Barefoot Walking Benefits : सकाळी बागेतील गवतावर अनवाणी चालण्याचा सल्ला तुम्हीही अनेकदा ऐकला असेल. अनेक लोक याला ताण कमी करण्यासाठी, शरीर रिलॅक्स करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. पण प्रश्न असा आहे की, अनवाणी चालणे खरोखरच सामान्य वॉकिंगपेक्षा हृदयासाठी जास्त फायदेशीर आहे का?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनवाणी चालण्याचा हृदयाच्या आरोग्यावर थेट सकारात्मक परिणाम होतो, याचे थेट पुरावे अजून तरी कमी आहेत. मात्र, जर तुम्ही गवतावर अनवाणी चालत असाल, तर या शारीरिक हालचालीमुळे (फिजिकल अॅक्टिव्हिटी) ब्लड प्रेशर नियंत्रणात राहून हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, चांगल्या आरोग्यासाठी प्रौढ व्यक्तींनी आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा एरोबिक व्यायाम किंवा वॉक केला पाहिजे.
अनवाणी चालल्याने शरीरात नक्की काय फरक पडतो?
अनवाणी चालण्याचा सर्वात मोठा फायदा हा नाही की यामुळे थेट हृदयाचा कोणताही आजार बरा होतो; तर खरा फायदा चालण्यामुळे मिळणाऱ्या शारीरिक हालचालीचा आहे. जेव्हा तुम्ही नियमित चालता, तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, स्नायू जास्त काम करतात आणि शरीराचा कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारतो.
NCBI च्या संशोधनानुसार, पायांच्या तळव्यांना उत्तेजना मिळाल्याने हृदयाच्या कार्यप्रणालीत सुधारणा होते. याशिवाय ब्रिस्क वॉकिंग (जलद चालणे) केल्याने हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका कमी होतो. याचा रक्तदाब, शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणावरही सकारात्मक परिणाम होतो.
अनवाणी चालताना पायांचा थेट जमिनीशी संपर्क येतो, ज्यामुळे चालण्याची पद्धत आणि पायांना मिळणाऱ्या संवेदनांमध्ये बदल होतो. बूट किंवा चप्पल पायांना गादी (कुशनिंग) आणि सपोर्ट देतात, तर अनवाणी चालताना पाय थेट जमिनीचा स्पर्श अनुभवतात.
‘जर्नल ऑफ अप्लाइड नर्सिंग अँड हेल्थ’नुसार, सकाळी अनवाणी चालण्यामुळे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी होण्यास मदत होते. ब्लड प्रेशर सामान्य राहिल्याने हृदयविकारासारख्या आजारांपासून बचाव होतो.
रक्तभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) सुधारते का?
अनवाणी चालल्याने पायांमधील मज्जासंस्थेची टोके आणि आतील स्नायू उत्तेजित होतात. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि शिरांद्वारे रक्त पुन्हा हृदयाकडे वाहून नेण्यास मदत होते. परिणामी शरीराला आराम मिळून हृदयाचे कार्य सुधारते. ‘जर्नल ऑफ फूट अँड अँकल रिसर्च’मधील संशोधनानुसार, नैसर्गिक पृष्ठभागाच्या थेट संपर्कात आल्याने शरीरात सकारात्मक बदल होतात, जसे की ब्लड प्रेशर कमी होणे आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारणे.
दररोज १५ ते ३० मिनिटे चालण्याचे फायदे:
- दैनंदिन शारीरिक हालचाली वाढतात.
- कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारतो.
- सतत बसून राहण्याची सवय कमी होते.
- स्टॅमिना आणि ऊर्जा पातळी वाढते.
- मेटाबॉलिक हेल्थला (चयापचय क्रिया) पाठबळ मिळते.
- वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
आयुर्वेदामध्येही अनवाणी चालण्याचे फायदे सांगितले गेले आहेत. यामुळे मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक ताण कमी होतो.
(टीप – कोणताही व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
