Bathroom Hygiene Mistakes : आपण दिवसातून अनेकदा बाथरूम वापरतो, पण येथील काही सवयी आपल्याला आजारी पाडू शकतात, असा कधी विचार केला आहे का? अनेकदा आपण टॉयलेटचे झाकण बंद करत नाही, कित्येक दिवस एकच टॉवेल वापरत राहतो किंवा हात धुण्याकडे दुर्लक्ष करतो. या छोट्या गोष्टींचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते सविस्तर जाणून घेऊ…
१. फ्लश करताना टॉयलेटचे झाकण बंद करा
अनेक लोकांची सवय असते की ते टॉयलेट वापरल्यानंतर झाकण बंद न करताच फ्लश चालवतात, पण असे करणे टाळले पाहिजे. फ्लश चालवताना पाण्याचा फवारा उडतो आणि त्यातील अतिसूक्ष्म कण हवेत पसरतात. यामध्ये काही जंतू असू शकतात, जे आजूबाजूला ठेवलेल्या वस्तूंवर पोहोचू शकतात, त्यामुळे फ्लश चालवण्यापूर्वी टॉयलेटचे झाकण नेहमी बंद करा. यामुळे हवेत पसरणारे जंतू कमी होण्यास मदत होते. तसेच, टॉयलेटची नियमित स्वच्छता ठेवा आणि वापरानंतर हात नक्की धुवा.
२. टॉयलेटच्या जवळ टूथब्रश ठेवू नका
जर तुम्ही तुमचा टूथब्रश टॉयलेटच्या अगदी जवळ ठेवत असाल तर त्याची जागा त्वरित बदला. फ्लश चालवताना हवेत उडणारे सूक्ष्म कण आजूबाजूच्या वस्तूंवर बसतात. अशा स्थितीत उघड्यावर ठेवलेला टूथब्रशदेखील घाण होऊ शकतो, त्यामुळे टूथब्रश टॉयलेटपासून लांब एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा. वापरल्यानंतर तो पाण्याने नीट धुवून कोरडा होऊ द्या. जर तुम्ही टूथब्रशचे कव्हर वापरत असाल, तर त्यात हवा खेळती राहण्याची सोय असावी. ओला टूथब्रश पूर्णपणे बंद कव्हरमध्ये कधीही ठेवू नका.
३. कित्येक दिवस एकच टॉवेल वापरू नका
आपण सर्व जण अंघोळ केल्यानंतर किंवा तोंड धुतल्यानंतर ते पुसण्यासाठी टॉवेल वापरतो, पण तो वेळेवर धुणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ओल्या टॉवेलमध्ये ओलावा टिकून राहतो. तसेच त्यावर घाम, त्वचेची घाण आणि मृत पेशी जमा होतात. अशा ओलसर जागेवर बॅक्टेरिया आणि फंगस वेगाने वाढतात, त्यामुळे टॉवेल वापरल्यानंतर तो नीट पसरवून वाळवा. तो बाथरूममध्ये ओलाच सोडू नका आणि दर २ ते ३ दिवसांनी धुवून टाका. जर टॉवेलमधून दुर्गंधी येऊ लागली किंवा तो लवकर सुकत नसेल तर तो आधीच धुऊन घ्या.
https://www.instagram.com/reels/DerLBBmhwv2
४. एकाच साबणाचा वापर सर्वांनी मिळून करू नका
अनेक घरांमध्ये घरातील सर्व लोक अंघोळीसाठी एकाच साबणाचा वापर करतात. पण, स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाचा साबण वेगवेगळा ठेवणे अधिक चांगले ठरते. साबणाच्या ओल्या वडीवर घाण आणि काही बॅक्टेरिया राहू शकतात. विशेषतः जर कोणाला त्वचेचा संसर्ग (स्किन इन्फेक्शन) असेल, तर साबण शेअर करणे टाळले पाहिजे. साबण अशा जागी ठेवा, जिथे पाणी साचणार नाही आणि वापरल्यानंतर तो कोरडा होऊ शकेल. यासाठी पाणी सहज निचरा होणारा बॉक्स ठेवा.
५. हात धुण्यात अजिबात घाई करू नका
टॉयलेट वापरल्यानंतर फक्त पाण्याने हात धुणे कधीही पुरेसे नसते. हातांची चांगली स्वच्छता करण्यासाठी साबण आणि पाणी दोन्हीचा वापर करणे आवश्यक आहे. हात धुताना तळव्यांसह बोटांच्या मधली जागा आणि नखांच्या आजूबाजूचा भागदेखील नीट स्वच्छ करा. किमान २० सेकंदपर्यंत हातांना साबण लावून चोळा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टॉवेल किंवा टिश्यू पेपरने कोरडे करा. फक्त ५ सेकंद हात धुऊन बाहेर पडल्याने हातावरील घाण पूर्णपणे जात नाही, त्यामुळे या कामात कधीही घाई करू नका.
६. अंघोळीनंतर लुफा(घासणी) ओला सोडू नका
अंघोळ करताना शरीर स्वच्छ करण्यासाठी अनेक जण लुफा वापरतात. पण, अंघोळ झाल्यावर तो ओलाच सोडून देणे चुकीचे आहे. बाथरूममध्ये कायम ओलावा असतो, ज्यामुळे ओल्या लुफामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस वाढू शकतात. असा लुफा वारंवार वापरल्यामुळे त्वचेवर जळजळ किंवा त्रास होऊ शकतो, त्यामुळे लुफा वापरल्यानंतर तो चांगल्या प्रकारे धुवून अशा जागी लटकावा, जिथे मोकळी हवा येत असेल. तो बाथरूमच्या कोणत्याही ओलसर कोपऱ्यात टाकू नका. तसेच वेळोवेळी लुफा बदलत रहा.
७. टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसू नका
काही लोकांना टॉयलेटमध्ये बसून मोबाईल चालवण्याची किंवा व्हिडीओ पाहण्याची सवय असते. या नादात ते गरजेपेक्षा जास्त वेळ तिथेच बसून राहतात. पण, असे करणे आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. दीर्घकाळ टॉयलेट सीटवर बसून राहिल्यामुळे शौचाच्या जागेभोवती असलेल्या नसांवर अनावश्यक ताण पडू शकतो. यामुळे मूळव्याध (पाइल्स) सारख्या त्रासाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसू नका आणि काम संपल्यानंतर लगेच बाहेर या. शक्यतो ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिथे घालवू नका. मलविसर्जन करताना जास्त जोर लावणेदेखील टाळा. जर वारंवार बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
