Beetroot juice and health problems: बीट आरोग्यासाठी अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे. त्यात फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे ही भाजी रक्तवर्धक ठरते. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यानुसार बीटाचेही अति सेवन करू नये, कारण ते आरोग्य सुधारण्याऐवजी हानी पोहोचवू शकते. बीटमध्ये ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते. हे ऑक्झॅलेट कॅल्शियमसोबत संयोग करून किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) तयार करू शकतात. दररोज मोठ्या प्रमाणात बीट खाल्ल्याने किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
‘या’ समस्याग्रस्तांनी चुकूनही खाऊ नये बीट
कमी रक्तदाब असलेल्यांनी: ज्या लोकांना कमी रक्तदाब आहे, त्यांनी बीट खाणे टाळावे. बीटामुळे रक्तदाब झपाट्याने कमी होतो आणि त्यामुळे बीट खाल्ल्याने कमी रक्तदाबाचा त्रास आणखी बिघडू शकतो, ज्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा आणि व्यक्ती अगदी बेशुद्धावस्थेमध्येसुद्धा जाऊ शकते.
यकृतावर परिणाम: बीटमधील नायट्रेटवर यकृताद्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे यकृतावर परिणाम होऊन यकृताला सूज येऊ शकते.
मूत्रविकार समस्या: जास्त प्रमाणात बीट खाल्ल्याने शौच आणि लघवीचा रंग बदलू शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात बीट खाणे टाळणे महत्त्वाचे आहे.
गर्भवती : गर्भवती महिलांना बीट खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. बीटमधील नायट्रेट्समुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
मधुमेह असलेल्यांसाठी : बीटामध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे याचे कमी प्रमाणात सेवन करणे ठीक मानले जाते. परंतु, जर मधुमेहींनी बीट किंवा त्याच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन केले, तर ते त्यांच्या साखरेची पातळी वाढवू शकते, जे हानिकारक असू शकते.
किडनी स्टोनची समस्या : बीटामध्ये ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी मर्यादित प्रमाणात बीटाचे सेवन करावे.
पोटाच्या समस्या : बीटामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते; परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून ज्यांना आधीच पोटाच्या समस्या आहेत, त्यांनी बीटाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
रक्तदाबाची औषधे : बीटामधील नायट्रेट घटकांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. उच्च रक्तदाबासाठी औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
अॅलर्जी : काही लोकांना बीटामधील विशिष्ट प्रथिनांमुळे अॅलर्जी असू शकते. त्यामध्ये खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास् घेण्यास त्रास होणे या लक्षणांचा समावेश असू शकतो.
बीटचे सेवन प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. तसे केल्याने शरीराला त्याचे सर्व फायदे मिळतात आणि कोणतेही दुष्परिणाम टाळता येतात.
