Bathroom Mold Removal Easy Home Cleaning Tips: दिवसभराच्या धावपळीनंतर स्वच्छ बाथरूममध्ये अंघोळ करायला कोणाला आवडणार नाही? मात्र, बाथरूमच्या भिंतींवर काळे, हिरवे किंवा पांढरे डाग दिसू लागले तर संपूर्ण बाथरूम अस्वच्छ दिसू लागते. सुरुवातीला हे डाग लहान असल्यामुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हळूहळू हे डाग टाइल्स, भिंतींच्या सांध्यांमध्ये आणि ओलसर कोपऱ्यांमध्ये पसरू लागतात. एवढंच नाही तर बाथरूममध्ये सतत कुबट वासही येऊ लागतो. विशेष म्हणजे, घरात सहज उपलब्ध असलेल्या काही वस्तूंच्या मदतीने या डागांची स्वच्छता करता येऊ शकते. मग बाथरूमच्या भिंतींवर साचलेले हे डाग कसे काढायचे? आणि पुन्हा अशी समस्या उद्भवू नये यासाठी काय करायला हवं? जाणून घेऊया.
बाथरूमच्या भिंतींवर बुरशी का वाढते?
बाथरूममध्ये पाणी, वाफ आणि ओलावा सतत असतो. त्यातच हवा खेळती राहण्याची पुरेशी व्यवस्था नसेल तर भिंती आणि टाइल्सवर ओलसरपणा टिकून राहतो. अशा वातावरणात बुरशी वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. विशेषतः शॉवरच्या आसपासच्या भिंती, टाइल्समधील सांधे आणि पाणी साचणारे कोपरे येथे बुरशी अधिक प्रमाणात दिसून येऊ शकते. साबणाचे अवशेष, त्वचेतील तेलकट घटक आणि साचलेली घाण यांमुळेही ही समस्या वाढू शकते, त्यामुळे बाथरूम स्वच्छ दिसत असलं तरी त्यातील ओलसर भागांकडे दुर्लक्ष करू नका.
काळे डाग आणि कुबट वास देतात धोक्याचा संकेत?
बाथरूमच्या भिंतींवर काळे, हिरवे किंवा लालसर डाग दिसत असतील तर ते बुरशीची चिन्हे असू शकतात. काही वेळा पांढऱ्या रंगाचा, पावडरीसारखा थरही दिसतो. याशिवाय, बाथरूम स्वच्छ केल्यानंतरही कुबट वास कायम राहत असेल तर त्यामागे ओलावा किंवा लपलेल्या ठिकाणी वाढलेली बुरशी कारणीभूत असू शकते. अशा वेळी केवळ सुगंधी द्रव्यांचा वापर करून वास लपवण्याऐवजी त्यामागचं कारण शोधणं महत्त्वाचं आहे.
स्वस्तातील पांढऱ्या पावडरने हटू शकतात हट्टी डाग!
बाथरूमच्या टाइल्सवरील डाग काढण्यासाठी महागडी स्वच्छताद्रव्येच लागतात असं नाही. घरात सहज मिळणाऱ्या एका पांढऱ्या पावडरचाही स्वच्छतेसाठी उपयोग करता येतो. यासाठी एका फवारणीच्या बाटलीत पाणी घेऊन त्यात एक मोठा चमचा ही पावडर मिसळा. बाटली हलवून हे मिश्रण डाग असलेल्या भिंतींवर किंवा टाइल्सवर फवारा. त्यानंतर मऊ स्पंज किंवा टाइल्सना ओरखडे पडणार नाहीत अशा घासणीने तो भाग स्वच्छ करा. शेवटी पाण्याने पृष्ठभाग धुऊन घ्या. डाग पूर्णपणे निघाले नसतील तर आवश्यकतेनुसार ही प्रक्रिया पुन्हा करता येते.
मात्र, ही पांढरी पावडर नेमकी कोणती आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ती म्हणजे बेकिंग सोडा. हट्टी डागांसाठी बेकिंग सोड्यात थोडं कोमट पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून सुमारे १० मिनिटे ठेवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने किंवा छोट्या स्वच्छता ब्रशने तो भाग हलक्या हाताने घासा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. टाइल्समधील सांध्यांवर बुरशी जास्त असेल तर त्या भागासाठी खास तयार केलेल्या स्वच्छताद्रव्याचा वापर करणं अधिक योग्य ठरू शकतं.
व्हिनेगर वापरताना ही चूक अजिबात करू नका!
बाथरूममधील काही टाइल्स आणि सांध्यांवरील डाग स्वच्छ करण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचाही वापर केला जातो. त्यासाठी फवारणीच्या बाटलीत व्हिनेगर घेऊन प्रभावित भागावर फवारा आणि पृष्ठभागाच्या प्रकारानुसार योग्य काळजी घेत स्वच्छता करा. मात्र, व्हिनेगरचा वापर करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. व्हिनेगर कधीही ब्लीच किंवा इतर स्वच्छताद्रव्यांसोबत मिसळू नका. अशा मिश्रणांमुळे धोकादायक वायू तयार होऊ शकतात.
बुरशी काढण्यासाठी ब्लीच वापरण्याचा विचार करत असाल तर उत्पादनाच्या लेबलवरील सूचना पाळा. हातमोजे वापरा, खिडकी उघडा किंवा हवा बाहेर सोडणारा पंखा सुरू ठेवा. ब्लीच कोणत्याही दुसऱ्या स्वच्छताद्रव्यासोबत मिसळू नका. स्वच्छतेनंतर पृष्ठभाग योग्य प्रकारे धुऊन घ्या.
पुन्हा बुरशी साचू नये यासाठी काय कराल?
बुरशी साफ केल्यानंतरही बाथरूममधील ओलावा कमी केला नाही तर ही समस्या पुन्हा उद्भवू शकते, त्यामुळे अंघोळीनंतर भिंती, काच आणि फरशीवर साचलेलं अतिरिक्त पाणी पुसून टाका. बाथरूममध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या. शक्य असल्यास खिडकी उघडी ठेवा किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू करा. शॉवरचा पडदा आणि बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवल्यानेही हवा खेळती राहण्यास मदत होते. साबणाचे अवशेष आणि घाण साचू नये म्हणून नियमित स्वच्छता करणं आवश्यक आहे.
बुरशी वारंवार वाढत असेल तर दुर्लक्ष करू नका!
वारंवार स्वच्छता करूनही बुरशी पुन्हा दिसत असेल, मोठ्या भागावर पसरली असेल किंवा भिंतींमध्ये पाणी झिरपत असल्याची शंका असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या. अशा परिस्थितीत केवळ वरवरची स्वच्छता पुरेशी ठरणार नाही. भिंतींमधील ओलावा किंवा पाण्याची गळती यांसारख्या मूळ समस्येवर उपाय करणं गरजेचं आहे. योग्य स्वच्छता, पुरेसं वायुवीजन आणि ओलाव्यावर नियंत्रण ठेवल्यास बाथरूम स्वच्छ राखण्यास आणि बुरशीची समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी करण्यास मदत होऊ शकते.
