Benefits of Eating Sattu: आजच्या धावपळीच्या युगात विदेशी सुपरफूड्स आणि महागड्या प्रोटीन सप्लिमेंट्सचा मोठा बोलबाला आहे. लोक अॅवोकाडो आणि क्विनोआसारख्या विदेशी पदार्थांच्या मागे धावत आहेत. मात्र, भारतीय डॉक्टरांच्या मते, आजही सत्तूसारखे अनेक देशी पदार्थ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरत आहेत. शाकाहारी लोकांसाठी सत्तू हा ‘प्लांट बेस्ड प्रोटीन’चा एक उत्तम स्रोत असून, तो शरीरातील स्नायू (muscles) वाढवण्यास मदत करतो. भाजलेल्या हरभऱ्यांपासून तयार केलेला हा पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास शरीराला अनेक आवश्यक पोषक घटक मिळतात.

आधुनिक युगात सत्तूचे महत्त्व का वाढले आहे?

सत्तू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. यामध्ये असलेल्या हाय प्रोटीनमुळे शाकाहारी लोकांसाठी ‘मसल गेन’ करणे सोपे होते. तसेच, यातील फायबर पचनसंस्था सुधारते आणि पोट बराच वेळ भरलेले ठेवते आणि त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. सत्तूमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी महत्त्वाची खनिजे आणि ‘कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स’ असतात, ते शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात.

इतकेच नाही तर, सत्तू रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित ठेवण्यास आणि चयापचय क्रिया (Metabolism) सुधारण्यास मदत करतो. मैद्याच्या तुलनेत सत्तू आरोग्यदायी असून तो रक्तातील ग्लुकोजमध्ये अचानक वाढ होऊ देत नाही.

Award Banner

आहारात सत्तूचा समावेश करण्याचे ५ सोपे मार्ग

सत्तू चवीला उत्तम आणि वापरण्यास सोपा असल्याने तो खालील प्रकारे घेता येतो:

१. नमकीन सत्तू सरबत: २-३ चमचे सत्तू थंड पाण्यात मिसळून त्यात जिरे पूड, काळं मीठ, लिंबू आणि कोथिंबीर टाकून प्यावे. हे पेय शरीराला हायड्रेट ठेवते.
२. गोड सत्तू ड्रिंक: पाणी किंवा दुधात सत्तू मिसळून त्यात गूळ आणि वेलची पूड टाकल्यास नैसर्गिक एनर्जी बूस्टर तयार होते.
३. सत्तू पराठा: गव्हाच्या पिठात सत्तू, मसाले, कांदा आणि कोथिंबीर याचे सारण भरून पौष्टिक पराठा बनवता येतो.
४. सत्तूची लापशी (दलिया): घाईच्या वेळी सत्तू गरम पाणी किंवा दुधात मिसळून झटपट नाश्ता म्हणून घेता येतो.
५. सत्तूचे लाडू: तूप आणि गुळाचा वापर करून बनवलेले सत्तूचे लाडू हा एक आरोग्यदायी गोड पदार्थ आहे.

सत्तू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आजच्या काळात चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि प्रोसेस्ड फूडमुळे पचनाच्या समस्या वाढल्या आहेत. सत्तूचे सेवन केल्यास त्यातील फायबरमुळे ‘गट हेल्थ’ (आतड्यांचे आरोग्य) सुधारते. उन्हाळ्यात सत्तू शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचे काम करतो.

काय काळजी घ्यावी?

  • सत्तू आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
  • प्रमाण: प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला २ ते ३ चमचे सत्तू पुरेसा आहे.
  • सत्तू खाताना भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, अन्यथा पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
  • किडनीचे आजार असलेल्या किंवा प्रोटीन मर्यादित आहार घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.

थोडक्यात सांगायचे तर, सत्तू हे सिद्ध करतो की आपले पारंपारिक खाद्यपदार्थ आजही आधुनिक पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत. हा स्वस्त, सहज उपलब्ध होणारा आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला भारतीय ‘सुपरफूड’ आहे.