Empty Stomach Dates Benefits : खजूर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाणारे एक फळ आहे; पण सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? याविषयी प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ व यूट्यूबर डॉ. सलीम झैदी यांनी यूट्यूब व्हिडीओद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे अनेक फायदे सविस्तर जाणून घेऊ…
पोषक तत्त्वांचा खजिना असलेला खजूर शरीराला फक्त ऊर्जाच देत नाही, तर अनेक गंभीर आजारांपासून संरक्षणही करतो. डॉ. झैदी यांच्या मते, खजूर हे एक सुपरफूड आहे. खाण्याची योग्य पद्धत वापरल्यास हे फळ शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे प्रमुख फायदे
ऊर्जेचा उत्तम स्रोत : खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज व सुक्रोज यांसारखी नैसर्गिक साखरेची मात्रा भरपूर असते. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा, तसेच अशक्तपणा दूर होतो.
पचनक्रिया सुधारते : खजुरामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनसंस्था सुलभतेने कार्य करते आणि बद्धकोष्ठतेच्या (constipation) समस्येपासून आराम मिळतो.
हाडांच्या बळकटीसाठी : यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर व सेलेनियम यांसारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत करतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून बचाव करतात.
रक्ताची कमतरता दूर होते: खजूर हा लोहाचा (Iron) उत्तम स्रोत आहे. रोज त्याचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि ॲनिमियासारख्या समस्येत आराम मिळतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : खजुरामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम: स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतो. त्यामुळे डिमेंशियाचा धोकाही कमी होतो.
वजन वाढवण्यास उपयुक्त: ज्या लोकांना आरोग्यदायी पद्धतीने वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: क व ड या जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेला खजूर त्वचेचा तजेलदारपणा टिकवून ठेवतो, सुरकुत्या रोखतो आणि केसांना मुळापासून पोषण देतो.
