Best Foods to Improve Eyesight: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि सतत स्क्रीनसमोर बसण्याच्या सवयीमुळे डोळ्यांवर ताण येणं ही सामान्य बाब झाली आहे. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांचा वाढता वापर, प्रदूषण आणि चुकीचा आहार या सगळ्यांचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अनेकांवर कमी वयातच चष्मा लावण्याची वेळ येते. पण तुम्हाला माहीतत आहे का, काही साधे बदल केल्यास डोळ्यांची नजर टिकवून ठेवता येऊ शकते?
तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार घेतल्यास डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहू शकते. काही फळं आणि भाज्या अशा आहेत, ज्या डोळ्यांसाठी अक्षरशः अमृतासारख्या ठरू शकतात. पण, नेमकं काय खाल्ल्यानं फायदा होऊ शकतो, याबाबत अनेकांना स्पष्ट माहिती नसते.
त्याबाबत नवी दिल्लीतील डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार आणि विट्रोरेटिना सर्जन डॉ. प्रभज्योत कौर सांगतात, “काही विशिष्ट फळं आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक डोळ्यांच्या पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवतात आणि दृष्टी दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात.”
डोळ्यांसाठी फायदेशीर फळं
तुमच्या रोजच्या आहारात काही फळांचा समावेश केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. संत्री, आंबा, किवी, ब्लूबेरी व स्ट्रॉबेरी ही फळं डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त मानली जातात.
या फळांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. हे घटक डोळ्यांच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. तसेच वाढत्या वयानुसार होणाऱ्या दृष्टिदोषांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
विशेष म्हणजे सी व ई ही जीवनसत्त्वे डोळ्यांची ऊतके मजबूत ठेवतात आणि संसर्गाचा धोका कमी करतात.
‘या’ भाज्या ठरतात डोळ्यांसाठी सुपरफूड
फक्त फळं नाही, तर काही भाज्याही डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. गाजर, पालक, शिमला मिरची, ब्रोकोली व रताळे या भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
या भाज्यांमध्ये ल्युटिन आणि झिआझॅंथिनसारखे महत्त्वाचे घटक असतात, जे डोळ्यांच्या पडद्याचे संरक्षण करतात. त्याशिवाय यामध्येही ए, सी, ई ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे दृष्टी कमी होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
गाजर विशेषतः डोळ्यांसाठी फायदेशीर मानलं जातं. कारण- त्यात बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात असतं, जे शरीरात जाऊन ए व्हिटॅमिनमध्ये रूपांतरित होतं आणि दृष्टी सुधारण्यास मदत करू शकतं.
महत्त्वाची सूचना
तज्ज्ञ सांगतात की, फक्त फळं-भाज्यांवर अवलंबून राहून डोळ्यांचे गंभीर आजार बरे होऊ शकत नाहीत. जर धूसर दिसत असेल, डोळ्यांत वेदना होत असतील किंवा दृष्टी कमजोर होत असेल, तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास मोठ्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहारासोबतच डोळ्यांची नियमितपणे तपासणी करणेही तितकंच महत्त्वाचं आहे.
थोडक्यात, रोजच्या आहारात फळं आणि भाज्या योग्य प्रमाणात समाविष्ट केल्यास तुमची नजर दीर्घकाळ निरोगी राहू शकते आणि कदाचित जाड भिंगांच्या चष्म्यापासूनही दूर राहता येईल.
