Mobile Addiction And Sleep Quality : अपुरी किंवा न मिळालेली शांत झोप, दिवसभर जाणवणारा थकवा, डोळे दुखणे किंवा टोचल्यासारखे वाटणे यांसारख्या अनेक समस्या लोकांना सतत भेडसावत असतात. मेंदू आणि डोळ्यांवर होणाऱ्या या दुष्परिणामांचे एक मोठे कारण मोबाईल आहे. लोक तासन् तास स्क्रीन पाहतात, ज्यामध्ये रील्स पाहणे हे अत्यंत सामान्य झाले आहे. रात्री झोपण्यापूर्वी लोक जेव्हा सतत आणि उशिरापर्यंत मोबाईल पाहतात तेव्हा ही समस्या अधिक गंभीर बनते. अंधारात मोबाईलमधून निघणारा ‘ब्ल्यू लाईट’ आपल्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवतो.

आता लोकांना हे समजू लागले आहे की, मोबाईलचे व्यसन आपल्यासाठी किती धोकादायक ठरत आहे. त्यामध्ये झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईलला हात न लावण्याचा सल्ला दिला जातो. पण, झोपण्यापूर्वी तासभर आधी मोबाईल न वापरल्याने शरीरात नक्की काय बदल घडतात?

तज्ज्ञ काय म्हणतात…?

झोपण्यापूर्वी तासभर आधी मोबाईल न वापरल्याने शरीरात जे बदल होऊ शकतात, त्याबाबत एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. अमित कुमार मंडल (सीनियर डायरेक्टर, पल्मोनोलॉजी, पारस हेल्थ हॉस्पिटल) यांनी सविस्तर माहिती दिली आहे, डॉ. अमित मंडल सांगतात की, झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवल्याने किंवा बंद केल्याने शरीर आणि मेंदूला झोपेसाठी नैसर्गिकरीत्या तयार होण्यास पुरेसा वेळ मिळतो. आपली झोप आणि जागे होण्याची प्रक्रिया शरीराच्या ‘सर्केडियन ऱ्हिदम’द्वारे नियंत्रित केली जाते.

रात्री मोबाईल फोन आणि इतर स्क्रीनमधून निघणारा प्रकाश, विशेषतः निळा प्रकाश (ब्ल्यू लाईट), मेलाटोनिन संप्रेरकाच्या (हार्मोन) स्रावावर परिणाम करू शकतो. मेलाटोनिन हे संप्रेरक शरीराला विश्रांती आणि झोपेची वेळ झाल्याचा संकेत देते. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून दूर राहिल्याने सहज आणि शांत झोप येण्यास मदत होते.

झोपेच्या पॅटर्नवर वाईट परिणाम

याचा फायदा केवळ स्क्रीनचा प्रकाश कमी होण्यापुरता मर्यादित नाही. मोबाईलवर सोशल मीडिया, व्हिडीओ, बातम्या, कामाचे मेसेज किंवा सतत येणारी नोटिफिकेशन्स पाहिल्याने मेंदू सतत सक्रिय राहतो. अनेकदा व्यक्ती काही मिनिटांसाठी फोन हातात घेते; परंतु स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे झोपण्याची वेळ पुढे ढकलली जाते. त्यामुळे झोपेचा एकूण कालावधीदेखील कमी होऊ शकतो.

मोबाईलऐवजी पुस्तक वाचा

झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवण्याची सवय मेंदूला शांत करण्याची आणि शरीराला झोपेसाठी तयार होण्याची संधी देते. या काळात पुस्तक वाचणे, हलका व्यायाम (स्ट्रेचिंग), ध्यानधारणा करणे किंवा कुटुंबासोबत शांतपणे संवाद साधणे यांसारखे पर्याय निवडले जाऊ शकतात. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, केवळ मोबाईल बंद करणे हा झोपेच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय नाही.

पुरेशी झोप, झोपण्याची व उठण्याची नियमित वेळ आणि आरोग्यदायी जीवनशैली हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. ही सवय नियमितपणे पाळल्यास झोपेचा दर्जा सुधारण्यास आणि दुसऱ्या दिवशी शरीरात पुरेशी ऊर्जा राहण्यास मोठी मदत होऊ शकते.