आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, अनेक लोकांना रात्री शांत झोप लागण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. काही लोकांना अंथरुणात गेल्यावर बराच वेळ झोप लागत नाही. तर काही जण रात्री वारंवार जागे होतात. अशा परिस्थितीत, तुम्ही कॅमोमाइल चहाबद्दल नक्कीच ऐकले असेल. असे मानले जाते की, झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल चहा प्यायल्याने मन शांत होते आणि शांत झोप लागण्यास मदत होते. पण, हा चहा खरोखरच झोपेच्या समस्या सोडवू शकतो का? याबद्दल संशोधन काय सांगते याबद्दल जाणून घेऊया.

कॅमोमाइल चहा म्हणजे काय?

कॅमोमाइल ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. तिचा वापर अनेक वर्षांपासून पारंपरिक उपचारांमध्ये केला जात आहे. ही वनस्पती डेझीच्या फुलांच्या कुळातील आहे. कॅमोमाइलचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जर्मन कॅमोमाइल आणि दुसरा म्हणजे रोमन कॅमोमाइल. हा हर्बल चहा वाळलेल्या कॅमोमाइल फुलांपासून तयार केला जातो. त्यात विविध नैसर्गिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यापैकी, ॲपिजेनिन नावाचे फ्लेव्होनॉइड विशेष मानले जाते. त्यात ल्युटिओलिन, क्वेरसेटिन आणि इतर अनेक बायोॲक्टिव्ह संयुगे देखील असतात. पारंपरिकरित्या कॅमोमाइलचा वापर तणाव, पचनाच्या समस्या आणि झोपेचे विकार कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे आजही हे एक लोकप्रिय हर्बल पेय आहे.

कॅमोमाइल चहा प्यायल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते का?

चांगल्या झोपेसाठी कॅमोमाइल चहाला अनेकदा एक नैसर्गिक पर्याय म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की, त्यातील ‘एपिजेनिन’ नावाचा घटक मेंदूतील विशिष्ट रिसेप्टर्सशी जोडला जातो, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो. यामुळे मन शांत होऊ शकते आणि झोप लागण्यास मदत होते.

२०२४ मध्ये झालेल्या एका संशोधनात कॅमोमाइलचा झोपेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात १० वेगवेगळ्या चाचण्यांचा आणि एकूण ७७२ लोकांचा समावेश होता. संशोधनातून असे दिसून आले की, कॅमोमाइलचे सेवन केल्याने काही लोकांच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

या अभ्यासात पिट्सबर्ग स्लीप क्वालिटी इंडेक्स (PSQI) च्या गुणांमध्ये घट झाल्याचेही दिसून आले. हा निर्देशांक एखाद्या व्यक्तीच्या झोपेची गुणवत्ता मोजण्यासाठी वापरला जातो. इतकेच नाही, तर काही अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, कॅमोमाइलच्या सेवनाने वारंवार जाग येण्याचे प्रमाण कमी होते आणि लवकर झोप लागण्यास मदत होते. पण, याचा अर्थ असा नाही की कॅमोमाइल चहा प्यायल्याने प्रत्येकाला चांगली झोप लागेल, एकूण झोपेचा कालावधी, झोपेची कार्यक्षमता किंवा दिवसाचा थकवा कमी होईल.

नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ (NCCIH) नुसार, झोप येण्यासाठी दूर करण्यासाठी कॅमोमाइल किती प्रभावी आहे, याबाबत अद्याप पुरेसे वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे कॅमोमाइलमुळे झोप न येण्याची समस्या पूर्णपणे बरी होते, असे म्हणता येत नाही. म्हणजेच, याला झोप न येण्यावरील खात्रीशीर उपचार मानता येणार नाही.

कॅमोमाइल चहा पिण्याचे फायदे

कॅमोमाइल चहाचा वापर पारंपरिकरित्या केवळ झोपेसाठीच नव्हे, तर इतर विविध समस्यांसाठीही केला जातो…

तणाव आणि चिंता

कॅमोमाइलमधील एपिजेनिन मेंदूतील विशिष्ट रिसेप्टर्सशी (receptors) जोडले जाऊ शकते, जे शरीराला आराम देण्यास मदत करतात. काही प्राथमिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कॅमोमाइलचे सेवन केल्याने सौम्य चिंता आणि अस्वस्थता कमी होऊ शकते. पण, यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

पचनक्रिया

गॅस, अपचन आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी कॅमोमाइलचा पारंपरिकरित्या वापर केला जातो. त्यातील काही संयुगे पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात असे मानले जाते. पण, या फायद्यांना समर्थन देणारे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.

अँटीऑक्सिडंट्स

कॅमोमाइलमध्ये एपिजेनिन, क्वेरसेटिन आणि ल्युटिओलिनसारखे फ्लेव्होनॉइड्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यात भूमिका बजावतात.

शरीरातील सूज आणि जळजळ

कॅमोमाइलमध्ये काही नैसर्गिक घटक असतात. या घटकांमध्ये शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्याचे गुणधर्म असल्याचे काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. कॅमोमाइलच्या अर्कामुळे दाह कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, याचा अर्थ कॅमोमाइल चहा प्यायल्याने कोणताही आजार बरा होतो, असा होत नाही. त्यामुळे याला कोणत्याही आजारावरील उपचार समजू नये.

कॅमोमाइल चहा बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

  • प्रथम, एक कप पाणी पूर्णपणे गरम करा.
  • त्यात एक कॅमोमाइल टी बॅग किंवा सुमारे १-२ ग्रॅम वाळलेली कॅमोमाइल फुले टाका.
  • सुमारे ५-१० मिनिटे झाकून ठेवा जेणेकरून फुलांमधील पोषक तत्वे पाण्यात पूर्णपणे शोषली जातील.
  • यानंतर, टी बॅग काढून टाका किंवा चहा गाळून घ्या.
  • तुम्हाला आवडत असल्यास चवीसाठी थोडे मध घालू शकता.

हा चहा कधी प्यावा?

जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल आणि झोपण्यापूर्वी एक आरामदायी पेय प्यायचे असेल, तर तुम्ही झोपण्याच्या सुमारे ३०-६० मिनिटे आधी कॅमोमाइल चहा पिऊ शकता. पण, झोपण्यापूर्वी कॅमोमाइल चहा पिण्याची ही वेळमर्यादा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नियम नाही. हे लक्षात ठेवा की प्रत्येकासाठी कॅमोमाइल चहाचे कोणतेही निश्चित प्रमाण नाही. कमी प्रमाणात सुरुवात करणे अधिक चांगले असू शकते.

कॅमोमाइल चहा पिण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

चहा किंवा जेवणात योग्य प्रमाणात कॅमोमाइलचा वापर करणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. मात्र, काही लोकांना यामुळे ॲलर्जी किंवा इतर त्रास होऊ शकतो.

१. ॲलर्जी – जर तुम्हाला रॅगवीड, झेंडू, शेवंती किंवा डेझी यांसारख्या फुलांची ॲलर्जी असेल, तर कॅमोमाइलमुळेही ॲलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी कॅमोमाइलचे सेवन करताना काळजी घ्यावी.

२. औषधे – कॅमोमाइलचे सेवन केल्याने काही औषधांच्या परिणामांवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे तुम्ही नियमित औषधे घेत असाल, तर कॅमोमाइल चहा पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.