Guava benefits and side effects : सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची सवय अनेकांना असते. काही जण दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करतात, तर काही जण भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा खजूर, मनुके खातात. अनेकजण मध आणि लिंबू पाणी पितात, तर काहींच्या दिवसाची सुरुवात आवळ्याचा रस किंवा जिऱ्याचे पाणी पिऊन होते. मात्र, रिकाम्या पोटी नेमके काय खावे किंवा प्यावे आणि कोणत्या गोष्टींचा शरीराला फायदा होऊ शकतो, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी पेरू खाऊ शकता का? याबद्दल नुकतंच द इंडियन एक्स्प्रेसने ठाण्यातील केआयएमएस (KIMS) हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ, डीटी अमरीन शेख यांच्याशी चर्चा केली. दिवसाची सुरुवात पेरू खाऊन करणे म्हणजे तुमच्या आहारात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. कारण पेरूमध्ये असलेल्या भरपूर फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, पोट बराच वेळ भरलेले राहते आणि दिवसभरात अनावश्यक खाण्याची (स्नॅकिंगची) सवय कमी होण्यास मदत होऊ शकते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती, त्वचेचे आरोग्य आणि कोलेजनच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. पेरूमध्ये असणारा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्याने, संतुलित नाश्त्याचा भाग म्हणून त्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक न वाढता शरीराला हळूहळू आणि स्थिर स्वरूपात ऊर्जा मिळत राहते.
रिकाम्या पोटी पेरूचे सेवन करणे सुरक्षित आहे का?
पेरू सामान्यतः पचायला हलका असतो आणि तो रिकाम्या पोटी खाल्ला जाऊ शकतो. मात्र, ज्यांचे पोट संवेदनशील आहे किंवा ज्यांना ‘आयबीएस’ (IBS) सारखे पचनाचे विकार आहेत, त्यांना पेरूमध्ये असलेल्या भरपूर फायबरमुळे पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते; विशेषतः जर त्यांना फायबरयुक्त पदार्थ खाण्याची सवय नसेल तर. अशा परिस्थितीत, पेरूसोबत मूठभर सुका मेवा (नट्स) खाणे किंवा नाश्त्यानंतर त्याचे सेवन करणे अधिक चांगले ठरेल.
वजन कमी कारण्यासाठी फायदा होईल का?
पेरू हा वजन व्यवस्थापन योजनेचा एक उत्तम भाग ठरू शकतो. कारण – त्यात नैसर्गिकरित्या कॅलरीज कमी आणि फायबर (तंतुमय पदार्थ) भरपूर प्रमाणात असतात. फायबरमुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते, ज्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास आणि दिवसाच्या उत्तरार्धात अतिखाणे टाळण्यास मदत होऊ शकते. मात्र, केवळ एखादे फळ खाल्ल्याने वजन कमी होत नाही. तर नियमित खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचाल आणि संतुलित आहार हेच वजन कमी करण्यासाठीचे मुख्य घटक आहेत जे प्रत्येकाने लक्षात ठेवून फॉलो केले पाहिजेत.
काय लक्षात ठेवावे?
बहुतेक लोकांसाठी मध्यम आकाराचा पेरू खाणे योग्य प्रमाण आहे. पेरूवर मीठ, साखर किंवा तिखट मसाले वारंवार टाकणे टाळावे, कारण यामुळे त्याचे आरोग्यदायी फायदे कमी होऊ शकतात. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी आहारात फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवावे आणि शरीरात पुरेसे पाणी राहील याची काळजी घ्यावी. मधुमेह असलेल्या व्यक्तीही आपल्या आहारात पेरूचा समावेश करू शकतात. मात्र, पेरू खाताना दिवसभरातील एकूण कर्बोदकांचे प्रमाण लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांनी किंवा आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या आहार योजनेनुसारच पेरूचे सेवन करावे. केवळ पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित होते, असा समज करून घेऊ नये.
