Home Remedies For Migraine: मायग्रेनचा त्रास हा अत्यंत वेदनादायक आणि त्रासदायक असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील सातपैकी किमान एक तरुण या आजाराने ग्रस्त आहे. महिलांमध्ये मायग्रेन पुरुषांपेक्षा तीन पट जास्त सामान्य आहे. मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी लोक अनेकदा वेदनाशामक औषधांचा वापर करतात, ज्याचे आरोग्यावर अनेकदा प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सांवालिया मायग्रेनच्या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करण्याची शिफारस करतात. तज्ज्ञ काही स्वयंपाकघरातील मसाल्यांवर प्रकाश टाकतात, ज्यांचा वापर मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तज्ज्ञ स्पष्ट करतात की, आयुर्वेदिक उपाय मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत; त्यांचा अवलंब करून तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.
भिजवलेले मनुके खा:
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात हर्बल चहाने करावी. हर्बल चहा प्यायल्यानंतर भिजवलेले मनुके खा. रात्रभर भिजवलेले १०-१५ मनुके सकाळी खा. सकाळी मनुके खाणे मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. तज्ज्ञांच्या मते, जर मनुके १२ आठवडे सतत सेवन केले तर वाढत्या वातासोबतच शरीरातील अतिरिक्त पित्तदेखील कमी होऊ शकते. त्याच्या सेवनाने मायग्रेनशी संबंधित सर्व लक्षणे जसे की आम्लता, मळमळ, जळजळ, एका बाजूला डोकेदुखी दूर होते.
जिरे-वेलची चहा प्या:
जर तुम्हाला मायग्रेनची लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही जिरे आणि वेलचीचा चहा पिऊ शकता. या चहामुळे मळमळ आणि तणाव दूर होतो. हा चहा बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या, त्यात १ चमचा जिरे आणि १ वेलची घाला. ती तीन मिनिटे उकळवा आणि नंतर हा चहा प्या. तुम्हाला मायग्रेनच्या वेदनांपासून आराम मिळेल. अर्बन प्लेटरच्या पोषणतज्ज्ञ रीमा किंजलकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, जिरे आणि वेलचीचा चहा मायग्रेनच्या वेदना कमी करण्यास मदत करतो.
गाईचे तूप खा :
शरीर आणि मनातील अतिरिक्त पित्त संतुलित करण्यासाठी गाईच्या तुपापेक्षा चांगले काहीही नाही, असे डॉ. दीक्षा स्पष्ट करतात. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी गाईच्या तुपाचे सेवन करावे. तूप खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भातामध्ये किंवा रोटीमध्ये घालणे. तुम्ही रात्री दुधात मिसळूनदेखील ते घेऊ शकता. तुम्ही औषधांसोबत तूपदेखील घेऊ शकता. मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही ब्राह्मी, शंखपुष्पी आणि यस्तीमधू या औषधी वनस्पतींचे सेवन तुपासोबत करू शकता.
