Jackfruit Health Benefits & Side Effects : उन्हाळा सुरू होताच बाजारात मोठ्या प्रमाणात फणस उपलब्ध होतात. पिकलेला फणस रसाळ गोड असतो, जो कापण्यास थोडा अवघड असला तरी फार कमी लोकांना तो खाण्याचे फायदे माहिती आहेत. पोषक घटकांमुळे त्याला ‘सुपरफूड’ असेही म्हटले जाते. विशेषतः तो फायबरचा एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक स्रोत आहे.

आयुर्वेदातही फणसाचे आरोग्यासाठी असणारे फायदे सांगितले आहेत. तो शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करतो. कच्चा फणस योग्य प्रकारे शिजवल्यास शरीरातील वात संतुलित करण्यासही मदत होते. जर पचनशक्ती कमजोर असेल तर त्याचे सेवन जपून करावे, कारण ते पचवण्यासाठी पोटाला अधिक मेहनत करावी लागते. त्याच्या जड आणि चिकट स्वरूपामुळे ते पचायला बराच वेळ लागतो.

फणस खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि मधुमेहींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो. तो हृदयासाठीही फायदेशीर असून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यातील हाय पोटॅशियम प्रमाणामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

फणस पोटासाठी चांगला असतो का?

फणसामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा आतड्यांसंबंधित त्रास होत असेल, तर फणसाचे सेवन केल्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत होते. ते आतड्यांसाठी ब्रशप्रमाणे काम करते आणि शरीरातील अशुद्धी वेगाने काढून टाकते. पोटासाठी फायदेशीर असण्याव्यतिरिक्त हे फळ सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील फायदेशीर आहे.

फणसामध्ये असलेली ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करते. पण, काही लोकांनी फणसाचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यांना गॅस किंवा पचनाचा त्रास आहे, त्यांनी त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे. जर तुमच्या शरीरात वात जास्त असेल तर तो कमी मसाल्यांमध्ये तयार करून मर्यादित प्रमाणात सेवन करावा.