Morning Drinks That Transform Your Gut & Energy : आपण दिवसभरात नेमकं काय खाल्लं पाहिजे याकडे बारकाईने लक्ष देतो. पण, सकाळी उठल्यावर सर्वांत आधी काय सेवन करायला पाहिजे याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. पण, दिवसाची सुरुवातच तुमच्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक ठरवते. पाणी पिण्यापासून ते कॉफीचा आस्वाद घेण्यापर्यंत, सकाळच्या सवयी व्यक्तीनुसार बदलतात आणि बऱ्याचदा त्या सवयी वैयक्तिक आरोग्याची उद्दिष्टे आणि जीवनशैलीवर अवलंबून असतात.

अलीकडेच, आहारतज्ज्ञ दीपशिखा जैन यांचा ‘fries.to.fit’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सकाळी ६ वाजता रिकाम्या पोटी त्या कशाचे सेवन करतात आणि त्याचे फायदे काय याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे. तर तज्ज्ञ दररोज दिवसाची सुरुवात कोणत्या तीन गोष्टींपासून करतात त्याबद्दल जाणून घेऊयात…

पाणी

सकाळी उठल्यावर तज्ज्ञ सगळ्यात आधी २५० मिली पाणी पितात. उठल्यावर त्यांना अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) जाणवते. त्यामुळे इतर काहीही सेवन करण्यापूर्वी शरीरातील पाण्याची पातळी भरून काढणे (हायड्रेशन) गरजेचे ठरते. सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने रात्री झोपेत शरीरात कमी झालेल्या द्रवपदार्थांची भरपाई होण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करता येते.

आरोग्यदायी फॅट्स

पाणी प्यायल्यानंतर आहारतज्ज्ञ आरोग्यदायी फॅट्सचा समावेश करतात. त्यासाठी त्या सकाळी ‘व्हर्जिन कोकोनट ऑईल’चे (शुद्ध खोबरेल तेल) सेवन करतात. अशा प्रकारची आरोग्यदायी चरबी शरीराला ऊर्जा देण्यास व एकूण आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकते. सकाळी उठल्यावर सर्वांत आधी अशा आरोग्यदायी फॅट्सचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहण्यास मदत होऊ शकते, बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि दिवसभरात अति भूक लागणे किंवा चिडचिड होणे यांसारख्या समस्या टाळता येतात.

ब्लॅक कॉफी

त्यांच्या सकाळच्या दिनचर्येतील शेवटचा टप्पा म्हणजे एक कप ब्लॅक कॉफी. खोबरेल तेल घेतल्यानंतर तज्ज्ञ ब्लॅक कॉफी पितात. ही त्यांच्या दिनचर्येतील सर्वांत आवडती गोष्ट आहे. ब्लॅक कॉफीमुळे त्यांना दिवसभर अधिक सतर्क व एकाग्र राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील ‘कॉर्टिसोल’ची (सकाळी नैसर्गिकरीत्या वाढणारे संप्रेरक) पातळी ३० ते ४० टक्क्यांनी वाढू शकते, ज्यामुळे जागृत राहण्यास मदत होते. ब्लॅक कॉफीमध्ये ‘पॉलीफेनॉल्स’ असता, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी (gut health) फायदेशीर ठरू शकतात.

सोपी दिनचर्या

थोडक्यात सांगायचे तर आहारतज्ज्ञ आपल्या दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करतात, त्यानंतर एक चमचा व्हर्जिन कोकोनट ऑईल घेतात आणि मग ब्लॅक कॉफी पितात. त्यानंतरच त्या आपल्या उर्वरित दैनंदिन कामांना सुरुवात करतात.