Bathroom Drain Cleaning Hack: घर कितीही स्वच्छ ठेवले तरी काही वेळा बाथरूममध्ये पाऊल टाकताच एक विचित्र आणि कोंदट वास नाकात शिरतो. अनेक जण दिवसातून दोनदा बाथरूम धुतात, तेथे सुगंधी द्रव्ये वापरतात, महागडे क्लीनर आणतात; पण तरीही हा त्रास काही केल्या कमी होत नाही. विशेष म्हणजे हा वास नेमका कुठून येतो, हेही अनेकांना समजत नाही.
अनेक वेळा आपण फरशी, कमोड, वॉश बेसिन आणि भिंती स्वच्छ करण्यात व्यग्र असतो; मात्र बाथरूममधील एका छोट्याशा जागेकडे दुर्लक्ष करतो. हीच जागा नंतर संपूर्ण घरात दुर्गंधी पसरण्याचे कारण ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, बाथरूममधील नालीमध्ये हळूहळू केस, साबणाचा थर, धूळ, तेलकट पदार्थ आणि इतर घाण साचत जाते. सुरुवातीला हा थर दिसत नाही; मात्र कालांतराने नालीतील पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि त्यातून घाणेरडा वास येऊ लागतो. अनेकदा ही दुर्गंधी इतकी तीव्र असते की, बाथरूम कितीही स्वच्छ केले तरी ताजेपणा जाणवत नाही आणि दुर्गंधीही दूर होत नाही.
अशा वेळी बहुतेक लोक बाजारातील महागडी रासायनिक उत्पादने वापरतात; मात्र या उत्पादनांवर खर्च करण्याऐवजी घरातील काही साध्या वस्तूंच्या मदतीनेही नालीची स्वच्छता करता येऊ शकते.
विशेष म्हणजे यासाठी लागणारी एक महत्त्वाची वस्तू अनेकांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते आणि तिची किंमतही कमी असते.
हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम नालीमध्ये एक कप बेकिंग सोडा टाकावा. बेकिंग सोडा नालीत साचलेली चिकट घाण आणि तेलकट थर मोकळा करण्यास मदत करतो. त्यानंतर त्यावर हळूहळू एक कप व्हिनेगर ओतावे.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र आल्यानंतर नालीमध्ये फेस आणि बुडबुडे तयार होऊ लागतात. अनेकांना हा प्रकार पाहून आश्चर्य वाटू शकते; मात्र हीच प्रक्रिया नालीतील घाण सैल करण्याचे काम करीत असते.
त्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्यावे. या काळात नालीतून हलके आवाज किंवा बुडबुडे येऊ शकतात. ही प्रक्रिया नैसर्गिक असून, त्याबाबत घाबरण्याचे कारण नसते.
ठरावीक वेळ झाल्यानंतर हळूहळू एक ते दोन लिटर गरम पाणी नालीमध्ये ओतावे. गरम पाण्यामुळे सैल झालेली घाण वाहून जाण्यास मदत होते. त्यामुळे नाली अधिक स्वच्छ होऊ शकते आणि दुर्गंधी कमी होण्यास हातभार लागू शकतो.
याहूनही एक सोपी युक्ती म्हणजे शेवटी काही थेंब लिंबाचा रस किंवा सुगंधी तेल नालीमध्ये टाकणे. त्यामुळे बाथरूममध्ये ताजेपणाचा सुगंध पसरू शकतो.
कमी खर्चात मिळणारा हा साधा पदार्थ नालीतील घाण कमी करण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी बाथरूममधून वास येऊ लागला, तर महागड्या उत्पादनांऐवजी हा सोपा उपाय करून पाहण्यास हरकत नाही.
