Walnut, Almond Benefits For Brain Health : मेंदू निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी आरोग्य तज्ज्ञ दररोज नियमितपणे नट्स आणि बिया खाण्याचा सल्ला देतात. अक्रोड आणि बदाम या दोन्हींमध्ये मेंदूचे योग्य प्रकारे काम चालण्यासाठी उपयुक्त ठरतील असे घटक असतात. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, तर बदाम हे व्हिटॅमिन-ई आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत मानले जाते. किशोरवयीन मुलांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात, नियमित अक्रोड खाल्ल्यामुळे त्यांची एकाग्रता सुधारल्याचे समोर आले आहे. (best dry fruits for memory and concentration)
चला तर मग जाणून घेऊया, मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड आणि बदाम यापैकी नेमके कोण जास्त फायदेशीर आहे?
अक्रोड खाल्ल्याने मेंदूला काय फायदे होतात?
अक्रोडमध्ये ‘अल्फा-लिनोलेनिक अॅसिड’ (ALA) नावाचे ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. हे मेंदूचा योग्य विकास होण्यासाठी आणि पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करते.
स्पेनमधील संशोधकांनी ११ ते १६ वयोगटातील ७०० किशोरवयीन मुलांवर एक अभ्यास केला. यामध्ये सहभागी झालेल्या मुलांना सलग सहा महिने दररोज ३० ग्रॅम अक्रोड खाण्यास सांगण्यात आले.
या संशोधनात ज्या किशोरवयीन मुलांनी किमान १०० दिवस नियमित अक्रोड खाल्ले, त्यांच्या एकाग्रता शक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून आले.
बदाम मेंदूसाठी कसे फायदेशीर ठरतात?
बदाममध्ये व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, प्रथिने (प्रोटीन) आणि फायबर यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन-ई शरीरातील पेशींचे ऑक्सीडेटिव्ह डॅमेजपासून (नुकसान होण्यापासून) रक्षण करते. तसेच, मॅग्नेशियम मज्जासंस्थेचे (nervous system) कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी गरजेचे असते. यामुळे मानसिक ताण आणि थकवा कमी होण्यास मदत होते.
बदामामध्ये असणारे असंतृप्त फॅट्स (unsaturated fats)देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे हेल्दी फॅट्स मेंदूच्या चांगल्या विकासासाठी आणि मज्जासंस्थेचे आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
अक्रोड की बदाम, नेमके काय जास्त फायदेशीर?
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अक्रोड आणि बदाम दोन्ही उपयुक्त ठरतात.
अक्रोड : हे ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे.
बदाम : यातून व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, प्रथिने आणि फायबर मिळतात.
अभ्यासानुसार, किशोरवयीन मुले दररोज ३० ग्रॅमपर्यंत अक्रोड खाऊ शकतात. मात्र, सुक्या मेव्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे सेवन नेहमी मोजक्या प्रमाणातच करावे. दुसरीकडे, दररोज २० ते २५ बदाम खाणे योग्य मानले जाते. अर्थात, आपल्या आहारामध्ये कोणताही नवीन बदल करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते.
