात आणि पोटातील अस्वस्थता किंवा मुरगड कमी करण्यास मदत करतात; यामुळेच गॅस, पोट फुगणे आणि पचनाच्या हलक्या समस्यांवर पारंपरिकपणे बडीशेपचा वापर केला जात आहे.

बडीशेपमध्ये फायबरदेखील असते, जे सामान्य पचनक्रियेसाठी आवश्यक आहे. मात्र, केवळ बडीशेप खाल्ल्याने बद्धकोष्ठता किंवा अ‍ॅसिडिटी पूर्णपणे बरी होत नाही. जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठता, तीव्र अ‍ॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्याची मूळ कारणे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे फायदे

वजन कमी करण्यासाठीदेखील बडीशेपचा वापर केला जातो. अभ्यासांमध्ये असा दावा केला गेला आहे की, बडीशेप चयापचय (मेटाबॉलिझम) वेगवान करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने कमी करण्यास मदत करते. बडीशेपमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पेट भरल्याची जाणीव राहते, ज्यामुळे एकूण कॅलरी इंटेक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत कॅलरी, अन्नाचा दर्जा, शारीरिक हालचाली आणि पुरेशी झोप यांसारख्या अनेक घटकांची महत्त्वाची भूमिका असते.

मधुमेह नियंत्रण आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

बडीशेपचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट्स इन्सुलिनची संवेदनशीलतेची क्षमता वाढवतात. संशोधकांच्या मते, बडीशेपचे सेवन टाइप-२ मधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

तसेच, बडीशेपमध्ये व्हिटॅमिन-ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात. मोतीबिंदू आणि वाढत्या वयानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ‘मॉलिक्युलर व्हिजन जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, बडीशेपमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, जे डोळ्यांचा रेटिना निरोगी ठेवतात.