Face Shaving For Women : चेहऱ्यावर बारीक बारीक केस असणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र, काही मुलींच्या चेहऱ्यावर थोडे जास्त केस असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा निस्तेज दिसू लागते आणि मेकअपदेखील व्यवस्थित बसत नाही, ज्याला केकी (Cakey) मेकअप, असे म्हणतात. अशा वेळी हे नकोसे केस काढण्यासाठी अनेक मुली फेस शेव्हिंगचा पर्याय निवडतात. परंतु, शेव्हिंग केल्यामुळे चेहऱ्याचे केस पूर्वीपेक्षा जास्त जाड किंवा दाट तर होणार नाहीत ना? अशी एक सामान्य भीती अनेकांच्या मनात असते. तुमच्याही मनात असे प्रश्न असतील, तर खालील माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
मुलींनी चेहऱ्यावरील केस शेव करावेत का?
त्वचा तज्ज्ञ सांगतात की, मुलीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरील केस शेव करू शकतात. मात्र, हे करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. डर्मेटोलॉजिस्टच्या मते, शेव्हिंग केल्यामुळे चेहऱ्यावरील केस जाड किंवा दाट होत नाहीत. हा केवळ एक गैरसमज आहे. शेव्हिंग करताना आपण फक्त त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावरील केस कापतो आणि त्यामुळे केसांची जाडी किंवा वाढ यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. काही दिवसांनंतर केस जसेच्या तसे पुन्हा वाढतात.
चेहरा शेव करण्याची योग्य पद्धत:
चेहरा स्वच्छ धुवा: तज्ज्ञांच्या मते, फेस शेव्हिंग करण्यापूर्वी त्वचा उत्तम प्रकारे स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. चेहरा चांगल्या प्रकारे धुऊन घेतल्यावरच शेव्हिंग करायला सुरुवात करा. त्यामुळे त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाते, ज्यामुळे शेव्हिंग करताना जळजळ किंवा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
समस्या असलेल्या भागात शेव्हिंग टाळा : जर चेहऱ्यावर आधीपासूनच जळजळ, लालसरपणा (Redness), मुरमे (Acne) किंवा संसर्ग झाला असेल, तर त्या भागावर शेव्हिंग करणे टाळा. त्यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
केसांच्या दिशेने शेव्हिंग करा: रेझर नेहमी केसांच्या वाढीच्या दिशेनेच चालवावा. म्हणजेच ज्या दिशेने केस वाढत आहेत, त्याच दिशेने रेझर न्यावा. केसांच्या विरुद्ध दिशेने शेव्हिंग केल्यामुळे इनग्रोन हेअर्सची (Ingrown Hair) समस्या होऊ शकते आणि त्वचा कापण्याची शक्यतादेखील वाढते.
शेव्हिंग केल्यानंतर चेहऱ्यावर काय लावावे?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेव्हिंग केल्यानंतर त्वचा थोडी संवेदनशील (Sensitive) होऊ शकते. म्हणूनच शेव्हिंग झाल्यानंतर त्वचेवर एक चांगले आणि शांत करणारे (Soothing) मॉइश्चरायझर आवर्जून लावा. त्यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि जळजळ किंवा लालसरपणाची समस्या कमी होते.
अशा प्रकारे योग्य पद्धतीने आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही अगदी सहजपणे फेस शेव्हिंग करू शकता.
