Best Time to Eat an Apple: सफरचंद हे चविष्ट फळ तर आहेच; पण आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकते. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यापासून रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि वजन व्यवस्थापनापर्यंत अनेक बाबतीत सफरचंदाचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो. मात्र, तुम्ही सफरचंद दिवसाच्या कोणत्या वेळी खाता, यालाही महत्त्व आहे का? आहारतज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?
सफरचंद खाण्यासाठी दिवसातील एखादी ठरावीक वेळच सर्वोत्तम आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, सकाळच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास त्यातील तंतुमय पदार्थांचा अधिक चांगला लाभ मिळण्यास मदत होऊ शकते, असे आहारतज्ज्ञ एव्हरी झेंकर यांनी सांगितले आहे.
एव्हरी झेंकर, आरडी यांच्या मते, सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्ससोबत चिरलेले सफरचंद खाणे किंवा सकाळच्या वेळेत मधल्या खाण्यासाठी संपूर्ण सफरचंद घेणे हा दररोजच्या आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवण्याचा सोपा मार्ग आहे.
आपल्या शरीराच्या जैविक घड्याळाची स्वतःची एक व्यवस्था असते. तिला जैविक दिनचक्र किंवा सर्केडियन ऱ्हिदम, असे म्हटले जाते. अनेकांना सकाळच्या वेळी नैसर्गिकरीत्या शौचास होण्याची सवय असते. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच तंतुमय पदार्थांनी समृद्ध सफरचंद खाल्ल्यास आतड्यांच्या नैसर्गिक हालचालींना आणि नियमित मलविसर्जनाला मदत होऊ शकते.
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत
सफरचंदामध्ये दोन प्रकारचे तंतुमय पदार्थ आढळतात. अघुलनशील तंतू मलाचा आकार वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे आतड्यांमधून त्याचा प्रवास सुरळीत होण्यास मदत होते. दुसरीकडे, विद्राव्य तंतू पाण्यात मिसळून जेलसारखे रूप धारण करतात आणि पचनसंस्थेच्या कार्याला आधार देतात.
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचा हा एक महत्त्वाचा विद्राव्य तंतू आढळतो, जो आतड्यांमधील उपयुक्त जीवाणूंना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य दीर्घकाळ टिकण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते.
रक्तातील साखरेसाठीही ठरू शकते फायदेशीर
सफरचंदाची चव गोड असली तरी त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नेहमीच झपाट्याने वाढते, असे नाही. सकाळच्या आहारात सफरचंदाचा समावेश केल्यास दिवसभर रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर ठेवण्यास मदत होऊ शकते.
आहारतज्ज्ञ जेनी फिंके, एम.एस., आरडीएन यांच्या मते, सफरचंदातील पेक्टिन हा विद्राव्य तंतू पचनाची प्रक्रिया काही प्रमाणात मंदावण्यास मदत करतो. त्यामुळे पोट अधिक काळ भरल्यासारखे वाटू शकते आणि अचानक भूक लागणे किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
सफरचंद, द्राक्षे व ब्ल्यूबेरी यांसारख्या कमी ग्लायसेमिक निर्देशांक असलेल्या फळांचे नियमित सेवन टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होण्याशी संबंधित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी
वजन नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही सफरचंद हा आहारातील एक सोपा पर्याय ठरू शकतो. त्यात पोषक घटक व तंतू असतात आणि उष्मांक तुलनेने कमी असतात. तंतुमय पदार्थांमुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ टिकण्यास मदत होते.
जेनी फिंके यांच्या मते, जेवणाच्या १० ते १५ मिनिटे आधी संपूर्ण सफरचंद खाल्ल्यास एकूण अन्नाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वजन व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही त्याचा फायदा होऊ शकतो.
आहारातील तंतू वाढविण्यासाठी आणखी काय खावे?
दररोजच्या आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यासाठी केवळ सफरचंदावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आहारात कडधान्यांचा समावेश करता येतो. अर्धा कप कडधान्यांमधून सुमारे आठ ग्रॅम तंतू मिळू शकतात. डाळी पास्त्याच्या सॉसमध्ये किंवा पांढऱ्या कडधान्यांचा वापर सूपमध्ये करता येतो.
दोन चमचे जवसामधून सुमारे चार ग्रॅम अतिरिक्त तंतू मिळू शकतात. जवस दही, ओट्स किंवा काही भाजलेल्या पदार्थांमध्ये मिसळता येते. त्याशिवाय पांढऱ्या पिठाच्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्यापासून बनवलेली भाकरी, पोळी किंवा पास्ता निवडल्यास प्रत्येक वाटीत साधारण चार ते सहा ग्रॅम तंतू मिळू शकतात.
पालेभाज्यांचाही आहारात समावेश महत्त्वाचा आहे. शिजवलेल्या एका कप सुमारे सहा ग्रॅम तंतू मिळू शकतात. पालक, स्विस चार्ड किंवा अरुगुला यांचा वापर अंडी, सूप, सँडविच किंवा पेयांमध्ये करता येतो.
मग नेमके कधी खावे सफरचंद?
आता तुम्हाला पडलेल्या मुख्य प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे. सकाळी सफरचंद खाणे हा तंतुमय पदार्थांचा लाभ मिळवण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा मधल्या वेळेत संपूर्ण सफरचंद खाल्ल्यास दिवसाच्या सुरुवातीलाच आहारातील तंतूंचे प्रमाण वाढवण्यास मदत होऊ शकते. सकाळची वेळ अनुकूल असली तरी सफरचंद केवळ त्याच वेळी खावे, असे नाही. दिवसाच्या इतर कोणत्याही वेळीही त्याचे सेवन करता येते.
(टीप : ही माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशाने देण्यात आली आहे. आहारात मोठे बदल करण्यापूर्वी किंवा आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)
