आपल्याकडे लग्नात ‘शुभमंगल सावधान’ म्हटले जाते. यामागचे शास्त्र पंडित मंडळीच सांगू शकतील.. परंतु लग्न करणाऱ्यांनी वैद्यकीय ज्ञानाच्या दृष्टीने खरोखरच सावधान असले पाहिजे, अन्यथा राजस व माधवीप्रमाणे त्यांच्या वाटय़ाला दु:ख येऊ शकते. माधवी गर्भवती असताना रक्ताच्या चाचणीमध्ये ती मायनर थॅलेसेमिक असल्याचे आढळून आले. तिच्या डॉक्टरांनी राजसची थॅलेसेमियाची चाचणी करण्यास सांगितले. राजस चाचणीसाठी गेलाही होता. तेथील गर्दी पाहून कामाला उशीर होणार म्हणून निघून गेला. पुढे माधवीला मुलगा झाल्यानंतर घरातल्या सर्वानी आनंद साजरा केला; परंतु थोडय़ाच दिवसांत बाळाच्या प्रकृतीचे काही प्रश्न निर्माण झाले आणि रक्ताची चाचणी केली असता बाळ ‘थॅलेसेमिया मेजर’ असल्याचे आढळून आले.. त्या दिवशी कार्यालयामधील कामाची पर्वा न करता आपण चाचणी केली असती तर.. आज राजस-सुजाताच्या मुलाला दर तीन आठवडय़ांनी बाहेरून रक्त द्यावे लागते, कारण बाळाच्या शरीरात थॅलेसेमिया मेजरमुळे रक्तनिर्मिती होण्यात अडथळा येतो. परिणामी त्यांना बाहेरून रक्त द्यावे लागते. साधारणपणे आयुष्यभरात अशा मुलाला दर तीन आठवडय़ांनी एकदा याप्रमाणे दोन हजार रक्ताच्या पिशव्या चढवाव्या लागतात.. याशिवाय रक्तात जमा होणारे अतिरिक्त लोहाचे (आयर्न डिपॉझिट) प्रमाण संतुलित राखण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या औषधांचा खर्च वेगळाच.
भारतात आजमितीला सुमारे चार कोटी थॅलेसेमिया मायनर असलेल्या व्यक्ती आहेत. जगभरात हेच प्रमाण २५ कोटी असून दोन भिन्नलिंगी मायनर थॅलेसेमियाच्या व्यक्तींनी लग्न केल्यास त्यांना होणारे मूल हे थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी तुमची व जोडीदाराची थॅलेसेमियाची चाचणी करून घ्या. रक्ताच्या एका छोटय़ाशा चाचणीने तुमच्या व येणाऱ्या बाळाच्या आयुष्याचा खडतर प्रवास रोखता येऊ शकतो, असे पालिकेच्या शीव रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. ममता मांगलानी यांनी सांगितले. भारतात दरवर्षी सुमारे दहा हजार थॅलेसेमिया मेजरचा आजार असलेली मुले जन्मला येतात. पूर्वी यातील ९० टक्के मुलांना उपचारापूर्वीच मृत्यू यायचा. आता महाराष्ट्रात तसेच देशातील अनेक राज्यांनी या मुलांना मोफत रक्तपुरवठा तसेच औषधोपचार सुरू केल्यामुळे हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. तथापि या मुलांचे जीवनमान असेपर्यंत केवळ औषधांवर येणारा खर्च हा पन्नास लाखांपेक्षा जास्त असतो. प्रामुख्याने सिंधी, कच्छी, बंगाली, पंजाबी, मुस्लीम आणि कुणबी समाजात थॅलेसेमियाच्या व्यक्ती आढळतात.