How to Peel Garlic 3 Ways : जेवणाची चव वाढवण्यासाठी लसूण आवर्जून वापरला जातो. पण, लसणाच्या लहान लहान पाकळ्या सोलणं दिसायला जितकं सोपं असतं तितकंच ते कठीण सुद्धा असतं. कधी लसूण सोलताना लहान पाकळ्या, चिवट साल यामुळे नखात लसूण अडकते, तर कधी नखांमध्ये जळजळ होते आणि नखं दुखायला लागतात. त्यामुळे लसूण सोलणे हे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात करायला बसत नाही तोपर्यंत सोपे वाटते. तुम्हालाही अशाच समस्या जाणवत असतील तर आम्ही तुमच्यासाठी ३ सोप्या ट्रिक घेऊन आलो आहोत…

१. डब्यात लसूण टाकून हलवा

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात लसूण सोलायचा असेल, तर ही पद्धत सर्वात वेगवान आहे. सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करा आणि त्या एका झाकण असलेल्या डब्यात किंवा स्टीलच्या बॉक्समध्ये टाका. त्यानंतर, तो डबा साधारण १० ते १५ सेकंद चांगला हलवा. यामुळे लसणाच्या पाकळ्या एकमेकांवर आदळतात, त्यांची साले सैल होतात आणि त्यातील बऱ्याच पाकळ्यांची साले आपोआप निघून पडतात. जेव्हा तुम्ही डब्बा उघडता, तेव्हा बहुतेक पाकळ्यांची साले आधीच निघालेली असतात किंवा निघण्याच्या बेतात असतात. यामुळे खूप वेळ वाचतो.

२. सुरीचा वापर करा

खूप कमी प्रमाणात लसणाच्या पाकळ्या सोलण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. लसणाची एक पाकळी चॉपिंग बोर्डवर ठेवा आणि सुरीच्या सपाट बाजूने त्यावर हलकासा दाब द्या. यामुळे लसणाची साल सहजपणे निघून येते. मात्र, खूप जोराने दाब देऊ नका. कारण यामुळे लसणाची पाक चेचली जाऊ शकते.

३. पाण्यात भिजवा

जर तुम्हाला यापेक्षाही एखादी अधिक सोपी पद्धत हवी असेल तर लसणाच्या पाकळ्या साधारण पाच मिनिटे कोमट पाण्यात ठेवा. यामुळे लसणाची साल मऊ पडते आणि आपोआपच सैल होते. त्यानंतर, अगदी कमी कष्टात लसूण सोलणे खूपच सोपे होऊन जाते. ही पद्धत विशेषतः जुन्या किंवा थोडे वाळलेल्या लसणाबाबत अधिक प्रभावी ठरते; कारण अशा लसणाची साल सहसा अधिकच चिकटलेली असते.