Eating Fennel Seeds After Meal Benefits : हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण जेवल्यानंतर कितीही पोट भरलं तरीही मूठभर का होईना बडीशेप आपण प्रत्येक जण खातो. त्याचबरोबर जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर खाण्याची भारतीय घरांमध्ये एक जुनी परंपरा आहे. पण, बडीशेप फक्त मुखवास म्हणून खाल्ली जाते का? तर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, जेवणानंतर बडीशेप खाणे केवळ चवीसाठीच नाही, तर पचनसंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी एक वैज्ञानिक औषध म्हणूनही काम करते. बडीशेपमध्ये अ‍ॅनेथोल आणि इतर पोषक तत्त्वे असतात, जी आम्लपित्त, पोट फुगणे व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करतात.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांच्या मते, जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खाणे पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बडीशेपमध्ये असे नैसर्गिक घटक असतात, जे वायू धरणे (गॅस), पोट फुगणे, अपचन आदी आरोग्य समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यात तंतुमयता या घटकासहदाहविरोधी संयुगे असतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. जर जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय लावली, तर तुमच्या पचनाच्या समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

पचनक्रिया सुधारते

पचनसंस्था मजबूत करण्यासाठी बडीशेप अत्यंत प्रभावी मानली जाते. त्यातील तंतुमयता आणि इतर नैसर्गिक घटक अन्न लवकर आणि सहज पचण्यास मदत करतात. बडीशेप पाचक एंझाइम्सचा स्राव वाढवते, ज्यामुळे वायू धरणे, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या काही प्रमाणात कमी होतात. जेवणात जड किंवा तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर बडीशेपचे सेवन केल्यास पोट हलके होण्यास आणि पचनक्रिया संतुलित राखण्यास मदत होते.

Award Banner

तोंडाची दुर्गंधी दूर होते

बडीशेप नैसर्गिकरीत्या तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे काम करते. त्यातील सुगंधी तेल, जीवाणूनाशक गुणधर्म तोंडातील दुर्गंधीला कारणीभूत असलेल्या जीवाणूंना कमी करतात. बडीशेप चावल्याने लाळेचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तोंड स्वच्छ होण्यास आणि तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. जेवणानंतर नियमितपणे बडीशेपचे सेवन केल्याने तुमचा श्वास दीर्घकाळ ताजा राहण्यास मदत होते.

पोटाला आराम देते

बडीशेपमध्ये आकुंचनरोधक आणि वायुनाशक गुणधर्म आहेत, जे पोटाचे स्नायू शिथिल करतात आणि पेटके किंवा वेदना कमी करतात. त्यामुळे आतड्यांमध्ये अडकलेला वायू बाहेर टाकला जाण्यास मदत होते, ज्यामुळे पोट फुगण्याच्या त्रासासह अस्वस्थता कमी होते. बडीशेपचे सेवन केल्याने पोटात थंडावा जाणवतो आणि पचनसंस्थेला आराम मिळतो, विशेषतः जेव्हा तुम्हाला छातीत जळजळ किंवा जडपणा जाणवतो.

जेवणानंतर बडीशेप खासल्ल्यास पचनावर कसा परिणाम होतो?

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’ आणि ‘बायोमेड रिसर्च इंटरनॅशनल’नुसार, बडीशेपच्या बियांमध्ये ‘ॲनेथोल’ नावाचा एक सक्रिय घटक असतो. हे संयुग आतड्यांच्या गुळगुळीत स्नायूंना शिथिल करते. जेव्हा आपण जास्त किंवा जड अन्न खातो, तेव्हा आतडी ताणली जाऊ शकतात किंवा त्यांना पेटके येऊ शकतात. बडीशेप हा ताण कमी करते, ज्यामुळे वायू धरणे, पोट फुगणे आणि अपचनापासून त्वरित आराम मिळतो. बडीशेप चावल्याने तोंडातीलं लाळेचे उत्पादन वाढते. लाळेमध्ये पाचक एंझाइम्स असतात, जे तोंडात अन्न पचवण्याची प्रक्रिया सुरू करतात. बडीशेप यकृताला पित्त तयार करण्यास उत्तेजित करते, जे चरबी पचवण्यासाठी आवश्यक आहे.

कसे करावे सेवन?

जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खा. तुम्ही ती थेट खाऊ शकता किंवा हलकी भाजून घेऊ शकता. तुम्ही जेवणानंतर बडीशेपमध्ये खडीसाखरेचे काही दाणे मिसळूनही खाऊ शकता. या दोन्हीच्या मिश्रणामुळे तुमच्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारेल.

निष्कर्ष : जेवणानंतर दररोज बडीशेपचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होते.