Why Diet Needs Change in Summer : तापमान ४० अंशांच्या पुढे गेले की शरीरावर उष्णतेचा ताण वाढतो. अशा वेळी फक्त पाणी पिणे पुरेसे ठरत नाही, तर रोजच्या आहारातही बदल करणे आवश्यक ठरते. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी हलका, पचायला सोपा आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला आहार महत्त्वाचा असतो. मात्र, काही भाज्या अशा आहेत ज्या उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीरातील ‘इंटरनल हीट’ वाढू शकते.
या भाज्यांमुळे वाढू शकते शरीरातील उष्णता (Vegetables That May Increase Body Heat)
तज्ज्ञांच्या मते, गाजर, मुळा आणि शालगम/सलगम (Turnip -एकाप्रकारचे कंदमुळे) कंद मुळ भाज्या पचायला जड असतात. त्यामध्ये फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स भरपूर असल्याने शरीराला त्या पचवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते, ज्यामुळे चयापचय उष्णता वाढते. शेवगा हा पौष्टिक असली तरी त्यातील जास्त फायबर पचनक्रिया वेगवान करते आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.
कच्चा कांदा थोड्या प्रमाणात थंडावा देतो, पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस आणि पचनासंबंधी त्रास निर्माण होऊ शकतो.
गवारच्या शेंगेमुळे पोटात गॅस तयार होतो, ज्यामुळे निर्जलीकरणाचा धोका वाढतो वांग्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असल्याने ते शरीरात उष्णता वाढवू शकते आणि पोटफुगी होण्याची शक्यता असते. मोहरीची भाजी शरीरात उष्णता निर्माण करून घामोळ्या आणि सूज वाढवू शकतो.
शिजवण्याची पद्धतही ठरते महत्त्वाची (Cooking Methods Matter in Summer)
फक्त भाजीच नव्हे तर ती कशी शिजवली जाते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तळलेले पदार्थ जसे भेंडी फ्राय, वांगे भजा किंवा बटाट्याचे तळलेले पदार्थ शरीरात चरबी वाढवतात आणि पचन मंदावतात. जास्त मसालेदार तडका जसे सुकी लाल मिरची, लवंग, काळी मिरी आणि गरम मसाला, हे शरीरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्यात असे पदार्थ टाळणे योग्य ठरते.
उन्हाळ्यासाठी योग्य शिजवण्याचे पर्याय (Better Cooking Options for Summer)
भाज्या वाफवून, उकडून किंवा हलक्या तेलात थोडेसे परतून खाणे अधिक योग्य ठरते. यामुळे भाज्यांतील पाण्याचे प्रमाण टिकून राहते, पचन सुलभ होते आणि शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही.
उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात? (Best Vegetables for Summer Diet)
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्या आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरते. दुधी भोपळा , दोडका, पेठा, काकडी आणि कच्चे केळे या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. या भाज्या पचायला हलक्या असून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. लोह आणि फोलेटसाठी मोहरीच्या भाजीऐवजी हलके वाफवलेले पालक किंवा अळूची पाने अधिक योग्य पर्याय ठरतात.
थोडे-थोडे खा, शरीर ठेवा थंड (Eat Smart to Stay Cool)
उन्हाळ्यात एकावेळी जास्त खाण्यापेक्षा कमी प्रमाणात पण वारंवार खाणे योग्य ठरते. यामुळे पचनावर ताण येत नाही आणि शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. भाज्या उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नये, कारण त्यात पोषक घटक असतात. त्यावर लिंबू पिळल्यास व्हिटॅमिन C मिळते आणि लोहचे शोषण सुधारते.
निष्कर्ष (Conclusion)
उन्हाळ्यात आहाराचे नियोजन करताना केवळ काय खायचे यापेक्षा कसे खायचे आणि किती खायचे हे देखील महत्त्वाचे ठरते. योग्य भाज्यांची निवड आणि योग्य शिजवण्याची पद्धत अवलंबल्यास उष्णतेचा त्रास कमी करता येतो आणि शरीर निरोगी ठेवता येते.
