Benefits Of Eating 3 Eggs Daily : निरोगी राहण्यासाठी रोज अंडी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. अंडी हा प्रथिनांचा (Protein) उत्तम स्त्रोत आहे आणि विशेषतः हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी लोक अंड्यांचे सेवन करतात. पण याचे एवढेच फायदे नाहीत, अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. म्हणूनच असे म्हटले जाते की, “संडे हो किंवा मंडे, रोज खाओ अंडे!” स्वतः डॉक्टर शरीराला आवश्यक असलेल्या प्रथिनांसाठी आहारात अंड्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. अंड्याला एक ‘सुपरफूड’ म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया, दररोज ३ अंडी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात.

हिवाळ्यात अंडी खाणे उत्तम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ‘ISIC मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल’च्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि हेपेटोबिलियरी सायन्स विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. शुभम वात्स्य यांच्या मते, रोज अंडी खाल्ल्याने वजन कमी करण्यास आणि यकृत (Liver) निरोगी ठेवण्यास मदत होते.

१. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

डॉ. शुभम सांगतात की, त्यांनी दररोज ३ अंडी खाऊन ३ वर्षांत आपले ३८ किलो वजन कमी केले आहे. त्यांच्या मते, रोज तीन अंडी खाल्ल्याने शरीराला १८ ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिन (High Quality Protein) मिळते. यामध्ये सर्व आवश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात, जे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी (Muscle Recovery) आणि फॅट मेटाबॉलिझमसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.

२. यकृतासाठी (Liver) गुणकारी

अंड्याचा पिवळा भाग (Egg Yolk) हा ‘कोलिन’ (Choline) नावाच्या महत्त्वाच्या पोषकतत्वाचा एक चांगला स्त्रोत आहे. हे पोषकतत्व यकृतातील चरबी कमी करण्यास आणि यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. म्हणूनच अंड्याला ‘लिवर सपोर्ट फूड’ म्हटले जाते.

३. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत

दररोज अंडी खाल्ल्याने शरीरात ‘HDL’ म्हणजेच चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि ‘LDL’ म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि कार्डिओव्हस्कुलर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

४. संतुलित आहार (Balanced Diet)

अंडी खाल्ल्याने शरीरातील आवश्यक पोषकतत्वांची कमतरता भरून निघते. अंडी हा एक संतुलित आहार मानला जातो. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, अंड्याच्या पिवळ्या भागात झेक्सॅंथिन सारखे प्रतिऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अंड्यामध्ये आढळणारे प्रतिऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात आणि अकाली म्हातारपण येण्यापासून रोखतात.

त्यामुळे आजपासूनच आपल्या आहारात दररोज ३ अंड्यांचा समावेश करा. यामुळे अवघ्या एका महिन्यात तुमच्या शरीरात उत्तम बदल पाहायला मिळतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)