Morning or Night What Is the Best Time to Have Sex: दिवसभराच्या धावपळीनंतर अनेक जोडपी रात्री उशिरा एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंत करतात. त्यामुळे बहुतांश लोकांसाठी शरीरसंबंध ठेवण्याची वेळ ही रात्रीचीच असते. मात्र, ही सवय आपल्या शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी खरंच जुळते का? दिवसभरातील कोणत्या वेळी शरीर अधिक तयार असते? आणि नात्यातील जवळीक वाढविण्यासाठी योग्य वेळ कोणती असू शकते? याबाबत झोप आणि हार्मोन्सचा अभ्यास करणाऱ्या एका तज्ज्ञाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ व झोप तज्ज्ञ डॉ. मायकेल ब्रूस यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमधील चर्चेत आणि त्या संदर्भातील सोशल मीडिया पोस्टमध्ये या विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, अनेक जोडपी नकळत अशा वेळेत शरीरसंबंध ठेवतात, जेव्हा शरीरातील काही महत्त्वाच्या हार्मोन्सची पातळी अपेक्षेइतकी अनुकूल नसते.

डॉ. ब्रूस यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या टीमने केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळले की, बहुतांश जोडपी रात्री साधारण साडेदहा ते साडेअकरादरम्यान जवळीक साधतात. ही वेळ सोईची वाटत असली तरी शरीराच्या हार्मोनल स्थितीचा विचार केला, तर ती सर्वांत अनुकूल वेळ असेलच, असे नाही.

यामागील कारण स्पष्ट करताना ते सांगतात की, रात्री उशिरा शरीरात मेलाटोनिन या झोपेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोनची पातळी वाढलेली असते. त्याच वेळी ऊर्जा, उत्साह आणि कार्यक्षमतेशी संबंधित काही हार्मोन्सची पातळी तुलनेने कमी होत जाते. त्यामुळे शरीर नैसर्गिकरीत्या विश्रांतीच्या अवस्थेकडे झुकत असते.

याउलट सकाळच्या वेळी चित्र काहीसे वेगळे असते. रात्रीची झोप पूर्ण झाल्यानंतर मेलाटोनिनची पातळी कमी होऊ लागते; तर शरीरातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेशी संबंधित हार्मोन्स सक्रिय होऊ लागतात. त्यामुळे काही लोकांना सकाळच्या वेळेत अधिक उत्साही आणि ताजेतवाने वाटू शकते.

याबाबत डॉ. मायकेल ब्रूस म्हणतात, “बहुतांश लोक रात्री साडेदहा ते साडेअकरादरम्यान शरीरसंबंध ठेवतात. मात्र, त्या वेळी शरीरातील हार्मोन्सची स्थिती फारशी अनुकूल नसते. उलट सकाळच्या वेळी मेलाटोनिन कमी होत जाते आणि शरीरातील इतर महत्त्वाचे हार्मोन्स अधिक सक्रिय होतात. आमच्या सर्वेक्षणातही अनेकांनी सकाळच्या वेळेत अधिक चांगला भावनिक संवाद आणि समाधानकारक अनुभव मिळाल्याचे सांगितले.”

तज्ज्ञांच्या मते, जवळीक साधताना शरीरात इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, अॅड्रेनालिन व कॉर्टिसोल यांसारख्या हार्मोन्सची योग्य पातळी असणे महत्त्वाचे मानले जाते. रात्री उशिरा या हार्मोन्सची पातळी तुलनेने कमी असू शकते आणि सकाळी ती अधिक अनुकूल स्थितीत असण्याची शक्यता असते.

मात्र, याचा अर्थ प्रत्येक जोडप्यासाठी एकच वेळ योग्य ठरते, असा अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली, झोपेची वेळ, कामाचे स्वरूप, आरोग्य आणि वैयक्तिक आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणती वेळ योग्य वाटते, हे जोडप्यानुसार बदलू शकते.

तज्ज्ञांच्या मते, हार्मोन्सच्या नैसर्गिक बदलांचा विचार करता, सकाळची वेळ शरीरसंबंधांसाठी अधिक अनुकूल ठरू शकते. मात्र, कोणतीही वेळ निवडताना दोन्ही जोडीदारांची संमती, सोय आणि इच्छा यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे.

तज्ज्ञ एक महत्त्वाची बाबही अधोरेखित करतात. कोणत्याही हार्मोनपेक्षा किंवा वेळेपेक्षा जोडीदाराची संमती, परस्परांची इच्छा, मानसिक तयारी आणि एकमेकांचा आदर यांना सर्वाधिक महत्त्व आहे. दोघांनाही सोईची आणि आरामदायी वाटणारी वेळ निवडणे हेच सुसंवादी आणि आनंदी नात्याचे खरे लक्षण आहे.

(टीप : ही माहिती झोपतज्ज्ञ डॉ. मायकेल ब्रूस यांनी पॉडकास्ट आणि सोशल मीडियावरील चर्चेत मांडलेल्या मतांवर आधारित आहे. या माहितीचा वापर वैद्यकीय उपचारांना पर्याय म्हणून करणे योग्य ठरणार नाही. लैंगिक आरोग्य किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)