चेहऱ्याचे आरोग्य चांगले रहावे यासाठी तो स्वच्छ ठेवणे सर्वाधिक गरजेचे आहे. वाढते प्रदूषण, आपल्याला येणारा घाम आणि इतरही अनेक कारणांनी चेहरा खराब होतो. तो साफ करण्यासाठी आपण तो साध्या पाण्याने तर कधी साबणाने धुतो. मागच्या काही काळापासून फेसवॉशचा वापर वाढला आहे. त्यामुळे फेसवॉशच्या कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरु झाल्याचे दिसते. आपला फेसवॉश वापरणे कसे चांगले हे प्रत्येक कंपनी जाहिरातीच्या माध्यमातून समजावून देत असते. पण फेसवॉश वापरणे चांगले असून आपल्या त्वचेचा प्रकार पाहून कोणता फेसवॉश वापरायचा ते ठरवायला हवे. सकाळी चेहऱ्यावर एकप्रकारचे तेल जमा झालेले असते. ते साफ करण्यासाठी आणि संध्याकाळी चेहऱ्यावरील थकवा जावा यासाठी फेसवॉश वापरावा. त्यामुळे प्रदूषणामुळे साचलेले घटकही कमी होण्यास मदत होते. मात्र जर तुम्ही योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने चेहरा धुतला तर चेहरा चांगला राहण्यास मदत होते. तुम्हाला रासायनिक फेसवॉश नको असेल तर नैसर्गिक फेसवॉशचे पर्यायही बाजारात उपलब्ध असतात. पाहूयात चेहरा धुण्याचे फायदे…

१. चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहण्यास मदत – चेहऱ्याला योग्य पद्धतीने क्लिंझिंग करणे गरजेचे असते. त्वचेतील pH ची पातळी योग्य असल्यास चेहरा मुलायम आणि चमकदार दिसण्यास मदत होते. फेसवॉशमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते आणि त्वचेमध्ये असणारे नैसर्गिक मॉईश्चर चेहऱ्याचे संरक्षण करते.

२. मृत त्वचा निघून जाण्यास मदत – चेहरा धुतल्याने केवळ त्यावरील तेल आणि घाण निघून जाण्यास मदत होत नाही. तर कोरडेपणामुळे आलेले त्वचेचा भाग आणि मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे तुमचा चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

३. त्वचा तरुण दिसते – तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी जेव्हा निघून जातात. तेव्हाच तुमची त्वचा योग्य पद्धतीने श्वास घेऊ शकते. त्यामुळे फेसवॉशने चेहरा धुणे आवश्यक असते. चेहऱ्यावरील मॉईश्चर टिकून रहावे आणि तो अधिकाधिक तरुण दिसावा यासाठी दिवसातून २ वेळा फेसवॉशने चेहरा धुण्याचा निश्चितच उपयोग होतो.

४. रक्ताभिसरण क्रिया चांगली होण्यास मदत – चेहरा धुताना आपण तो हाताने चोळतो. त्यामुळे येथील पेशींची हालचाल होते. यामुळे नकळत चेहऱ्याचा मसाज होतो आणि चेहऱ्यावर एकप्रकारचा ग्लो येतो. चेहरा धुतल्याने रक्ताभिसरणक्रिया चांगली होण्यास मदत होते.